A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जनी नामयाची रंगली

जनी नामयाची रंगली कीर्तनी
तोच चक्रपाणि धाव घेई

मुखी हरिनाम नेत्र पैलतीरी
देवाची पंढरी मोक्ष वाटे
दळिता कांडीता वाहता कावडी
चिंतनात गोडी विठ्ठलाच्या

चक्र टाकुनीया दळावे हरीने
भक्तांचे देवाने दास व्हावे
जुळो असे नाते जळो गर्व-हेवा
तुझी आस देवा पांडुरंगा
कावड - जड पदार्थ नेण्यासाठी आडव्या बांबूच्या दोन टोकांस दोन दोर्‍या बांधून त्याला ओझी अडकवण्याची केलेली व्यवस्था.
चक्रपाणि(णी) - हातात सुदर्शनचक्र असलेला- विष्णू / विष्णूचा आठवा अवतार- कृष्ण.
'जनी नामयाची रंगली कीर्तनी' या गाण्याची चाल माणिकबाईंच्याकडून बसवून घेतली. आदल्या दिवशी माणिकबाईंचा गायनाचा कार्यक्रम होता तो रात्री दोन वाजेपर्यंत चालला. तरी सुद्धा सकाळी वेळेवर माणिकबाई स्टुडिओत आल्या. आम्ही सर्वजण वाद्यवृंदासह वाट पाहतच होतो. एक छोटिसी रिहर्सल झाली व त्या रेकॉर्डिंग केबिनमध्ये गेल्या. सर्व वाद्यमेळ स्वरात मिळवून झाला. रेकॉर्डिस्‍टने दोन्ही हातांच्या बोटांनी टी ची खूण दाखवली व 'स्टार्ट'चा इशारा केला. गाणं सुरू झालं. आधीचा इन्‍ट्रो पीस झाला. माणिकबाईंनी ध्रुपदाची ओळ म्हटली. ठेका सुरू झाला. अन्‌ काहीही त्रास न होता ते गाणं 'ओके' झालं. सर्वजण बाहेर हॉलमध्ये येऊन बसलो. मी रेकॉर्डिस्‍टला सर्व गाणं पुन्हा वाजवायला सांगितलं म्हणजे त्यात काय चुका राहिल्यात हे बाराकाईने बघण्यासाठी. सर्व गाणं वाजवलं. आम्ही ऐकलं. अन्‌ मी माणिकबाईंना म्हणालो, "माणिकबाई ! गाण्यातील एक शब्दाच्या उच्चारात चूक झाली आहे. तुम्ही 'जनी हा शब्द जो म्हटला आहे त्यातील 'ज' हा 'जग' या शब्दातला म्हटला आहे, तो खरं म्हणजे 'जहाजा'तला 'ज' पाहिजे. पण त्यमुळे अर्थात खूप फरक पडला आहे."
"पुजारी ! खरंच हे माझ्या लक्षातच आलं नाही. केवढी मोठी चूक झाली. ते काही नाही. चला परत रेर्कॉर्डिंग करू."

मला आश्चर्य वाटलं. मी मनाशी म्हटलं, "या बाईची कमाल आहे. कालच्या रात्रीच्या कार्यक्रमाची दगदग, आताची रेकॉर्डिंगची मेहनत ! त्या अगदी थकल्या असतील पण पुन्हा रेकॉर्डिंगला उभं राहण्याची त्यांची जिद्द ! हे सर्व मानायलाच हवं." मग पुन्हा सर्व संच तयार झाला व रेकॉरडिंग झालं. आपली चूक प्रांजळपणे कबूल करून माणिकबाईंनी आपल्या उमद्या स्वभावाचं प्रत्यंतर दिलं.
(संपादित)

अजून त्या झुडुपांच्या मागे
संगीतकार दशरथ पुजारी यांचे आत्मकथन
शब्दांकन- वसंत वाळुंजकर
सौजन्य- आरती प्रकाशन, डोंबिवली.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.