A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जन पळभर म्हणतिल

जन पळभर म्हणतिल, 'हाय हाय !'
मी जातां राहिल कार्य काय?

सूर्य तळपतिल, चंद्र झळकतिल;
तारे अपुला क्रम आचरतिल,
असेच वारे पुढे वाहतिल,
होईल कांहि का अंतराय?

मेघ वर्षतिल, शेतें पिकतिल,
गर्वाने या नद्या वाहतिल
कुणा काळजी कीं न उमटतिल,
पुन्हा तटावर हेच पाय?

सखेसोयरे डोळे पुसतिल,
पुन्हा आपुल्या कामिं लागतिल
उठतिल, बसतिल, हसुनि खिदळतिल
मी जातां त्यांचें काय जाय?

अशा जगास्तव काय कुढावें !
मोहिं कुणाच्या कां गुंतावें?
हरिदूता कां विन्मुख व्हावें?
कां जिरवुं नये शान्‍तींत काय?