तिच्या घोवाला कोकण दाखवा
दावा कोकणची निळीनिळी खाडी
दोन्ही तीराला हिरवीहिरवी झाडी
भगवा अबोली फुलांचा ताटवा
कोकणची माणसं साधी भोळी
काळजात त्यांच्या भरली शहाळी
उंची माडांची जवळून मापवा
सोडून दे रे खोड्या सार्या
शिडात शिर रे अवखळ वार्या
झणी धरणीला गलबत टेकवा
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | दत्ता डावजेकर |
स्वर | - | पं. जितेंद्र अभिषेकी |
चित्रपट | - | वैशाख वणवा |
गीत प्रकार | - | चित्रगीत, कोळीगीत |
गलबत | - | जहाज. |
घोव | - | पति. |
झणी | - | अविलंब. |
नाखवा | - | जहाजावरचा मुख्य नावाडी, तांडेल. |
सहजच एक गंमतशीर प्रसंग आठवला. मी कुटुंबासोबत श्रीक्षेत्र गणपतीपूळे येथे गेलो होतो. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या निवासात उतरलो होतो. संध्याकाळी इतर पर्यटकांसोबत नौकाविहारासाठी गेलो. थोड्या वेळाने नावाडीभाऊ रंगात आले. कोकणच्या आसपासच्या जागा दाखवता दाखवता समोर बोट दाखवून म्हणाले, "तो समोर किनारा दिसतो आहे ना ते 'मालगूंड गाव'. ग.दि.माडगूळकर या गावचे ! त्यांनी गीतरामायण लिहिले. ते नाही का गाणं.. 'गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा..' अशी अनेक गाणी त्यांनी लिहिली..
आम्ही शांतपणे त्याचे बोलणे ऐकत होतो. संपूर्ण कोकणचे थापापूराण झाल्या नंतर माझे वडील गंभीर चेहरा करुन म्हणाले, "फार चांगली माहिती दिलीत आपण. पण गंमत अशी आहे की तो समोर बसला आहे ना, तो ग.दि.माडगूळकरांचा नातू आहे. त्याच्या शेजारी बसल्या आहेत, त्या गदिमांच्या सूनबाई आहेत.. त्यांना पण हे माहित नव्हते.."
त्या नावाड्याचा चेहरा पहाण्यासारखा झाला होता. नशिबाने आम्ही पाण्यात होतो. त्यामुळे धरणी फाटू दे आणि मला पोटात घेऊ दे, असा विचार तो बिचारा करु शकला नाही !
कविश्रेष्ठ केशवसूतांच्या 'मालगूंड'ला त्याने गदिमांचे गाव केले होते.
प्रसंगातला विनोद सोडला तरी गदिमांनी कोकणच्या सामान्य माणसांच्या मनात मात्र सुंदर घर बांधले होते हे मात्र खरे !
* 'आठवणीतली गाणी'वर प्रसिद्ध झालेले ब्लॉग्ज कॉपी-पेस्ट करणे अनधिकृत आणि अनैतिक आहे. या लिखाणाचा कुठल्याही प्रकारे वापर करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.