A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
गेले ते दिन गेले

वेगवेगळीं फुलें उमललीं
रचुनी त्यांचे झेले
एकमेकांवरी उधळले
गेले ! ते दिन गेले !!

कदंबतरूला बांधुन दोला
उंच खालतीं झोले
परस्परांनी दिले घेतले
गेले ! ते दिन गेले !!

हरित बिलोरी वेलबुटी वरिं-
शीतरसांचे प्याले
अन्योन्यांनीं किती झोकले
गेले ! ते दिन गेले !!

निर्मलभावें नव देखावे
भरुनी दोन्ही डोळे
तूं मी मिळुनी रोज पाहिले
गेले ! ते दिन गेले !!
गीत - भवानीशंकर पंडित
संगीत - श्रीनिवास खळे
स्वर- पं. हृदयनाथ मंगेशकर
राग - चारुकेशी
गीत प्रकार - भावगीत
  
टीप -
• काव्य रचना- ३१ डिसेंबर १९३३, नागपूर.
अन्योन्य - परस्पर / एकमेक.
कदंब (कळंब) - वृक्षाचे नाव.
झेला - गुच्छ / नक्षी.
झोला - झोका.
दोला (आंदोला) - झोका.
बिलोरी - काचेचे.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.