पाउल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे
किर्र बोलते घन वनराई
सांज सभोती दाटुन येई
सुखसुमनांची सरली माया, पाचोळा वाजे
गाव मागचा मागे पडला
पायतळी पथ तिमिरी बुडला
ही घटकेची सुटे सराई, मिटले दरवाजे
निराधार मी, मी वनवासी
घेशिल केव्हा मज हृदयासी?
तूच एकला नाथ अनाथा, महिमा तव गाजे
गीत | - | शान्ता शेळके |
संगीत | - | पं. हृदयनाथ मंगेशकर |
स्वर | - | आशा भोसले |
राग | - | पूरिया धनाश्री, श्री |
गीत प्रकार | - | भावगीत |
पाचोळा | - | वाळून खाली पडलेली झाडांची पाने. |
सुमन | - | फूल. |
सराई | - | धर्मशाळा / विश्रांतीस्थळ. |
पण शेवटी आपल्या अनुभवांची पण एक चाकोरी बनून जाते, नाही का? या चाकोरीबाहेर नेऊन, संगीताच्या विश्वातला सर्वस्वी नवा अनुभव मला एका संगीतकारानंच दिला. एका परदेशी संगीतकारानं ! आणि त्यानं लावलेल्या स्वरांच्या आणि स्वररचनेच्या त्या अर्थानं मी अक्षरश: थरारून गेलो. त्याची कथा अशी-
सुमारे तीस वर्षांपूर्वीची गोष्ट. पुणे आकाशवाणीवर संगीत संयोजक म्हणून मी काम पहात होतो. त्या वेळी 'जिवलगा'ची ध्वनिमुद्रिका नुकतीच रसिकांसमोर आली होती.
शान्ता शेळके यांची सुमधुर भावपूर्ण कविता, आशाताईंचा भावव्याकूळ स्वर आणि बाळासाहेबांची कल्पक स्वररचना असा सुरेख मेळ जमून गेला होता. पूरिया धनाशी, श्रीगौरी इत्यादी सायंकालीन रागांची छाया सार्या गीतावर उदासीनतेचा रंग गहिरा करीत होती. मोजक्याच वाद्यांचा वापर गाण्याच्या वातावरणाला मोठा पोषक होता. या गीतानं आल्याआल्याच रसिकांच्या मनावर मोहिनी घातली. त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली.
अर्थात या गीतालाही नावं ठेवणारे, नाकं मुरडणारे काही महाभाग होतेच. पण सगळं काही छुपकेछुपके ! सरळ टीका करायची कुणाचीच हिंमत नव्हती. कारण बाळासाहेब म्हणजे सुगम संगीतातल्या राजघराण्यातील राजकुमार होते. अनभिषिक्त राण्यांचे लाडके बंधू ! त्यांच्यावर टीका करून त्या राजघराण्याचा आणि त्या राण्यांचा रोष ओढवून घ्यायला कोणीच तयार नव्हतं.
खासगीत मात्र खालच्या आवाजात हेच लोक कुजबुजायचे, "ती सरगम नसती तर बरं झालं असतं. मोठा रसभंग होतो त्यामुळं." किंवा एखादा म्हणायचा, " ते स्वरमंडल कशाला वापरलंय? हल्ली फॅशनच झाली आहे स्वरमंडल घ्यायची." असे आक्षेप ऐकायला मिळायचे. मला स्वत:ला ते गाणं खूप आवडलं होतं आणि मी ते अगणित वेळा ऐकलं होतं. प्रत्येक वेळी मला त्यात वेगळी सौंदर्यस्थळं जाणवत होती. मोकळा वेळ मिळाला की त्या गाण्याचे स्वर आठवून त्यांचा आनंद मनात घोळवायचो.
माझ्याप्रमाणेच हे गाणं असंख्य श्रोत्यांना अमाप आवडलं होतं. याचा पुरावाच होता माझ्याजवळ. 'आपली आवड' या अत्यंत लोकप्रिय कार्यक्रमाचं नवीन बोधसंगीत तयार करून तो कार्यक्रम मी सादर करीत होतो, तेव्हा श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद लाभला होता. असंख्य पत्रं आली आणि या पत्रांतून 'जिवलगा'ची मागणी आग्रहानं येत होती.
एके दिवशी मी माझं काम करीत बसलो असताना एक प्रतिष्ठित आणि मान्यवर गॄहस्थ एका परदेशी पाहुण्यांना घेऊन मला भेटायला आले. तो परदेशी गृहस्थ दिसायला अगदी साधा होता. थोडासा बुटकाच ! चष्मा लावलेला. भावपूर्ण डोळे. किंचित पिंगट केस. कपाळ पुढे आलेलं. अत्यंत शांत मुद्रा.
