A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
काय झालं सोनुलीला

काय झालं सोनुलीला?
रडूं कशाचं डोळ्यांत?
पोरक्या वासरावाणी
कशापायीं हा आकांत?

डोळ्यांतल्या आंसवांच्या
पाणीदारशा मोत्यांनी
डंवरलें काहून ग !
लाल गुलाब हे दोन्ही

रडू नको ग देते
माझ्या बाईला भुल्‌जाई
हांसतील कशा मग
ओठांवर जाईजुई

जांभया कां देशी अशा
नीज आली कां मैनेला?
झोप झोप छबुकडे !
मीच थोपटतें तुला

ये ग ये ग हम्‍मा ये ग
दुदु दे ग तान्‍हुलीला
राघो ! पळत ये तूंही रे
घाल वारा साळुंकीला

पाय हळूहळू टाका
गोड गोड ओव्या म्हणा
चारा घेऊन तुम्हि या
टांगा मैनाइ ! पाळणा

मीच निजवितें त्यांत
माझ्या जिवाची ही राणी
हिंडवते अन्‌ बाईला
गात गात गोड गाणीं
गीत - वि. भि. कोलते
संगीत - व्ही. डी. अंभईकर
स्वर- व्ही. डी. अंभईकर
गीत प्रकार - भावगीत, नयनांच्या कोंदणी
  
टीप -
• काव्य रचना- २७ सप्टेंबर १९२९, नागपूर.
भुल्‌जाई - बाहुली.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.