A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
इवल्याइवल्या वाळूचं

इवल्याइवल्या वाळूचं
हे तर घरकुल बाळूचं
बाळू होता बोटभर
झोप घेई पोटभर
वरती बाळू
खाली वाळू
बाळू म्हणे की, "इथेच लोळू"
उन्हात तापू लागे वाळू
बाळूला ती लागे पोळू
या इवल्याशा खोपेत
बाळू रडला झोपेत !

एक वन होतं वेळूचं
त्यात घर होतं साळूचं
साळू मोठी मायाळू
वेळू लागे आंदोळू
त्या पंख्याच्या वार्‍यात
बाळू निजला तोर्‍यात !
एकदा पाऊस लागे वोळू
भिजली वाळू, भिजले वेळू
नदीला येऊ लागे पूर
बाळू आपला डाराडूर

भुर्रकन्‌ खाली आली साळू
आणि म्हणाली, "उठ रे बाळू"
बाळू निजला जैसा धोंडा
तोवर आला मोठा लोंढा
साळूनं मग केलं काय?
चोचीत धरला त्याचा पाय
वेळूवरती नेले उंच
आणि मांडला नवा प्रपंच
बाळूचं घरकुल वाहून गेलं
साळूचं घरटं राहून गेलं !

साळू आहे मायाळू
बाळू बेटा झोपाळू
वाळू आणि वेळूवर
ताणून देतो खालीवर
साळू म्हणते, "गाऊ, खेळू"
बाळू म्हणतो, "इथंच लोळू."
आमची गोष्ट आखुड
संभ्याच्या पाठीत लाकूड