नभ निळे, रात निळी, कान्हाही निळा
वार्याची वेणु, फांद्यांच्या टिपर्या
गुंफतात गोफ चांदण्यात छाया
आभाळाच्या भाळावरी चंदेरी टिळा
प्राणहीन भासे रासाचा रंग
रंगहीन सारे नसता श्रीरंग
चोहीकडे मज दिसे हरी सावळा
गुंतलास कोठे नंदनंदना तू
राधेच्या रमणा केव्हा येशील तू
घट झरे रात सरे, ऋतू चालला
गीत | - | सुधीर मोघे |
संगीत | - | पं. हृदयनाथ मंगेशकर |
स्वर | - | लता मंगेशकर |
चित्रपट | - | जानकी |
गीत प्रकार | - | चित्रगीत, हे श्यामसुंदर |
रमणा | - | पती / प्रिय. |
वेणु | - | बासरी. |
राधेच्या आयुष्यातली एक कृष्णमय अवस्था अशी आहे की तिला कुठल्याच बाह्य साधनांची गरज उरलेली नाही. तिच्या अंतरंगात तिला जडलेल्या कृष्णछंदाचा रास अखंड चालू आहे आणि त्यात तिला साथ आहे केवळ निसर्गाची.. लख्ख पौर्णिमेची रात्र.. स्तब्ध यमुनाकाठ.. पूर्ण एकान्त.. पण तरीही रास रंगतच चाललाय; वार्याची वेणू झालीय; फांद्यांच्या टिपर्या ताल धरताहेत, सावल्यांचा गोफ विणला जातोय. भाळावर चंदेरी टिळा लेऊन सारी रात्रच कृष्णरूप भासतेय.. आणि तरीही कृष्णाची उणीव आहे आणि प्रतीक्षाही..
ह्या प्रसंगासाठी प्रथम लिहिलेलं गाणं आपल्या परीने चांगलंच होतं. पण 'झुलतो बाई रासझुला' लिहिताना मी त्यापेक्षाही चांगला व्यक्त झालो होतो आणि अधिक सकसही.
(संपादित)
सुधीर मोघे
गाणारी वाट
सौजन्य- मेनका प्रकाशन, पुणे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.