श्री. विनायक दामोदर सावरकर यांचे नांव न ऐकलेला महाराष्ट्रीय विरळा. मागच्या पिढीपैकी पुष्कळांनी जरी त्यांचें वक्तृत्व ऐकलें नसलें तरी त्यांनीं रचलेला तानाजीचा अथवा बाजीप्रभू देशपांडे यांचा पोवाडा एकाद्या गणेशोत्सवप्रसंगीं कुठें ना कुठें तरी ऐकला असेल. त्यांतील काव्य, भाषाप्रभुत्व व ओजस्विता पाहून त्यांनीं आनंदानें मानाही डोलवल्या असतील. या तेजस्वी पुरुषानें राष्ट्रीय कामगिरीबरोबरच स्वदेशाभिमान स्फुरवणारी उत्तम कविता लिहून मराठी भाषेची मोठी सेवा केली आहे, याची जाणीव मात्र त्या पिढींतल्या व अलीकडल्या पिढींतल्याही वाचकांस नसेल. श्री. विनायकराव सावरकरांच्या साठाव्या वाढदिवसाचे प्रसंगानें त्यांच्या कवितांचा संग्रह छापावा, असें त्यांच्या कांहीं चहात्यांस वाटत होतें. त्याबद्दलची व्यवस्थाही कशी करावी, हे ते पहात होते. इतक्यांत हें काम मींच करावें असें अगदीं अकल्पितपणें सुचविण्यांत आलें आणि विनायकराव सावरकर यांचेबद्दल माझे मनांत आदर असल्यामुळें व आधुनिक मराठी कवितेंत अशा पैलूच्या काव्याची भर जरूर पडावी, असे मला वाटत असल्यामुळे, सावरकरांच्या कवितेच्या संपादनाचें काम मी माझ्या अंगावर घेतलें.
हे काम घेतलें खरें पण सावरकरांची कविता एकत्र सांपडणें किती अवघड होतें, याची कल्पना मला त्यावेळेस नव्हती. त्यांच्या कांहीं भक्तांनीं त्यांच्या कांहीं कविता कुठें तरी, केव्हां तरी व जमतील तशा छापून टाकलेल्या; कांहीं कुणींतरी वह्यांतून उतरून घेतलेल्या; कांहीं कुणाजवळ तुकड्याताकड्यांवर आलेल्या व कांहीं तर कुणाला नुसत्या पाठ. अशा सर्व ठिकाणांहून या कविता गोळा करता करतां माझे बरेच दिवस गेले. नंतर अशी गोळा केलेली कविता प्रथम विनायकरावांना दाखविली. त्यांच्याकडून तपासून ती बरोबर असल्याची त्यांनीं खात्री दिल्यावर मग ती या संग्रहात घेतली आहे. असें असून यांतील एकूण एक पान, लेखनस्थळ व लेखनकाल अगदीं निखालासपणें बिनचूक असतील अशी खात्री देणें कठिण; तथापि या सर्व गोष्टी बहुतांशी बरोबर असाव्यात, अशी निरनिराळ्या पुराव्यांवरून खात्री करून घेऊन मग छापलेल्या आहेत.
सावरकरांच्या कवितेचे साधारणपणें चार खंड पडतात. पहिला १८९३ ते १९०२ ; दुसरा १९०३-१९१२; तिसरा १९१३ ते १९२४ व शेवटचा १९२४ ते आतांपर्यंतचा. पहिल्या कालखंडांतील कवितांकडे नजर टाकली तर त्यांची या काळांतील कविता पुस्तीसारखी आहे. ते फटके, लावण्या, पदें, पोवाडे, संस्कृत वृत्तें, आर्या, लिहून पहात होते. त्यांनीं भाषांतरही करून पाहिले. या धडपडीमुळे त्यांनी लेखनांत किती प्रगति केली हे १९०२ सालांतील कविता वाचून लक्षांत येईल. दुसर्या कालखंडांतील कवितांत, हा नमुन्याकडे पाहून लिहीत बसण्याचा स्वभाव कमी होत जाऊन मिळवलेल्या प्रभुत्वानं आपली भावना रसाळ व रसरशीत तर्हेनें कशी मांडली जाईल एवढेच ते पाहात असावेत, असे दिसतें. दुर्दम्य उत्साह, विलक्षण आत्मविश्वास, अचाट धैर्य व अतुल निर्भयता त्या कवनांतून व्यक्त झाली आहे. त्या भावनांची खळबळ योजलेल्या शब्दांनीं मनावर इतकी उमटते कीं, त्यापुढे कवितेंतील बाह्यांगाकडे वाचकाचें लक्षच जात नाहीं व तो कवितेच्या अंतरंगाने बेभान होतो. या काळांतील त्यांच्या कवितेचें रूप साधे आहे, सोपें आहे, सुंदर आहे, ओजस्वी आहे, उदात्त आहे. तिसर्या कालखंडांतील कवितांचें स्वरूप हुतात्म्याचें गांभीर्य, जबाबदारी व लोकोत्तरता प्रकटवणारें झालें आहे. कल्पनेचा खेळकर विलास जरी या वेळच्याही कवितांत क्वचित् दृग्गोचर झाला तरी यावेळची त्यांची बहुतेक कविता एकाद्या अनुभवी, गंभीर, तत्त्वचिंतक योग्यास साजेशी वाटते. १९२४ च्या नंतरची कविता मात्र प्रचारावर नजर ठेवून लिहिल्यामुळे आधींच्या कालखंडांतील कवितेहून वेगळ्या स्वरूपाची आहे.
