कवितेची सुरुवातच एका मोकळ्या, प्रसन्न आणि मोठ्या विस्तारापासून झाली आहे. दूर, उंच आभाळात बहुधा पाण्यानं भरलेला एखादा निळा ढग तरळत आला आहे. वारा सुखावणार्या ताजेपणानं झुळकत वाहतो आहे. दिवस वसंताचे आहेत. फुलांचे दिवस. चाफ्याच्या लाल-पिवळ्या - पांढर्या - सोनेरी बहराचे दिवस. मीलनोत्सुक पक्ष्यांच्या उत्कट सादाचे दिवस. उन्हेरी प्रहरात सुगंधी गारव्याची चंदनउटी माखण्याचे आणि रात्रीच्या शीतल अंधारात चांदणं पांघरण्याचे दिवस. पण मग वसंतातला हा ढग पावसाचा असेल? असेल बहुधा. असावा. कारण तो वाजतो आहे. गरजत नाहीये तो. उग्र नाही त्याचा आवाज. भीववतही नाहीये तो. तो हलकेच घुणघुणतो आहे. तो वळवाचा असेल की वसंत सरतासरता येणार्या पावसाची चाहूल लागते आहे त्याच्या येण्यात? माहीत नाही. कदाचित तो पावसाचा ढग नसेलही. पण पावसाळी मेघाची आठवण देणारा असेल. अति उत्कंठित करणारं ते वसंताचं उत्फुल्लपण आणि ते रुणझुणत्या वार्याच्या नादात मिसळलेलं घनाचं घुणघुणणं ! मनात त्या दुरुन येणार्या नादांनी एक ओढ जागली आहे. नुसती जागली नाही तर अगदी कळ लावणार्या उत्कटपणे उफाळून आली आहे.
घनु वाजे घुणघुणा, वारा वाहे रुणझुणा
भवतारकु वो कान्हा, वेगी भेटवा का ॥
काय विलक्षण सुंदर सुरुवात आहे कवितेची ! विराणी म्हणजे विरहिणी आहे ही. उत्कंठेचा एक गोड, आर्त स्वर पहिल्याच ओळीपासून लागला आहे. उकारांच्या लयवेल्हाळ आवर्तनांमधून तो उंच चढत चालला आहे. दूरवरचा मेघ, दुरुन येणारा रुणझुणता वारा आणि इथे ही कुणी एक कासावीस झालेली ! तिला तिचा कान्हा हवा आहे. तिचा आहेच तो, पण हवा आहे तिच्या जवळ, अगदी निकट.
तिनं कृष्णासाठी वापरलेला शब्दही कसा गोड आहे ! कान्हा ! कृष्णाचं चरित्र खरं तर किती बहुपेडी आहे ! तो यदुनंदन आहे, कंसच्छेदक आहे, गोपालक आहे, पांडवरक्षक आहे, तो गीतेचा उद्गाता आहे, भारतीय युद्धाचा नियंता आहे, तो जगदीश्वर आहे, तो योगेश्वरही आहे. इथे मात्र त्याचं रूप आहे त्याच्या तरुणपणातलं अतिवेल्हाळ रूप. तो गोपींचा कान्हा आहे. प्रणयलुब्ध आणि मनमोहन ! त्याचं इथलं विशेषण एकच आहे- भवतारक ! सगळया सृष्टीला तारणारा आहे तो ! आणि इथे त्याच्याविना जणू तिचे प्राण उडून चालले आहेत. त्याला भेटवा ना ! त्यानंच तर हा सगळा भवाचा पसारा निर्माण केला आहे. त्यानंच निर्माण केलं आहे, हे वसंताचं उन्मादक वातावरण. चराचराच्या मनात प्रणयाचे आवेग निर्माण करून त्यांना मीलनाच्या धुंदीपर्यंत नेणारा आणि त्या मीलनामधूनच भवजीवनाचं- निर्मितीचं सातत्य सांभाळणारा म्हणून तर तो भवतारक आहे. तोच हवा आहे तिला. आत्ता, लगेच ! 'वेगी' हा एकच शब्द तिची सगळी ओढ, तिचा प्रचंड आवेग घेऊन आला आहे पहा !
चांद वो चांदणे, चापे वो चंदने
देवकीनंदनेविण नावडे वो ॥
चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी
कान्होवनमाळी वेगी भेटवा कां ॥
सुमनाची शेज शीतळ वो निकी केली
पोळे आगी सारखी, वेगी विझवा कां ॥
तुम्ही गातसा सुस्वरे, ऐकोनी द्यावी उत्तरे
कोकिळे वर्जावे तुम्ही बाईयांनो
तिला नको आहे चंदन, चाफा. नको आहे चंद्र-चांदणं. उलट त्या शीतोपचारांनी दाह वाढतोच आहे तिचा. फुलांच्या शय्येवरही आगीत होरपळते आहे ती. तिच्या सख्या तिला रिझवण्यासाठी गाताहेत, पण तिला ते गाणं नको आहे की कोकिळेचा त्याबरोबर उठणारा आवाज नको आहे. तिला हवा आहे फक्त तिचा कान्हा. तो देवकीचा मुलगा, तो वनमाळी तिला हवा आहे.
