A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
गुणि बाळ असा जागसि कां

गुणि बाळ असा, जागसि कां रे वायां ।
नीज रे नीज शिवराया ॥

अपरात्रीचा प्रहर लोटला बाई ।
तरि डोळा लागत नाहीं ।
हा चालतसे चाळा एकच असला ।
तिळ उसंत नाहिं जिवाला ।
निजवायाचा हरला सर्व उपाय ।
जागाच तरी शिवराय ।
चालेल जागता चटका ।
हा असाच घटका घटका ।
कुरवाळा किंवा हटका ।
कां कष्टविशी तुझी सांवळी काया? ।
नीज रे नीज शिवराया ॥

ही शांत निजे बारा मावळ थेट ।
शिवनेरी जुन्‍नरपेठ ।
त्या निजल्या ना, तशाच घाटाखालीं ।
कोंकणच्या चवदा ताली ।
ये भिववाया बागुल तो बघ बाळा ।
किति बाई काळा काळा ।
इकडे हे सिद्दी-जमान ।
तो तिकडे अफजुलखान ।
पलीकडे मुलुखमैदान ।
हे आले रे तुजला बाळ धराया ।
नीज रे नीज शिवराया ॥