"हे हंगेरियन गृहस्थ आहेत. नामवंत संगीत रचनाकार, संगीततज्ज्ञ आणि देशोदेशींच्या संगीताचे अभ्यासक. त्यांना हंगेरियन शिवाय दुसरी कुठलीच भाषा येत नाही. मी त्यांचा दुभाषी आहे." त्या भारतीय गृहस्थांनी मला इंग्रजीत सांगितलं. माझी पण त्याच्याशी ओळख करून दिली. त्या हंगेरियन माणसाच्या चेहर्यावर आदरभाव पसरलेला पाहून मला बरं वाटलं. माझ्याविषयी बरंचसं बरं सांगितलं गेलं असावं हे मी ताडलं.
"तुम्हाला वेळ असेल तर एक विनंती आहे. हे आजच रात्री परत जाणार आहेत. तुम्ही तासभर वेळ काढून त्यांना आपल्या काही संगीतकारांचं गायन, वादन आणि संगीतरचना ऐकवल्या तर ते कृतज्ञ होतील." ते दुभाषी म्हणाले. "हो. हो. अवश्य. वेळ नसला तरीही हे काम मी आनंदानं केलं असतं. सुदैवानं मला वेळ आहे. चला. स्टुडिओत जाऊ या." मी उठत म्हणालो.
प्रथम मी त्याला काही लोकप्रिय गायक, वादकांच्या रेकॉर्डस् ऐकवल्या. तो ज्या पद्धतीने ऐकत होता आणि प्रश्न विचारत होता, त्यावरून त्यानं भारतीय संगीताविषयी बरीच माहिती आत्मसात केली होती, हे स्पष्ट दिसत होतं. प्रचारातला कोणताही राग ऐकवला की तो कोणत्या वेळेला गायला जातो हे तो अचूक सांगायचा. एवढंच नव्हे तर दरबारी कानडा हा राग तानसेन नावाच्या 'ग्रेट' संगीतकारानं निर्माण केला. त्यातले गांधार आणि धैवत हे स्वर विशिष्ट प्रकारे आंदोलीत करूनच लावतात, हे पण त्यानं सागितलं. यावरून त्यानं भारतीय संगीताचा सखोल अभ्यास केला होता, हे स्पष्टपणे कळत होतं. त्याला मी ज्या ध्वनिमुद्रिका ऐकवल्या, त्यापैकी पं. ओंकारनाथांची तोडी आणि मालकंस या ध्वनिमुद्रिका त्याला फार आवडल्या. ओंकारनाथांचा आवाज म्हणजे लाखातला एक आहे, असं तो म्हणाला. उस्ताद करीमखां यांचा आवाज उदास पण रोमॅंटिक आहे, असं त्याचं मत पडलं. सूरश्री केसरबाई केरकर याचं गाणं गंभीर आणि निर्मळ आहे. हरिद्वारच्या गंगेसारखं आहे असं म्हंटल्यावर मी चकितच झालो. त्यानं प्रवास पण केला होता आणि डोळसपणे केला होता, हे त्याच्या बोलण्यावरून स्पष्ट दिसत होतं. पं. रविशंकर यांची सतार, उस्ताद अलि अकबर यांचं सरोद, उस्ताद बिस्मिल्लाह यांची सनई, हे सारं त्याला आवडलं. ऐकताऐकता तो आपल्या डायरीत काहीतरी टिपट होता.
"आता थोडं भावसंगीत किंवा शब्दसंगीत ऐकू या. कवितेचा भाव किंवा सारांश सांगितला तरी पुरे." तो म्हणाला.
"ठीक आहे." मी म्हणालो.
मग मी त्याला काही ठुमर्या ऐकवल्या. बडे गुलाम अलीखां यांची 'याद पिया की आये" ही ठुमरी त्याला फार आवडली. लताच्या आवाजातल्या मदनमोहनच्या रचना पण त्याला खूप आवडल्या. आमची मैफल संपतच आली होती. जाण्यापूर्वी सहज म्हणून मी आशाची 'जिवलगा' ही रेकॉर्ड लावली. ती ऐकताना त्याची तंद्रीच लागली होती. रेकॉर्ड संपली आणि तो तंद्रीतून जागा झाला.
"पुन्हा लावा ! प्लीज !" तो म्हणाला. तो पुन्हा तन्मयतेनं ऐकू लागला, असं चार-पाच वेळा झालं.
"कोण आहे या गीताचा संगीतकार?" त्यानं विचारलं.
"हृदयनाथ ! हृदयनाथ मंगेशकर !"
"थोर आहे. फार थोर आहे." तो मान हलवीत म्हणाला.
