A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
हिमालयाच्या पावनखिंडीत

हिमालयाच्या पावनखिंडीत लढतो बाजीचा निर्धार
विशालगड हो विशाल देशा आक्रमकांचा कर संहार

हिमालयाची खिंड खिंड ती हिंद भूमीचे आहे द्वार
त्या दारातून दुष्मन आले तुडवाया अपुले घरदार
त्या शत्रुंना छाती देऊन सैनिक लढती बाणेदार
एक एक अभिमन्यू पडतो आठ दुष्मना मारित ठार
त्या वीरांची हाक तुम्हाला देश रक्षणा व्हा तयार

शत्रुचे रणगाडे येती घेत मुसंडी भराभर
आज हिमालय उद्या यमुना परवा रामेश्वरावर
लोकशाहीचा पाडून रौंदा संगिनी बसतील घरावर
समय लक्षुनी समरदक्ष व्हा नाहीतर शत्रु उरावर
रणकंकण हे बांधुन हाती व्हारे सारे होशियार

मर्द उठा रे, वृद्ध उठा रे, उठा रे बालक रामांनो
ऊठ तान्हबा, ऊठ रायबा, उठा रे शेलार मामांनो
चांदबीबी नि राणी लक्ष्मी उठा जिजाई मातांनो
ऊठ सह्याद्री ऊठ विंध्याचल उठा रे सोळा प्रातांनो
हिंदू-ख्रिस्‍त-मुस्लिम सर्व या करुया शत्रू हद्दिपार