A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
घरपरतीच्या वाटेवरती

घरपरतीच्या वाटेवरती धूसर धूसर धूळ उडे
अंधुक होते नजर आणखी थकलेले पाऊल अडे

घरपरतीच्या वाटेवरती पडल्याझडल्या शीर्ण खुणा
मावळतीच्या किरणांमधुनी क्षण झळझळुनी उठती पुन्हा

घरपरतीच्या वाटेवरती पायांवाचून पायठसे
अश्रुत चाहूल येते कानी, एक हुंदका एक हसे !

घरपरतीच्या वाटेवरती आभासांचे दाट धुके
सावलीत सावली मिसळते अन्‌ पुटपुटती ओठ मुके

घरपरतीच्या वाटेवरती मलूल वत्सल सांजऊन्हे
कुरवाळिती मज स्‍नेहभराने विसरून माझे लाख गुन्हे