जाहला सूर्यास्त राणी
जाहला सूर्यास्त राणी, खोल पाणी जातसे,
दूरचा तो रानपक्षी ऐल आता येतसे.
मेघ रेंगाळून गेला क्षितिजरेघीं किर्मिजी,
वाजती या मंद घंटा : कंप त्यांचे गोरजीं.
वेळुंरंध्री कां परंतू जीवघेणी स्तब्धता?
कां समेच्या पूर्विची ही आर्त आहे शांतता?
काचसा काळोख भोती : त्यांतुनी गावांतल्या
थेंब जैशा दीपपंक्ती हालती काळ्यानिळ्या.
पारवा शेला तुझा हा : स्पंदनें का त्यावरी?
दूर दृष्टी लागली कां? कां तनू ही बावरी?
धून पर्णी निर्झराची लागली आता भरूं
नेत्र कां ओथंबले गऽ? हात हातीं ये धरूं.
जाहला सूर्यास्त राणी, खोल पाणी जातसे,
दूरचा तो रानपक्षी ऐल आता येतसे.
दूरचा तो रानपक्षी ऐल आता येतसे.
मेघ रेंगाळून गेला क्षितिजरेघीं किर्मिजी,
वाजती या मंद घंटा : कंप त्यांचे गोरजीं.
वेळुंरंध्री कां परंतू जीवघेणी स्तब्धता?
कां समेच्या पूर्विची ही आर्त आहे शांतता?
काचसा काळोख भोती : त्यांतुनी गावांतल्या
थेंब जैशा दीपपंक्ती हालती काळ्यानिळ्या.
पारवा शेला तुझा हा : स्पंदनें का त्यावरी?
दूर दृष्टी लागली कां? कां तनू ही बावरी?
धून पर्णी निर्झराची लागली आता भरूं
नेत्र कां ओथंबले गऽ? हात हातीं ये धरूं.
जाहला सूर्यास्त राणी, खोल पाणी जातसे,
दूरचा तो रानपक्षी ऐल आता येतसे.
गीत | - | आरती प्रभू |
संगीत | - | राहुल घोरपडे |
स्वर | - | रवींद्र साठे |
गीत प्रकार | - | कविता |
पारवा | - | कबुतराची एक जात किंवा त्याच्या रंगाचा. |
वेळू | - | बांबू. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.