मठाची उठाठेव कां तरी
वनांत अथवा जनांत हो कां मनांत व्हावें परि
हरीचें नांव भवांबुधितरी
काय गळ्यांत घालुनि तुळशीचीं लांकडें
हीं काय भवाला दुर करतिल माकडें
बाहेर मिरविशी आंत हरिशिं वांकडें
अशा भक्तिच्या रसारहित तूं कसा म्हणविशी बुधा
हरिरस सांडुनि घेशी दुधा
भला जन्म हा तुला लाधला खुलास ह्रदयीं बुधा
धरिशि तरि हरिचा सेवक सुधा
शिळाटोपिवर शिळा पडो या बिळांत करिसी जपा
तथापि न होय हरिची कृपा
दर्भ मुष्टिच्या गर्भिं धरुनि निर्भर पशुची वपा
जाळिशी तिळा तांदुळा तुपा
दंडकमंडलुबंड माजविशि मुंड मुंडिशी तपा
न सार्थक लटक्या सार्या गपा
ही बारबार तलवार येईल काय पुन्हा?
ह्या दुर्लभ नरदेहांत ठेविशी कुणा
भगवंत भुकेला भक्तीचा पाहुणा
वर्म कळेना धर्म घडेना कर्म चित्त न द्विधा
सदा हरि कविरायावर फिदा
गीत | - | शाहीर रामजोशी |
संगीत | - | वसंत देसाई |
स्वर | - | जयराम शिलेदार |
चित्रपट | - | लोकशाहीर राम जोशी |
गीत प्रकार | - | चित्रगीत, लोकगीत |
पट | - | वस्त्र / सोंगट्या, बुद्धिबळे इ. ज्यावर मांडतात ते वस्त्र. |
बुध | - | शहाणा / पंडित. |
भव | - | संसार. |
लाधणे | - | लाभणे. |
वपा | - | चरबी. |
वर्म | - | दोष, उणेपणा / खूण. |
सुधा | - | अमृत / सरळ, योग्य मार्गाने जाणारा. |
हटातटी | - | तडकाफडकी. |
भला जन्म हा तुला लाधला खुलास ह्रदयीं बुधा
धरिशि तरि हरिचा सेवक सुधा
चराचरीं गुरू तरावयाला नरा शिरावरी धरी
जरा तरि समज धरीं अंतरी
हटातटानें पटा रंगवुनि जटा धरिशि कां शिरीं
मठाची उठाठेव कां तरी
वनांत अथवा जनांत हो कां मनांत व्हावें परि
हरीचें नांव भवांबुधितरी
काय गळ्यांत घालुनि तुळशीचीं लांकडें
हीं काय भवाला दुर करतिल माकडें
बाहेर मिरविशी आंत हरिशिं वांकडें
अशा भक्तिच्या रसारहित तूं कसा म्हणविशी बुधा
हरिरस सांडुनि घेशी दुधा
जाळ गळ्यामधिं माळ कशाला व्याळ काम कोपला
आंतुनि, बाहेर म्हणविशि भला
वित्त पाहता पित्त येतसे चित्त पाहिजे मला
असें हरि म्हणतो नुमजे तुला
वर संभावित दांभिक अभ्यंतरिं नाहिंस बिंबला
बहिर्मुख नर नरका लाधला
तूं पोटासाठीं करि खटपट भलतिशी
परि भक्तिरसाविण हरि भेटल काय तुशीं
काय मौन धरुनिया गोमुखिला जाळिशी
स्वार्थसुखें परमार्थ बुडविला अनर्थ केला मुधा
न जाणसि कांजी म्हणसी सुधा
टिळाटोपिवर शिळा पडो या बिळांत करिसी जपा
तथापि न होय हरिची कृपा
दर्भ मुष्टिच्या गर्भिं धरुनि निर्भर पशुची वपा
जाळिशी तिळा तांदुळा तुपा
दंडकमंडलुबंड माजविशि मुंड मुंडिशी तपा
न सार्थक लटक्या सार्या गपा
ही बारबार तलवार येईल काय पुन्हा?
ह्या दुर्लभ नरदेहांत ठेविशी कुन्हा
भगवंत भुकेला भक्तीचा पाहुणा
वर्म कळेना धर्म घडेना कर्म चित्त न द्विधा
सदा हरि कविरायावर फिदा
संदर्भ-
म. वा. धोंड
मर्हाटी लावणी
सौजन्य- मौज प्रकाशन, मुंबई.