त्यांच्या उपलब्ध कवितेची बरीच बिनचूक अशी गणती केली आहे व ती कविताक्रमानंतर दिली आहे. त्यावरून ती दहा हजार ओळींहून अधिक आहे हे वाचकांचे ध्यानीं येईल.
विनायकरावांनीं स्वागतार्थं श्लोक लिहिले, तमासगीरांसाठीं लावण्या लिहिल्या, मेळ्यासाठीं पदें, फटके व पोवाडे लिहिले. पंतांचे थाटावर गंगावकिलीप्रमाणे गोदावकिली लिहिली. मेघदूताचे घर्तीवर आकांक्षा काव्य लिहिलें. एकाद्या आख्यानाप्रमाणें कमलेची काव्यकथा लिहिली. विरहोच्छ्वास लिहिले. आपलेकडील महाकाव्याच्या कल्पनेप्रमाणे एक महाकाव्य लिहिण्याचा संकल्प करून त्या महाकाव्याचीं कमला, महासागर व गोमांतक यांसारखीं उपाख्यानें, आख्यानें व पदें लिहिली. असे भावना प्रकट करण्याकरितां निरनिराळे काव्याचे नमुने त्यांनीं हाताळून पाहिले. या सर्व नमुन्यांत पोवाडे लिहिण्यांत त्यांचा विक्रम आहे.
सावरकरांच्या काव्यरत्नाकराचीं रूपें सागराच्या रूपाप्रमाणे विविध प्रकारची आढळतात. सागर शांत असतां स्वच्छ, आनंदी व खेळकर दिसतो. त्यानें जरा कठोर रूप धारण करतांच तो गढूळ, गंभीर व खोल भासतो. पण तो कराल होतांच बेताल अथांग व काळासारखा वाटतो. सावरकरांची कविता अशींच विविध रूपे धारण करते. ती कांहीं वेळ तरल कल्पनातरंगांत रमते, कांहीं वेळां ती रोखठोक वीर भावनांत बलशाली दिसते व कांहीं वेळां तर ती भरवतांडवनृत्य करतांना आढळते. या सर्व प्रकारची उदाहरणे वाचकांस या कवितासंग्रहांत सांपडतील.
कवि परचित्तप्रवेश करून निरनिराळ्या भावनांवर लिहू शकतो याबद्दल कुणालाही शंका नाहीं. स्थानबद्ध, विवसित व वेळीं तुरुंगांतून सश्रम सजा भोगत असलेल्या देशभक्तांचे मनांत उसळणारे उद्वेग, भावना, आशा, आकांक्षा कवीला त्याचा प्रत्यक्ष अनुभव नसूनही मांडतां येतील. पण विनायकरावांनी या सर्व अवस्था स्वतःच अनुभविल्या असल्यामुळे त्या भावना किती जिवंत चितारलेल्या आहेत हे त्यांच्या कविता वाचूनच कळेल. कारावासांत कांहीं कारणानें पडल्यावर कांहीं तरी आवडीच्या विषयावर उत्तम ग्रंथलेखन केलेल्या विभूतींना कमी लेखण्याचा माझा मुळींच हेतु नाहीं. परंतु स्वदेशभक्तीपायच कारागृहांत पाहून, तेथील यातना भोगीत असतांना, हालांत पिचत असूनही हतबलता झुगारून, दुर्दम्य आशावादानें आपली देशोद्धाराची तळमळ रात्रंदिवस मनोमंदिरांत तेवत ठेवून त्याकरितांच आपली काव्यशक्ति खर्च करणारे कविशार्दूल इतर राष्ट्रांतूनही आतांपर्यंत फार थोडे आढळतील. ही गोष्ट लक्षांत आल्यावर वाचक त्यांची जरा कठिण वाटणारी कविता वेळीं थोडे कष्ट घेऊनही वाचतील अशी मला आशा आहे.
(संपादित)
वासुदेव गोविंद मायदेव
दि. २८ मे १९४३
'सावरकरांची कविता' या वासुदेव गोविंद मायदेव संपादित काव्यसंग्रहाच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- केशव भिकाजी ढवळे प्रकाशन, मुंबई.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
इतर संदर्भ लेख