A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र (१)

जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र हा गर्जा जयजयकार
जय वारकरी, जय धारकरी, जय शिवबाची तलवार

जय अमुची प्राकृत वाणी
जय सप्तशतीतिल गाणी
जय संतकवी, जय पंतकवी, जय तंतकवी रसदार

जय यादववंशी राणा
जय शिवरायांचा बाणा
जय भीमथडी, जय वीरगडी, जय रांगडेच सरदार

जय रायगडाचा माथा
जय सिंहगडाचा ताठा
जय सह्यगिरी, पाताळदरी, जय सिंधुदुर्ग झुंजार

जय वर्‍हाडचे आजोळ
जय अजंठा नि वेरूळ
जय बारा मावळ, वाई जावळ, जय खानदेश सातार

जय गोमंतक रंगेल
जय कोल्हपूर रगेल
जय लाल वाट, जय तुंग घाट, जय कृष्णेची जलधार

जय तुळजा तुळजापूरची
जय मायभवानी अमुची
जय भावपंढरी. शिखर जेजुरी, जयतु देव मल्हार

जय सकल लोकमान्यांचा
जय सगळ्या सामान्यांचा
जय शेतकरी, जय कातकरी, जय स्वाभिमान साकार