भवतारका अभयंकरा
तुझिया प्रसादे उज्ज्वला
नवरत्न गर्भा ही धरा
तिमिरात तेजोगोल तू
वणव्यात शीतल चंद्र तू
सृजनातही आरंभ तू
ओंकार-रूप शुभंकरा
गीतातला शब्दार्थ तू
शब्दांतला भावार्थ तू
भावातला गूढार्थ तू
सत्यातल्या शिव-सुंदरा
अशिवास दे शुचिमानता
प्रीतीस अर्पणशीलता
विश्वास दे एकात्मता
दे बंधुता जनसागरा
गीत | - | सुधीर मोघे |
संगीत | - | राम फाटक |
स्वर | - | पं. भीमसेन जोशी |
गीत प्रकार | - | भक्तीगीत |
अभयंकर | - | शंकराचे एक नाव. |
शिव | - | मंगल, कल्याणकारी. |
सृजन | - | निर्मिती. |
आपल्याभोवती पसरलेलं हे सगुण आणि निर्गुण विराट विश्वरहस्य ही माझी, माझ्यापुरती ईश्वर कल्पना आहे. माझ्या या मूलभूत जाणिवेच्या अनेक खुणा माझ्या कविता-गीतांतून ठायीठायी दिसतात. अगदी आरंभ काळात पुणे रेडिओवर संगीतकार राम फाटक आणि गायक पं. भीमसेन जोशी यांच्यासाठी मी एक प्रार्थनागीत लिहिलं होतं, तेव्हा ही माझी सुप्त भूमिका नकळत, पण प्रथमच व्यक्त झाली.
हे नायका.. जगदीश्वरा
भवतारका.. अभयंकरा
तुझिया प्रसादे उज्ज्वला
नवरत्नगर्भा ही धरा..
(संपादित)
सुधीर मोघे
सौजन्य- दै. लोकसत्ता (२९ सप्टेंबर, २०१३)
(Referenced page was accessed on 1 February 2017)
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
एकदा रामभाऊ फाटकांवर सविस्तर म्हणजे खूपच सविस्तर लिहायला हवं आहे. कारण हा ऋणानुबंध हा कुठल्यातरी अनेक जन्मांच्या पुणाईनेच मला लाभला होता अशी माझी भावना आहे. त्यांची माझी प्रत्यक्ष ओळख झाली ह्या घटनेलाही तीन दशकं होऊन गेली. कसलीही अतिशयोक्ती न करता मी असं म्हणेन की त्यांची आठवण झाली नाही असा एकही दिवस आजवर गेला नाही.. ते ह्या देशात असताना आणि परदेशात असताना.. ते ह्या जगात असताना आणि ह्या जगात नसतानाही.. व्यक्तिगत ऋणानुबंध क्षणभर बाजूला ठेवायचा म्हटला तरी केवळ कलाजीवनापुरतंही त्यांचं माझ्यावरचं ऋण कधी न फिटणारंच आहे. कारण 'कवी-गीतकार' म्हणून मला पहिला प्रकट प्रकाश लाभला तो रामभाऊंमुळेच. त्यांच्याबरोबर केलेल्या अगदी पहिल्या गाण्याची आठवण आज इथे सांगायची आहे.
एके दिवशी ते मला म्हणाले, "हे बघ, रेडिओसाठी एक भक्तीगीत करायचे आहे, भीमसेन गाणार आहेत.. लिहिणार का?" रेडिओ आणि भीमसेनजी हे दोन शब्द ऐकल्यावर मी नाही कसला म्हणतोय. पण तरीही त्या 'भक्तिगीत' ह्या शब्दाने अंमळ बिचकवलंच. म्हटलं, "रामभाऊ, तो माझा पिंड नाही.. तसा मी नास्तिक वगैरे नाही.. पण विठ्ठल, दत्त अशा कुठल्यातरी दैवताला पकडून आळवणं आपल्याला जमणार नाही.."
ते हसून म्हणाले, "ठीक आहे, तू तुझ्या पद्धतीने लिही. बरं, भीमसेन गाणार म्हणून मी त्या थाटाची चाल केली आहे.. ऐकवतो.." रामभाऊंची चाल खरोखर छानच होती. भीमसेनजींच्या गायकीचा बोझ दाखवणारी.. पण चाल ऐकवताना रामभाऊंनी एक घोळ केलाच. चालीची उठावण करताना ते जोरकसपणे 'शंकरा.. ल.. ला..ला..' अशी ती चाल गंगाजमनी शैलीत गात होते. मी गडबडून म्हणालो, "रामभाऊ, हे 'शंकरा' काय प्रकरण आहे?"
