A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
गोमू संगतीनं माझ्या तू

गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय?
माझ्या पिरतीची राणी तू होशील काय?
आरं संगतीनं तुझ्या मी येणार नाय !
तुझ्या पिरतीची राणी मी होणार नाय !

ग तुझं टपोरं डोळं जसं कोळ्याचं जाळं
माझं काळिज घोळं, त्याचं मासोली झालं
माझ्या प्रीतीचा सुटलाय तुफान वारा वारा वारा
रं नगं दावूस भलताच तोरा, जा रं गुमान साळसूद चोरा
तुझ्या नजरंच्या जादूला अशी मी भुलणार नाय

रं माझ्या रूपाचा ऐना, तुझ्या जिवाची दैना
मी रं रानाची मैना, तुझा शिकारी बाणा
खुळा पारधी ग जाळ्यामंदी आला आला आला
ग तुला रुप्याची नथ मी घालीन
ग तुला मिरवत मिरवत नेईन
तुज्या फसव्या या जाळ्याला अशी मी गावनार नाय

गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय?
आरं संगतीनं तुझ्या मी येणार.. हाय !
तुझ्या पिरतीची राणी मी होनार हाय !
रूप्य - चांदी.
ह्या गाण्याचीही कहाणी मजेशीर आहे. नायक-नायिकेचं एक छेडाछाडीचं गाणं हवं होतं. चित्रपटाच्या गोष्टीशी काहीही संबंध नव्हता. त्यामुळे आशय, भाषा ह्यांची तशी काही बंधनं नव्हती. वेगवेगळ्या दिशेने विचार चाललेला असताना, सहज हृदयनाथांनी त्यांच्या आधी करून ठेवलेल्या एका चालीचा मुखडा शब्दांसह ऐकवला. कुणालाही आवडावा असाच तो होता. अर्थात चित्रपटाचे दिग्‍दर्शक वसंतराव तथा अप्पा जोगळेकरांनाही तो पसंत पडला. त्यामुळे तो मुखडा तसाच ठेवून त्याला साजेसे पुढचे अंतरे मी लिहिले आणि एका 'दोन कलमी' लोकप्रिय गाण्याचा जन्‍म झाला.

'दोन कलमी' कारण मुखड्याचे शब्द शांता शेळक्यांचे होते. त्या काळात गाजणार्‍या त्यांच्या कोळीगीतांपैकीच हा तुकडा असणार, तेव्हाच कधीतरी करून ठेवलेला. त्याचं श्रेय माझ्या नावावर जमा होण्याचा योग होता. शांताबाईंच्या शब्दांकुरातून पुढचं गाणं ओवण्याची संधी मिळणं ही माझ्यासाठी निश्चितच आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट होती. एव्हाना शांताबाईंशी वडीलकीचा आदर आणि स्‍नेह, ह्या दोन्ही नात्यांनी मी बांधला जाऊ लागलो होतो.
(संपादित)

सुधीर मोघे
गाणारी वाट
सौजन्य- मेनका प्रकाशन, पुणे.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.