मुद्गलशास्त्री हे 'वेदमूर्ती' म्हणून प्रसिद्ध होते. ते नामवंत पुराणिक होते. काव्यरचनेकडेही त्यांचा ओढा होता. वडिलांच्या निधनानंतर आपले धाकटे बंधु रामजोशी यांचा त्यांनीच प्रतिपाळ केला. स्वत: मद्गलशास्त्री पुराणप्रवचन सांगणारे व स्वतंत्र प्रतिभेने संस्कृतमध्ये आणि मराठीतही काव्यरचना करणारे पंडितकवी होते. त्यांचे संस्कृत व मराठी या दोन्ही भाषांवर प्रभुत्व होते. रघुवंश महाकाव्याच्या धर्तीवर त्यांनी संस्कृतमध्ये 'यदुवंश' नावाचे काव्य रचिले होते. 'महिष्मतीभूषण' नावचेही एक काव्य त्यांनी लिहिल्याचा उल्लेख आढळतो.
मृद्गलशास्त्री यांना रामजोश्यांच्या जीवनात मोठेच स्थान आहे. आई-वडिलांच्या मागे रामजोशांचा सांभाळ शास्त्रीबुवांनी व त्यांच्या पत्नी सौ. गंगाबाई यांनीच केला. मृद्गलशास्त्र्यांच्या मुळेच कदाचित रामजोशांनाही कवित्वाकडे वळव्याची स्फूर्ती मिळाली असावी.
रामजोशांची वृत्ती ठराविक चाकोरीतून जाणारी नसल्याने पूर्वापार संस्कृत अभ्यासापेक्षा तमाशात रमणार्या मंडळींच्या फडातच रामजोशी अधिक रमू लागले. जोशीबुवांच्या घरासमोर धोंडी नावाचा शाहीर रहात असे. रामजोशी त्याच्या बैठकीत जातयेत असत. तेथेच त्यांना लावणीवाङ्मयाची गोडी उपजली व ते लावणीरचना करू लागले. परंतु कदाचित आपल्या वडिलबंधूना दु:ख होईल म्हणून रचनेच्या शेवटी 'कविराय' अशी नाममुद्रा ते घालू लागले. ('व्यंकटपती' व 'राम' ही नावेही काही लावण्यांच्या अखेरीस त्यांनी घातली आहेत, असे म्हटले जाते.)
रामजोशांचे वागणे पसंत न पडल्याने मृद्गलशास्त्री यांनी इ. स. १७७८ मध्ये फारकत लिहून उभयतात वाटणी केली होती. 'आपण व तुम्ही एके स्थळी असता चालेनासे जाहले, कजिया होऊ लागला. यानिमित्त विभक्त जालों.' असे या फारकत पत्रात म्हटले आहे.
भावापासून वेगळे निघाल्यानंतर रामजोशांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. प्रापंचिक जबाबदारी नीट पार पाडता येईना. शेवटी ते पंढरपूर येथे वे. शा. सं. बाबा पाध्ये यांचेकडे अध्ययन करण्यासाठी जाऊन राहिले. तेथे काही वर्षे त्यांनी विद्याध्ययनात घालविली व उत्तम विद्या संपादन केली. कीर्तनाचीही कला हस्तगत करून ते सोलापूरला परत आले.
रामजोशी व बारामतीस राहणारे कविवर्य मोरोपंत यांची, भेट हा रामजोशी यांच्या जीवनातील एक परिवर्तनाचा भाग ठरला. बारामतीस बाबूजी नाईक यांच्या घरी या दोघांची भेट झाली. उभयतांना एकमेकांविषयी प्रेमभाव व आदर वाटू लागला. 'भला जन्म हा तुला लाधला' ही लावणी ऐकून मोरोपंतांचे मन रामजोशांविषयी पालटले व ते कागदोपत्री 'कविप्रवर' असे रामजोशांना संबोधू लागले. रामजोशी कथा-कीर्तनातून मोरोपंताच्या आर्या आपल्या मधूर शैलीने म्हणून दाखवीत आणि तिच्या अर्थातील अनेक पदर उकलून दाखवीत. रामजोशांनीच मोरोपंतांची कवित्वकीर्ती अखिल महाराष्ट्रात पसरून दिली, असे मानले जाते.
मोरोपंतांचा आदर्श पुढे असल्यामुळे रामजोशांच्या कवितेत पांडित्याची झाक अधिक दिसू लागली. कदाचित या कविवर्यांच्या सहवासामुळेच रामजोशांच्या कवितेत यमकानुप्रासाची लयलूट, भाषेची सजावट व संस्कृत शब्दांचा मनसोक्त वापर, या गोष्टी आधिक्याने आल्या असाव्यात.