एखाद्या मिनिएचर पेंटिंगसारखं हे गीत उमटत गेलं आहे. गवाक्षातून दिसणारा मेघ आणि चंद्र, बाहेर बहरलेला चाफा, आतली फुलांची शेज, त्यावर चंदनाची उटी ल्यालेली ती गोपी आणि भोवती तिच्या सख्या. कुणी गात असतील, कुणी तिला आरसा दाखवत असतील तर कुणी चंद्र दाखवत असतील ! खरं तर नुसतं चित्रही नाही हे. इंद्रियांना सुखावणार्या संवेदनांचं एक जिवंत नाट्य आहे इथे. रूप स्पर्शाचा आणि गंध- श्रुतीचा अगदी आल्हादक वावर आहे. चित्रशाळाच आहे ही. शीतोष्ण रंगांमधलं एक गारुड. तरी, म्हटलं तर सांकेतिकच आहे हे सगळं. आधीच्या संस्कृत परंपरेतल्या कवींनी अनेकदा वापरलेलं. पण असं म्हणताम्हणता शेवटच्या ओळींपाशी आपण येतो आणि अवाक् होऊन थांबतो.
दर्पणी पहाता रूप न दिसे वो आपुले
बाप रखुमादेवीवरे मज ऐसे केले ॥
काय म्हणते आहे ही? आरशात पाहते आहे आणि तिला तिचं रूप दिसतच नाही तिथे. असं होईल कसं? आरसा तर 'आहे' त्याचं बिंब धरणारा ! त्याच्यासमोर ती उभी आहे, पण ती जणू नाहीच, असं झालं आहे. तिची देहाकृती नाहीशीच झाली आहे बघता बघता. आधी सगळे उपचार चालले होते, ते देहासाठीचे होते. पण प्रथमपासून ओढ होती ती मनाची. कासाविशी होती ती आतली होती. ती हळूहळू वाढत गेली. इतकी वाढत गेली की, देहाला स्वत:चं अस्तित्वही सहन होईना आणि मग एका क्षणी देहाची जाणीवच मिटली. नुसते देहाची नव्हे, स्वत:च्या स्वतंत्र अस्तित्वाचीच जाणीव मिटली. 'मी'पणाचा भाव मावळला. तो कान्हा जणू बाहेरून कुठून यायचा नव्हताच. तो होता आतच. तिच्याच ठायी. मग स्वत:च्याच रूपात स्वत:ला विरघळून टाकणं झालं आणि सगळंच शांत झालं.
शेवटच्या त्या दोनच ओळी ! त्यांनी आधीच्या सगळ्या सामान्य ओळींना सहज ओढून एका असामान्य पातळीवर नेलं आहे. इतक्या साधेपणानं हे घडलं आहे की, आपल्याला समजण्याआधीच त्या ओळींचा झोका थेट परमतत्वापर्यंत पोचला आहे. किती सहजपणे म्हणते ती गोपी की, ती आरशासमोर उभी आहे आणि तिला मुळी ती आरशात दिसतच नाहीये. ती नाहीच आहे जणू आणि क्षणात ती ओळखते की, हे कुणी केलं आहे. त्या एका विठू वाचून दुसर्या कुणाला हे कसं शक्य आहे? त्या विठ्ठलानं म्हणजेच त्या कृष्णानं त्या कान्ह्यानं केलेली ती जादू आहे. आरशात तिला दिसते आहे ती तीच ! म्हणजे तोच ! आता ती म्हणजे 'तो'च आहे. म्हणून आरशात बिंब असेल तर त्याचंच. किंवा खरं तर बिंब नाहीच. तो तर निर्गुण निराकारच आहे.
तिच्या आत तेव्हा जे घडलं असेल, ते काय साधं असेल? अहंकार - अस्तित्वाचा अहंकार मिटवणं, ही काही साधी गोष्ट नव्हे. देहाची जाणीव मिटवणं, ही काही सोपी गोष्ट नव्हे. हे तिच्या बाबतीत घडलं, कारण तिची कासाविशी पराकोटीला पोचली. या जगातली, लौकिक पातळीवरची सुखं तिला इतकी नकोशी झाली की, दु:खाचं नव्हे तर इहलोकीच्या सुखांचंही तिचं बंधन तुटलं आणि ती मोकळी झाली. मुक्त झाली त्या क्षणी, त्यानं तिला स्वत:मध्ये एकरस करूनच टाकलं. मग अरूप अशा त्याच्या अस्तित्वावेगळं तिचं रुपवान अस्तित्व उरणार तरी कसं? ती हे काहीच बोलत नाही. खूप साधा, शांत, तृप्त उद्गार आहे तिचा - 'बापरखुमादेवीवरे मज ऐसे केले !'
