A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जें का रंजलेंगांजले

जें का रंजलेंगांजले ।
त्यासि ह्मणे जो आपुलें ॥१॥

तोचि साधु ओळखावा ।
देव तेथेंचि जाणावा ॥२॥

मृदु सबाह्य नवनीत ।
तैसें सज्जनांचें चित्त ॥३॥

ज्यासि अपंगिता नाहीं ।
त्यासि धरी जो हृदयीं ॥४॥

दया करणें जें पुत्रासी ।
तेचि दासा आणि दासी ॥५॥

तुका ह्मणे सांगू किती ।
तोचि भगवंताच्या मूर्ती ॥६॥
आपंगिता - आश्रयदाता, सांभाळणारा.
नवनीत - लोणी.
रंजलेगांजले - त्रासलेले, पीडलेले.
सबाह्य - आतून बाहेरून.
भावार्थ-

  • गांजलेल्या, त्रासलेल्या लोकांना जो आपले म्हणून जवळ करतो.
  • तोच साधू म्हणून ओळखावा. त्याच्या ठिकाणीच देव आहे असे समजावे.
  • लोणी हे जसे अंतर्बाह्य मऊ असते, तसेच सज्‍जनांचे मन कोमल असते.
  • ज्याला कोणी सांभाळणार नाही त्याला तो हृदयाशी धरून सांभाळतो.
  • आपल्या मुलावर जसे प्रेम करतो तसेच प्रेम दासदासींवर करणार्‍या माणसाला साधू समजा.
  • तुकाराम महाराज म्हणतात, आणखी किती उदाहरणे देऊ? तो मनुष्य म्हणजे भगवंताचीच मूर्ती समजा.

गो. वि. नामजोशी
संत तुकारामाची सार्थ अभंगवाणी
सौजन्य- सुलभ प्रकाशन, मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर भावार्थ

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.