A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
हरीची ऐकताच मुरली

हरीची ऐकताच मुरली
राधिका राधिका न उरली

आसावरीचे सूर कोवळे
पहाटवारा पिउनी आले
घुसळण करिता हात थांबले
डेर्‍यामधुनी दह्यादुधातुनी यमुना अवतरली

वेड असे कैसे विसरावे?
फुलातुनी गंधा तोडावे
नभातुनी रंगा वगळावे
वेडी राधा, वेडा माधव, वेडी ती मुरली
रंगण्यापूर्वी -

'रंगात रंगला श्रींरंग' हे माझं पहिलंवहिलं नाटक. नभोवाणीवरील थोड्याफार श्रुतिका, संगीतिका, आणि पुण्याच्या सौ. इंदिराबाई नातू यांचे श्रमपूर्वक बसवलेली 'मागील दार' ही पुरुषपात्ररहित नाटिका ही पूर्वीची छोटीशी जमेची बाजू. परंतु चार अंकी मोठ्ठें नाटक लिहिण्याचे धाडस पहिलेच ! ललितकलादर्शचे श्री. भालचंद्र पेंढारकर यांचे बहुमोल मार्गदर्शनामुळेच मुळांतले नकटे नाटक नेटकें बनुन जनताजनार्दनासमोर येऊं शकले. हे ऋण शब्दांच्या ताजव्यानें तोलणारे नाही ! नटवर्य केशवराव दाते यांच्या सूचनाही अविस्मरणीय होत्या.

माझ्या नाटकासाठी उत्सुकलेले पं. जगन्‍नाथबुवा पुरोहीत त्यांच्या अकाली निधनाने हें नाटक पहावयास राहिले नाहीत याची राहून राहून खंत वाटते ! वाटतं- व्रजबाबू त्यांनींच समजून घेतले असते !!

संगीतकाराच्या जीवनावरील या नाटकाचा संगीत हा आत्मा आहे. गुरुवर्य संगीतभूषण श्री. राम मराठे यांचे उत्तेजनामुळेंच मी या दिशेनें पहिले पाऊल टाकले. त्यांचे बहुढंगी बहुरंगी संगीतदिग्दर्शन माझ्या नाटकास लामले, हे माझे भाग्यच म्हणायचं. तशांत प्रानपिया व सदारंग यांचे प्रमाणे गुरु. राम मराठे यांनी बांधलेल्या हिंदी चिजांनी या नाटकांत पदन्यास केल्यानें नाटकाला एक आगळा डौल आलेला आहे.

शेवटच्या अंकांतील उर्दूकरणाबद्दल श्री. विद्याधर गोखले यांचे आभार.
(संपादित)

योगिनी जोगळेकर
दि. १८ जून १९७०
'रंगात रंगला श्रीरंग' या नाटकाच्या पुस्तकाच्या प्रथमावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- ग. पां. परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.