"मग आता मी या गीतातल्या कवितेचा अर्थ सांगत नाही. तुन्हाला स्वरातून काय जाणवलं ते सांगा." मी जणू त्याला आव्हानच दिलं होतं.
त्यानं क्षणभर डोळे मिटले आणि एक प्रकारच्या तंद्रीत जाऊन तो सांगू लागला. "मला जाणवलं ते अत्यंत विकल आणि एकाकी स्त्रीचं दु:ख ! अगदी एकाकी आहे ती. कसलं तरी ओझं घेऊन एकेक पाऊल टाकीत ती चालली आहे. हे ओझं कदाचित् गतस्मृतीचंही असेल- " तो दुभाष्यातर्फे सांगत होता.
मी चकित होऊन ऐकत होतो. एक हंगेरियन माणूस केवळ गाणं ऐकून त्या गाण्याचा, चक्क एका मराठी गाण्याचा, मथितार्थ सांगत होता. केवळ स्वर ऐकून !
"ती मधेच सरगम गाते पहा. ती कशासाठी?" मी मद्दामच विचारलं.
"हं. इथं संगीतकारानं फार मोठी कल्पकता दाखवली आहे. ती स्त्री दु:खानं इतकी भारावून गेली आहे, की तिला तिचं दु:ख व्यक्त करायला शब्दच सापडत नाहीयेत. मग ती आधार घेते सरगमचा. निरर्थक शब्द ! पण तिचं गहिरं दु:ख व्यक्त करणारी भाववाहक अक्षरं ! शब्दार्थ नस्ल तर स्वरार्थ आहे, भावार्थ आहे." तो मान हलवीत म्हणाला.
त्याचं ते बोलणं ऐकून मी अक्षरश: अवाक् झालो. एका नव्या संवेदनेची तेजोमय शलाका माझ्या सर्वांगाला पुलकित करून गेली. इतक्या वेळा मी ते गाणं ऐकलं होतं; पण हा अर्थ माझ्या मनात कधीच आला नव्हता. जाणीवेच्या याच प्रकाशात जीव-लगा असा तोडलेला शब्द, नवा अर्थ घेऊन, भावसौंदर्याने नटून समोर आला. दु:खाच्या आवेगात कोणीही तुटकच बोलणार. दु:खाची तीव्रता भोगणारा माणूस व्याकरणाचे नियम पाऊन थोडाच बोलणार? त्याला फक्त आपली तीव्र भावना, मिळेल त्या शब्दांत व्यक्त करायची असते. त्या भरातच मग तो (शेक्सपिअरच्या शब्दांत) most unkindest cut असं सुद्धा बोलून जातो.
मी सुन्न झालो. सर्वांग रोमांचित झालं ! त्याच अवस्थेत मी त्याला विचारलं, "या गाण्याचा ठेका एकसुरी आणि कंटाळवाणा नाही वाटत तुम्हाला."
"अगदी बरोबर ! तो तसाच हवा !" तो ठासून म्हणाला. "ठेका, ताल म्हणजे जीवनाची गती. दु:खमय जीवनाची गती कशी असणार? ती कंटाळवाणीच असणार. दिवस आणि रात्र याचं रहाटगाडगंच जणू. संगीतातल्या तालातली 'सम' आणि 'खाली' ही संकलपना मला फार आवडली. दिवस व रात्र, जन्म आणि मृत्यू, तशी 'सम' आणि 'खाली'. वा ! काय कल्पना आहे. तीच कल्पना या संगीतकारानं मोठ्या समर्थपणे वापरली आहे."
"आणि मध्येच येऊन जाणारं स्वरमंडल? तारांचे ते झंकार?"
"त्या आहेत गतस्मृती ! आठवणींचे मधुर झंकार !"
मी दोन्ही हात जोडून त्याला नमस्कार केला. It requires a genius to appreciate a genius असं म्हणतात ते अगदी खरं होतं. त्या संगीतकाराचा व्यासंग, कल्पकता आणि संवेदनशीलता यानं मी थक्क झालो होतो. खर्या प्रतिभावंताला दाद द्यायला प्रतिभावंतच लागतो याचा थरारक अनुभव मी घेतला होता. आता जेव्हा जेव्हा मी 'जिवलगा' ऐकतो, तेव्हा तेव्हा तो हंगेरियन संगीतकार डोळ्यांसमोर येतो आणि मी त्या प्रतिभावंताला मनोमनी नमस्कार करतो.
(संपादित)
पं. अरविंद गजेंद्रगडकर
स्वरांची स्मरणयात्रा
सौजन्य- उत्कर्ष प्रकाशन, पुणे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.