A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जय शंकरा गंगाधरा

जय शंकरा ! गंगाधरा !

गौरीहरा, गिरिजावरा !
विपदा हरा, शशिशेखरा !

विष प्राशुनी जगतास या
दिधली सुधा करुणाकरा !
गीत - विद्याधर गोखले
संगीत - पं. राम मराठे
स्वराविष्कार- पं. राम मराठे
पं. राम देशपांडे
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक - मंदार-माला
राग - अहिर भैरव
ताल-त्रिताल
गीत प्रकार - नाट्यसंगीत
शशिशेखर - शंकर.
ज्या देशांतील भगवंत-निष्काम कर्मयोगाचा संदेश देणारा पूर्णावतार- आधीं गोकुळ वृंदावनांतील बन्‍सी बजैय्या आहे; जेथील विद्यादायिनी देवता 'वीणावर-दंड-मंडितकरा' अशी कला विलासिनी आहे; जेथील वैराग्यशील महर्षीदेखील ब्रह्मवीणेच्या नादब्रह्मांत तल्लीन होणारे संगीतशास्त्रज्ञ आहेत, त्या देशाची महान संगीत परंपरा काय वर्णावी ! ह्या परंपरेत संगीताला 'पंचम वेदा'ची पदवी प्राप्त करून देणारे थोर थोर गायक नि नायक होऊन गेले. त्यांच्यापैकी दोन-तीन गायकांच्या जीवनांतील कांहीं प्रसंगाचे आधार घेऊन, मी हें स्वतंत्र नाटक लिहिलें आहे. अर्थात् ह्यांत कांहीं गवयांच्या जीवनांतील प्रसंग आणि स्वभाववैशिष्ट्यें यांच्या छटा कोठें कोठें आढळल्या, तरी ह्याचें कथानक पूर्णतः काल्पनिक आहे.

हें कथानक इ. स. १७०० ते १८०० च्या दरम्यान, राजपुतान्यांतील एका राज्यांत घडलें असल्याचे गृहीत धरलें आहे. आणि- जनास विटलेल्या स्त्रीद्वेष्ट्या संगीतकाराचें भाव-भक्तीच्या बळावर झालेले मधुर परिवर्तन रेखाटणें, एवढेंच आहे या कथानकाचें मुख्य उद्दिष्ट, मुख्य सूत्र. नाटक महान्‌ संगीतकाराचं नि संगीतविषयक असल्यानें, त्यांत संगीताच्या विविध आविष्कारांना अग्रहक्क मिळणें क्रमप्राप्तच ठरतें, म्हणूनच कथानक मध्ययुगीन असूनहि, दरबारी राजकारणाशीं संबंधित असूनहि, तें शक्य तेवढें साधें नि सरळ ठेवण्याचा प्रयत्‍न आहे.

याला व्यावहारिक कारणहि आहे. किंबहुना आजकाल संगीत नाटक लिहू धजणार्‍या सर्व लेखकांना ताप देणारी ही अडचण आहे. तिचा निर्देश या ठिकाणी थोडक्यांत करणे गैरवाजवी ठरणार नाहीं.

जुनीं संगीत नाटकें 'अविहितगतयामा रात्रिरेवव्यरंसी' या थाटांत 'रात्रीचा समय सरुनि उषःकाल' येईपर्यंत चालत ! पण तो जमाना गुजरला. आमचा प्रेक्षक तिसर्‍या (म्हणजेच बहुधा अखेरच्या !) अंकांत चुळबुळ करीत प्रियेला 'पहा' म्हणतो, ते रंगभूमीवरच्या रंगदार उषःकालाला उद्देशून नव्हे, तर मनगटावरील घडयाळाला ! अशा या माफक रसिकतेच्या काळांत संगीत नाटके ४ तासांच्या आंत संपतील अशा बेतानें लिहिणें, हें कठीण कर्म झाले आहे. हिशेब करा. नाटक संगीतमय असेल तर त्यांत (अंकागणिक ५ या हिशेबाने) किमान १५ पर्दे येणारच. आणि प्रत्येक पदास सरासरी ५ मिनिटें धरली, तरी ७५ मिनिटे गायनांतच खर्ची पडणार. त्यांत दोन मध्यंतराच्या २०-२६ मिनिटांची भर. म्हणूनच सुमारे २ तासच गद्य-विभागाला, संभाषणांना मिळतात. साहजिकच, इच्छा असूनहि जुन्या घरंदाज नाटकांप्रमाणें कथानकाची गुंतागुंत वाढविणे किंवा स्वभावाच्या सूक्ष्म छटा वा क्रमाक्रमानें होणारा विकास दाखविणे अशक्यप्राय होऊन बसतें. मग रसाची चवर्णा कोठली? मधुर फळांचा रसदेखील प्रथम यंत्रानें बाटल्यांत नि नंतर बाटल्यांनी घशांत घटघटा लोटण्याचा हा काळ आहे !

असो. संगीत नाटकांची परेशानी सविस्तर सांगण्यांचे हे स्थळ नव्हे. एरव्ही, रूप, अभिनय नि गायन ह्या तिन्ही गुणांचा संगम असलेल्या नट-नटींचीं दुर्मिळता, "संगिताचा वापर म्हणजे जुनाटपणा, लेखणीचा कमकुवतपणा" "संगीत हे रंगभूमीला मारक आहे" इत्यादि निराधार अपसमज, यांबाबतहि विवेचन करावें लागलें असतें.

सांगण्याचा मुद्दा एवढाच की, अशा प्रतिकूल परिस्थितींत केवळ 'संगीत नाटक'च नव्हे, तर संगीताचें नाटक लिहिण्याचें धाष्टर्य मी केलें आहे. आणि अनेक गुरूजनांच्या नि मित्रजनांच्या सहकार्यानें पहिल्या प्रयोगाच्या मुक्कामापर्यंत तर येऊन पोहोंचलों आहे. आशा आहे, की 'पंडितराज जगन्‍नाथ' नि 'सुवर्णतुला' ह्या माझ्या संगीत नाटकांप्रमाणेंच हे नाटकहि आपणां रसिकांच्या पसंतीस उतरेल. आपणांस विनंती हीच कीं, अथवा विनंतीची तरी जरुरी कसली? जर या 'मंदार-माले'त कांहीं गुण नि गंध असेल, तर न सांगतांहि ती आपण कंठस्थ कराल. कळावे.
(संपादित)

विद्याधर गोखले
दि. २६ मार्च १९६३
'मंदारमाला' या नाटकाच्या पुस्तकाच्या प्रथमावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- विद्यानंद सरस्वती प्रकाशन, मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  पं. राम मराठे
  पं. राम देशपांडे