A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
घन तमीं शुक्र बघ

घन तमीं शुक्र बघ राज्य करी,
रे खिन्‍न मना, बघ जरा तरी !

ये बाहेरी अंडें फोडुनि
शुद्ध मोकळ्या वातावरणीं,
कां गुदमरशी आंतच कुढुनी?
रे ! मार भरारी जरा वरी.

फूल गळे, फळ गोड जाहलें,
बीज नुरे, डौलांत तरू डुले;
तेल जळे, बघ ज्योत पाजळे;
का मरणिं अमरता ही न खरी?

मना, वृथा कां भीशी मरणा?
दार सुखाचें तें हरि-करुणा !
आई पाही वाट रे मना,
पसरोनी बाहु कवळण्या उरीं.