A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
गुंफा वेणी

गुंफा वेणी, वेणी गुंफा ग साजणी
बारा घरच्या बाराजणी
आई आलो तुमच्या अंगणी
घेऊनि करंडा-फणी, गुंफा वेणी

मागिल दारी तुळसमंजिरी डुले
रांगोळी घालती प्राजक्ताची फुले
सुटले पाडस गाईकडे धावले
आई आलो तशा अंगणी, गुंफुनी द्या वेणी

फिरवा तुमचे हस्तक केसांतुनी
आता कशाला गजदंताची फणी?
मोती, मरवे सगळी शोभा उणी
माया-ममतेची ही लेणी, मिरवू सर्वजणी

पडे पाठीवर अशी थाप गोडशी
आता विसरले आहे सासुरवाशी
पदराखाली घ्या हो तुमच्या कुशी
झाले तुमची पोर पोटीची न्हाते प्रेमाश्रुंनी
गीत - विश्राम बेडेकर
संगीत - सी. रामचंद्र
स्वर- बिंबा
चित्रपट - चूल आणि मूल
गीत प्रकार - चित्रगीत
मरवा - सुगंधी पाने असलेली एक वनस्पती.
(खालील मजकूर विश्राम बेडेकर यांच्या 'एक झाड आणि दोन पक्षी' या आत्मचरित्रातून संपादित स्वरुपात घेतला आहे. हे आत्मचरित्र त्यांनी स्वत:तील दोन 'मी', या अर्थाने लिहिले आहे. एक 'मी' स्वत: आणि माझ्याकडे त्रयस्थपणे पाहाणारा दुसरा 'मी'. हा संदर्भ घेऊन या मजकुराचे वाचन करावे.)

.. या अनुभवामुळे पुढे याची पद्यरचनेची भीती पार गेली. पण पदे लिहिता आली तरी याला त्याची मुळीच हौस नसे. संधी आली तरी तो दुसर्‍यांना मुद्दाम आणून ते काम देई. तेही शक्य तर नव्या कवींचा परिचय करून देण्यासाठी. 'पहिला पाळणा' बोलपटात याने हट्टाने नागपूरच्या श्रीनिवास रामचंद्र बोबडे यांच्या दोन सुंदर कविता घातल्या. 'वासुदेव बळवंत' या बोलपटासाठी नागपूरच्याच शंकरराव शास्त्रींना आणले. 'चूल आणि मूल'साठी मनमोहन नातूंना मुद्दाम मुंबईला नेले.

नातू खरे म्हणजे लहरी आणि मनस्वी. त्यांच्या गुणांचे पैशाच्या रुपातसुध्दा चीज व्हावे ही याची इच्छा. पण नातू जातिवंत कवी- ते स्फूर्तीची वाट बघत. दिवसन्‌ दिवस पदें होईनात. स्टुडिओ आणि संगीत दिग्दर्शक चितळकर रिकामे बसलेले. मग एक दिवस याने नातूंना निकडीचा तगादा लावला. पण काव्य किती कष्टाचे, योगायोगाचे फळ असते, याबद्दल ते बोलू लागले ! तेव्हा याने म्हटले, "हे बघा, आता अर्ध्या एक तासात पद होऊ शकेल." नातूंना साहजिकच राग आला. मग हा म्हणाला, "करून तर बघू या. चित्रपटातला प्रसंग काय आहे? एका वाड्यात एक मोठं सधन घर आहे. घरात गाई-म्हशी आहेत. तिथं रोज सकाळी पुष्कळसं ताक होतं. ते न्यायला बिर्‍हाडकरूंच्या बायकामुली येतात. त्या घरातली वयस्क बाई त्या मुलींच्या वेण्या घालून देते. सगळया महाराष्ट्रात ही पद्धत प्रचलित आहे. आता आपण तो देखावा डोळयापुढे आणू. मागच्या ओसरीवर ताक घुसळलं जातं आहे. ओसरीच्या पलीकडे अंगण, त्यात तुळस. जवळ एक पारिजाताचं झाड. पलीकडं गोठ्यात गायवासरू, मला वाटतं या सगळ्याचं वर्णन केलं तरी छान गाणं होईल. याने कागद पेन्सिल घेतली आणि ओळी लिहायला सुरवात केली.

गुंफा वेणी । वेणी गुंफा ग साजणी ॥
बारा घरच्या बारा जणी
आई, आलो तुमच्या अंगणी
घेऊनि करंडाफणी । गुंफा वेणी ॥

मागिल दारी तुळसमंजरी डुले
रांगोळी घालिती प्राजक्ताची फुले
सुटले पाडस, गाईकडे धावले
आई आलो तशा अंगणी ॥

गुंफुनि द्या वेणी । गुंफा वेणी ॥

दोन तासांत पुढची कडवीं तयार झाली. नातू त्याच दिवशी निराश होऊन परत गेले. मग याने पुढची सगळी गाणी स्वतःच लिहिण्याचा पत्कर घेतला.

चितळकरांच्या बरोबरच्या या सहकार्यात याला आपल्या घमेंडखोर स्वभावाविषयी एक धडा मिळाला. पण तो याच्या ध्यानात राहिला नाही. गाणी झाल्यावर चितळकरांनी आग्रह धरला. गाणी म्हणण्यासाठी लता मंगेशकरलाच आणायला हवे.

चितळकर त्यावेळी अप्रसिध्द होते. याने आधी 'नारदनारदी' नावाचा चित्रपट काढला होता. त्यावेळी एक वाद्यवादक म्हणून त्यांनी काम केले होते. मुख्य म्हणजे या चित्रपटाची नायिका-नटी स्वतः गाणारी होती. तिचा साहजिकच फार हिरमोड झाला. तिचे हे पडद्यावरचे पहिलेच काम तिचे मन खट्टू होऊ नये म्हणून याने तिची बाजू घेतली. तेव्हा चितळकर म्हणून गेले, “गाणी छान आहेत. पण लताने म्हटली नाहीत तर लोकप्रिय होणार नाहीत !"

हा एकदम बोलायला नको ते बोलून गेला. "चित्रपट तुमच्या गाण्यामुळे नव्हे माझ्या लिहिण्यामुळे लोकप्रिय होईल !"

पुढे चित्रपट चांगला चालला खरा. पण चितळकरांचे पुढचे संगीत भारतभर गाजले. याचे सिनेमातले लिहिणे मात्र सुकत गेले.
(संपादित)

विश्राम बेडेकर
'एक झाड दोन पक्षी' या आत्मचरित्रातून.
सौजन्य- पॉप्युलर प्रकाशन, मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.