अशी आख्यायिका आहे की, रामजोशींनी आपला 'डफ' मोरोपंतांच्या पायाशी फोडून टाकला आणि एका अर्थी त्यांचे शिष्यत्व पत्करले. काव्याला निराळे वळण लागले. मोरोपंती थाटाची रचना होऊ लागली. वैराग्यपर व उपदेशपर कवनेही अधिकाधिक निर्माण झाली.
पुढे रामजोशी महाराष्ट्रात गावोगाव कीर्तने करीत हिंडत असत. पुण्यासही त्यांची कीर्ती जाऊन पोचली. कीर्तनकार म्हणून त्यांनी प्रशंसा संपादन केली. सुप्रशिद्ध इतिहाससंशोधक व टीकाकार श्री. य. न. केळकर यांनी आपल्या 'तंतकवि तथा शाहीर' या पुस्तकात रामजोशांना पेशव्यांकडून बिदागी वगैरे कशी मिळत असे, हे सप्रमाण दाखवून दिले आहे. ते म्हणतात,
"पुण्यात १७९३ पासून रामजोशाची उत्तम कीर्तनकार म्हणून ख्याती सुरू झाली. त्या साली कोणा गोविंदराव बाजी जोशी नावाचे गृहस्थाने स्वत:च्या घरी रामजोशाचे प्रथम कीर्तन करविले. दुसर्या बाजीरावाचे आणि त्यांचा दिवाण सदाशिव माणकेश्वर, यांचे जे खसगी जामाखर्च उपलब्ध झाले आहेत त्यावरून बाजीराव सरकारवाड्यात रामजोशाची कीर्तने नेहमी करवीत, असे दिसते. १८०८ सालच्या जमाखर्चात गोकुळाष्टमीस शुक्रवारचे वाड्यात रामजोशाची कथा करवून, दुसरे दिवशी त्यास पारण्यास भोजनाचे बोलावून, शंभर रुपये दक्षिणा देण्यात आली होती. स्वत: बाजीराव रामजोशाच्या घरी एकदा जेवावयास गेले होते. ते वेळी त्यांनी देवापुढे शंभर रुपये दक्षिणा ठेवली. या १८०८ सालच्या जमाखर्चावरून कमीत कमी हजार रुपये तरी पेशव्याकडून रामजोश्यास मिळाले. कारणपरत्त्वे दिलेल्या बिदाग्या व देणग्यांखेरीज बाजीरावांनी त्याला दरमहा पंचवीस रुपयांची नेमणूकही करून दिली."
वरील विवेचनावरून रामजोशांची त्यावेळची परिस्थिती व प्रतिष्ठा, यावर प्रकाश पडतो.
रामजोशांना पैसा खूप मिळाला तरी तो त्यांच्याजवळ राहिला मात्र नाही. चैनबाजी व व्यसनाधीनता यामुळे रामजोशी सदैव द्रव्याकांक्षीच राहिले. त्यांचा गावोगाव हिंडतानाचा थाट एखाद्या संस्थानिकासारखा असे, म्हणतात. बरोबर बया व चिमा या कलावंत स्त्रिया असत. रामजोशांचा स्वभाव तसा उधळ्याच होता. परिवाराबरोबर दोन कुत्री, दोन माकडे, दोन राघू, एक मोठा घोडा असे. शिवाय बसण्यासाठी रेशमी काडण्याचा झोपाळा आणि विलासाची साधने असत, ती निराळीच. शाक्तपंथाची दीक्षा घेतल्याने मद्यपानासही मज्जाव नव्हता. तेव्हा रामजोशांना मोठमोठ्या बिदाग्या मिळूनही शिल्लक अशी कधीच रहात नसे.
समयसूचकता व शीघ्रकवित्व हे गुण रामजोशांचे अंगी होते. यासंबंधी बर्याच अख्यायिका उपलब्ध आहेत. बहुरंगी बहुढंगी जीवन जगून व आपल्या सरस लावणी रचनेची मोहिनी महारष्ट्रावर टाकून रामजोशी इ. स. १८१३ साली स्वर्गस्थ झाले. समकालीन कवी, पंडीत, वेदांतवेत्ते, संस्थानिक व पेशवे या सर्वांचे रामजोशांच्या कवित्वगुणांवर प्रेम होते, असे आढळून येते. संस्कृत साहित्यशास्त्रात प्रावीण्य असून मराठीत प्रभावी रचना करणारा रामजोशांसारखा शाहीर विरळा. त्यांच्या शृंगारीक काव्याइतकीच त्यांची उपदेशपर, क्षेत्र-दैवतपर कविता प्रसिद्ध आहे.
(संपादित)
वासुदेव लक्ष्मण मंजूळ
'शाहीर रामजोशी' या पुस्तकाच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- उत्कर्ष प्रकाशन, पुणे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.