जोरदार हसून रामभाऊंनी "अरे, ते आपलं माझ्या सोयीसाठी आहे.. तू ते ऐकू नकोस." असं उलट मलाच बजावलं. अखेर 'मायनस शंकरा' अशी ती चाल डोक्यात घोळवत घरी आलो आणि कवितेची आराधना करू लागलो. मनात खरा प्रश्न होता तो असा की ज्या निर्गुणाला आळवायचं आहे त्याला हाक काय मारायची? आधी बर्याच विनवण्या करून त्या 'शंकरा'ला कैलासावर पाठवावं लागलं.. अखेर एक मनाजोगतं संबोधन ओठावर आलं.. 'हे नायका..' मग पुढचं गीत केव्हा जुळत गेलं, कळलंही नाही..
हे नायका.. जगदीश्वरा
भवतारका.. अभयंकरा
तुझिया प्रसादे उज्ज्वला
नवरत्नगर्भा ही धरा..
दुसर्या दिवशी धडधडत्या अंत:करणाने रेडिओत गेलो. बरोबर अजित सोमण होता. त्याने धीर दिला. कविता छान जमलीय. रामभाऊंना नक्की आवडणार. मलाही ती खात्री होतीच. पण एका विशिष्ट वळचणीच्या जागी पाल चुकचुकत होती. कविता वाचून रामभाऊ खरोखरच प्रसन्न झाले. मी सुटकेचा नि:श्वास सोडणार तेवढ्यात त्याच वळचणीला पालीचा आकांताचा चुकचुकाट आणि पाठोपाठ रामाभाऊंचे शब्द आले, "पण काय सुधीर, ह्या 'नायका'ऐवजी दुसरं काही मिळेल का?"
बरीच वादावादी.. रामभाऊंचं आपलं एकच टुमणं- "नाही, हा नायका शब्द छानच आहे रे.. पण बघ ना आणखी काही.." अखेर मी माझ्यातल्या भावुक कवीला रजा देऊन धोरणी पुरुषाला कामाला लावला. म्हणालो, "असं करूया रामभाऊ, मी जरा बाहेर जाऊन येतो. विचार करतो. पण तुम्हाला एकच अट. मी येईतो इथे ह्या माझ्या ओळी म्हणत राहायच्या. पण 'नायका' म्हणायचं. 'शंकरा' नाही. अजित आणि मी जरा भटकून पुन्हा आलो. मी आकाशवाणीच्या पायर्या चढतोय तेवढ्यात रामभाऊ मला पाहून दुरूनच ओरडले, "सुधीर, हा नायका मस्तच आहे. तुला दुसरं सुचलं असलं तरी ते नको.." मी विचारच केला नव्हता तिथे सुचणार काय? पण एकूण 'आनंदी आनंद गडे, जिकडेतिकडे चोहिकडे' असं होऊन गेलं.. भीमसेनजी ते गीत सुरेखच गायले. माझी नौकाही हळूहळू प्रवाह पकडत निघाली. मग एक अभ्यासाचा भाग म्हणून मी ह्या सार्याचा विचार केला.. नंतर इतकं आवडलेलं 'नायका' हे संबोधन आधी रामभाऊंना का पचत नव्हतं आणि नंतर नेमकी काय जादू झाली की त्यांना दुसर्या पर्यायाची कल्पनाही नकोशी झाली.. कदाचित असं असेल.. एक तर तो आधीचा 'शंकरा' त्यांच्या तोंडात आणि त्यामुळे डोक्यात फिट्ट बसला होता. तो 'शंकरा' तरी का? तर त्या अनुस्वाराच्या उच्चारणाने चालीच्या उठावणीला एक जोरदार 'पंच' मिळत होता. मीही मुद्दाम विचारपूर्वक हे केलं होतं असं नाही. पण वाचनाइतकाच वाणी आणि श्रवण ह्यांच्या माध्यमामधून कवितांचा भरपूर अभ्यास झाला असल्यामुळे कवितेच्या आशय-रंग-रूप ह्याबरोबरच तिच्या नादरूपाचं भानही कुठेतरी आत भिनलं आहे. 'नायका' हा शब्दाची निवड करतानाही ते जागं असणार. 'नायका' ह्या शब्दात अनुस्वराचा आभाव असला तरी 'न' हे अक्षर मुळात सानुनासिकतेच्या जवळ जाणारंच. त्यामुळे 'नायका' हा शब्द चार-पाच वेळा ठाशीवपणे म्हणून पहिल्यावर त्यांना हवा तो पंच रामभाऊंना त्यातून नकळत जाणवू लागला असणार. एरवी संबोधन म्हणून ते आपल्या जागी अर्थपूर्ण आणि वेगळं आहेच. अर्थात हे सारे माझे तर्क.. खूपदा मनात येऊनही हा खुलासा त्यांच्याकडून करून घेणं राहिलं ते राहूनच गेलं.. आणि आता कुणाला विचारणार?
(संपादित)
सुधीर मोघे
कविता सखी
सौजन्य- परम मित्र पब्लिकेशन्स्, ठाणे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.