A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
हरिभजनावीण काळ घालवूं

हरिभजनावीण काळ घालवूं नको रे ! ॥१॥

दोरिच्या सापा भिऊनि भवा । भेटि नाहीं जिवा शिवा ।
अंतरिंचा ज्ञानदिवा मालवूं नको रे ! ॥२॥

विवेकाची ठरेल ओल । ऐसे बोलावे कीं बोल ।
आपुल्या मतें उगीच चिखल कालवूं नको रे ! ॥३॥

संत संगतीने उमज । आणुनि मनिं पुरतें समज ।
अनुभवावीण मान हालवूं नको रे ! ॥४॥

सोहिरा ह्मणे ज्ञानज्योति । तेथें कैंचि दिवसराति ।
तयाविण नेत्रपातिं हालवूं नको रे ! ॥५॥
गीत - संत सोहिरोबानाथ
संगीत - पं. जितेंद्र अभिषेकी
स्वराविष्कार- पं. जितेंद्र अभिषेकी
दशरथ पुजारी
पं. हृदयनाथ मंगेशकर
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
गीत प्रकार - संतवाणी
  
टीप -
• स्वर- पं. जितेंद्र अभिषेकी, संगीत- पं. जितेंद्र अभिषेकी.
• स्वर- दशरथ पुजारी, संगीत- दशरथ पुजारी.
• स्वर- पं. हृदयनाथ मंगेशकर, संगीत- पं. हृदयनाथ मंगेशकर, चित्रपट- अंतरीचा दिवा.
गाण्याचं म्हणून असं एक नशीब असतं याचं आणखी एक उदाहरण सांगता येईल. संत सोयरोबांचा एक भक्तिरसपूर्ण असा अभंग आहे. परमेश्वराच्या साधनेत तल्लीन असलेले हे संत स्वत: अशिक्षित असूनही सर्वसाधारण जनतेला कसं प्रबोधन करतात व आपल्या प्रासादिक रचनेतून मोक्षमुक्तिचा मार्ग दाखवतात याचा उत्कृष्ट नमुना इथे अनुभवायला मिळतो.

हरिभजनाविण काळ घालवू नको रे ॥
दोरीच्या सापा भिवुनी भवा । भेटी नाही जीवाशिवा ।
अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे ॥

हा अभंग मला आवडला. त्यावर मी खूप मेहनत घेतली. अहिरभैरव रागात बांधणी करून व रागाची शुद्धता सांभाळून, शब्दाचे उच्चार, बोल, याकडे लक्ष देऊन मी ते गायलोय. एकतालाचा ठेका या अभंगाला मी वापरला. कारण मूळातच या काव्याचं वजन एकतालाचंच आहे. काहीकाही वेळेला एकतालाच्या वजनाचं गीत कुणा केरव्यात गातात तर केरव्याचं गीत दादरा तालात म्हटलं जातं, तसं बांधलं जातं. खरं म्हणजे असं करू नये. याने यतिभंग होतो. शब्दांच्यावर वेगेवेगळे आघात होतात. हे शास्त्र आहे- ती बंधनं आहेत, ती पाळली गेली पाहिजेत. एच.एम.व्ही.ने हे गाणं माझ्या आवजात रेकॉर्ड केलं. ते बरंच लोकप्रिय झालं. रेडिओवरून अनेक वेळा वाजवलं गेलं. परंतु नंतर चार-पाच वर्षांनी माझे मित्र पं. जितेंद्र अभिषेकी यांनी ते भजन गायलं व त्याची पण रेकॉर्ड निघाली. पं. अभिषेकींच्या आवाजात व खास पद्धतीने- त्यांच्याच चालीचे हे भजन सुद्धा खूप लोकप्रिय झाले.

लोकांच्या मनात हेच येई की एकच अभंग पुजारी पण गातात, अभिषेकी पण गातात, असं का करतात हे कलाकार? यावर माझं उत्तर एकच आहे की तुम्ही दोघांचंही ऐका ना ! त्यांनी त्याच्या पद्धतीने गायलं आहे. दुसर्‍या रागात बांधलं आहे आणि मी माझ्या पद्धतीने गातो. माझ्या गाण्यातल्या हरकती व वैविध्य तुम्ही ऐका. त्यांच्या ताना व समेवर आघात याची मजा घ्या, काय हरकत आहे? असं बघा, मत्‍सालयात आपण जातो व तेथे काचेच्या पेटीत निरनिराळ्या रंगाचे व जातीचे अनेक मासे इकडून तिकडे विहरत जातात. प्रत्येक माशाची पोहण्याची स्टाइल निराळी असते. कुणी सुळकन्‌ या टोकापासून त्या टोकापर्यंत जातात तर कुणी नुसतं आळसून संथपणे पंख हलवीत फिरत असतात. पण सगळ्याच्या हालचाली मोहक असतात. आपण त्यांचा आनंद घेतोच ना? मग तसंच गाण्याच्या बाबतीत आहे. त्यात डावं-उजवं असं ठरवू नका. गाण्याचं भाग्य व दैव त्याच्या नशीबावर असतं. काहीकाही गाण्यांना एकही संगीतकार मिळत नाही; तर काही वेळेला एकाच गाण्याला दोन दोन संगीतकार व दोन दोन गायक मिळतात. त्यांचा आपण चांगल्या भावनेने स्वीकार करावा.

असे अनेक प्रकार माझ्या संगीत कारकिर्दीत घडले. त्याकडे आपण तटस्थ वृत्तीने बघावे. संगीत ही कुणा एकाची मिरासदारी नाही. ती एक मोठी कला व दैवी शक्ती आहे. त्या कलेचा सर्वांनी प्रेमाने आनंद घ्यावा. तर्कवितर्क व वितंडवाद याने आपल्याच डोक्याला ताप होईल. संगीताने कष्टी व दु:खी जीवन सुसह्य होते. निरामय व सुखी आयुष्याचा तो मंत्र आहे, असे आतापर्यंत अनुभवास आले आहे.
(संपादित)

अजून त्या झुडुपांच्या मागे
संगीतकार दशरथ पुजारी यांचे आत्मकथन
शब्दांकन- वसंत वाळुंजकर
सौजन्य- आरती प्रकाशन, डोंबिवली.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  पं. जितेंद्र अभिषेकी
  दशरथ पुजारी
  पं. हृदयनाथ मंगेशकर