सुरुवात एका विलक्षण आर्ततेपासून, उत्कंठेपासून, कासाविशीपासून आणि शेवट एका तृप्ततेपाशी, समजुतीपाशी, शांततेपाशी. सुरूवात एका लौकिकापासून, पार्थिवतेपासून आणि शेवट एका अलौकिक, अपार्थिव अनुभवापाशी. ओळखीचे बोल बोलता बोलता अनोळखी क्षणाच्या गाभार्याशी नेऊन उभं करतात आपल्याला ज्ञानदेव.
कसं ते त्याचं बाईपणाच्या मर्मापाशी पोचणं ! नुसत्या भाषेतून, भाषेच्या पोतातून नव्हे. 'वो', 'बाईयांनो' असं म्हणत नव्हे. नुसत्या शब्दांच्या गोडव्यातून नव्हे. अनुप्रासाच्या मृदु साखळ्यांमधून नव्हे. मूळचा अनुभवच ज्ञानदेवांनी बाई होऊन घेतलेला आहे. स्वत:चं काहीही मागे उरू न देता सर्वस्व अर्पून टाकणं, मिटवून टाकणं, बाईच करू शकते. प्रेमाची संपूर्णता स्वत:च्या विलयातून अनुभवणं बाईलाच जमू शकतं. म्हणूनच तर बहुधा सगळ्या थोर पुरुषसंतांनी बाई होऊनच परमात्म्याशी सलगी केली आहे. विराणीचं - विरहिणीचं सौंदर्य त्या बाईपणाच्या मूळच्या ठावाशी आहे.
एरवी परमतत्त्वाशी भेट काय सोपी असते का? सगळ्या क्षुद्रतेला, सामान्यतेला, लोभ मोहांना दूर करणं सोपं असतं का? स्वत:च्या इच्छा आकांक्षा, विचार - भावना - आपलं सगळं व्यक्तिमत्त्व नाहीसं करणं आणि त्या एका सर्वामधेच वास करत असलेल्या शक्तीमध्ये स्वत:ला समावून टाकणं सोपं असतं का? त्यासाठी प्रयत्न तर हवेतच, पण ध्यास हवा, निष्ठा हवी, अनन्य एकाग्र साधना हवी आणि स्वत:च्या स्वार्थाचं वर्तुळ भेदून विस्तारण्याची सद्भावानं प्रेरित केलेली एक चिरंजीव उत्कट इच्छा हवी. परमार्थाच्या वाटेवरची या सगळ्याला या साक्षात्कारी अनुभवाला आणखी योग्य, आणखी सुविहित परिभाषा असेलही, पण ती दूर ठेवली, तरी त्या परम शक्तीचा - तिच्यात मिळालेपणाचा अनुभव घेण्यासाठी माणसाची काही सिद्धता असायला हवी. असतेच. असणारच. पण ज्ञानदेवांची विरहिणी त्या स्वत:च्या श्रेयाचा थोडासुद्धा उच्चार करत नाही. जे काही केलं आहे, ते त्या रखुमादेवीवरानंच केलं आहे. 'मी'पणाच्या विलयाचा इतका निरपेक्ष सुंदर अनुभव बाईला प्रेमातून मिळू शकतो आणि प्रेम कुणा एकाचं थोडंच असतं? विश्वात्मक प्रेमजाणिवेचा इतका मधुर, इतका साधा आणि इतका उत्कट अनुभव ज्ञानदेवांनी या विराणीतून दिला आहे की, एखाद्या संत स्त्रीनंही अशी विराणी लिहिलेली नाही. या गोष्टीचं ज्ञानदेवांच्या बाबतीत नवल करायचं की, त्या स्वाभाविक उंचीकडे मान वर करून पाहता येत नाही, म्हणून स्वत:चं लहानपण स्वीकारून टाकायचं?
ज्ञानदेव तर आपल्या प्रतिक्रियांच्या पलीकडे कितीतरी उरणारे आहेत.
(संपादित)
अरुणा ढेरे
सदर- कवितेच्या वाटेवर
सौजन्य- दै. लोकसत्ता (६ जून २००९)
(Referenced page was accessed on 9 April 2017)
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
इतर संदर्भ लेख