A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
झुंजता रणभूवरी तू

झुंजता रणभूवरी तू, अमर होशी रे सुता
भाग्य माझे थोर म्हणुनी जाहलो तव मी पिता

हे खुळे वात्सल्य माझे ढाळिते अश्रू जरी
ताठ माझी मान गर्वे, धन्यता दाटे उरी
आजवर आशीष दिधले, वंदना घेई आता

आपुल्या वंशावरी तू दिव्य कीर्तीची ध्वजा
यातुनी घेतील स्फूर्ती कोटी वीरांच्या प्रजा
मरण कैसे हे म्हणू मी? मूर्त ही चिरजीवीता

पोचशी तू दिव्यलोकी सूर्यमंडळ भेदुनी
चंद्रतारे धन्य तुजला आरती ओवाळुनी
गौरवाचा ग्रंथ लाभे जीवनी तव भारता

तू पुन्हा दिसणार नाहीस, दुःख केवळ हे मनी
वाहते अभिमान-सरिता मात्र त्या दुःखातुनी
ती व्यथा घृत, वर्तिका मन, ज्योत जळते अस्मिता