जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी रहा
कडकडुनी तू मिठी मारता बाळे
बालपण आले आले घुमवित घुंगुरवाळे
आठवले सारे सारे गहिवरले डोळे
कढ मायेचे तुला सांगती जा
दारात उभी राहिली खिलारी जोडी
बघ दीर धाकले बसले खोळंबुन गाडी
पूस ग डोळे या पदराने सावर ही साडी
रूपदर्पणी मला ठेवुनी जा
मोठयांची तू सून पाटलिण मानाची
हसले तुझे ग हिरवे बिलवर लगीनचुडे
बघु नकोस मागे मागे लाडके बघ पुढे
नकोस विसरू परि आईला जा
गीत | - | पी. सावळाराम |
संगीत | - | वसंत प्रभु |
स्वर | - | लता मंगेशकर |
गीत प्रकार | - | भावगीत, नयनांच्या कोंदणी |
कढ | - | उकळी / आधण. |
खिल्लारी | - | बैलाची एक जात. |
घुंगुरवाळा | - | घुंगरे लावलेला लहान मुलाच्या पायांतला पैंजण. |
बिलवर | - | उच्च प्रतीची काचेची बांगडी. |
एकमेकांच्या प्रतिभेविषयी, कर्तृत्वाविषयी, स्वभावाविषयी जेव्हा परस्परांना अचूक अंदाज येतो.. तेव्हा अशी प्रतिभावान माणसे एकत्र येतात.. नेहेमीचे शिष्टाचार, रितीरिवाज सोडून.. वेळी व्यावसायिकता विसरून एकमेकांना सहकार्य करीत काम करतात आणि प्रदीर्घ काळ एकत्रपणे काम करतात.. टिकतात. अन्यथा ज्या काळातली या जोडीची लोकप्रिय गाणी आहेत, त्या काळात लता मंगेशकर हिंदी चित्रपटसृष्टीत एवढ्या व्यस्त होत्या की वसंत प्रभू सोडून क्वचितच इतका वेळ त्यांनी दुसर्या कुठल्या संगीतकाराला दिला असेल. या अशा प्रतिभावान कलाकारांमुळे अनेक अजरामर कलाकृती जन्म घेतात आणि आपल्यासारख्या रसिकांना त्यांच्या कलेचा पुरेपूर आनंद मिळतो.
वसंत प्रभू–लता मंगेशकर यांच्या, 'गंगा-जमुना डोळ्यात उभ्या का' या गाण्याची गोष्ट आपण आज ऐकणार आहोत, ज्याचे गीतकार आहेत पी. सावळाराम.. ज्यांच्या शब्दांनाही संगीतकार आणि गायकाएवढंच महत्त्व आहे. या जोडीची समस्त गाणी संख्येनी एवढी आहेत आणि त्यांचा दर्जा एवढा महान आहे की त्यावर एक ग्रंथच लिहायला लागेल. 'जन पळभर म्हणतील हाय हाय' 'मधु मागसी माझ्या सख्या' 'चाफा बोलेना' अशी काहीच उदाहरणे पुरेशी आहेत.
वलयांकित व्यक्ती आणि त्यादेखील चित्रपटसृष्टीतले तारे-तारका असतील तर त्यांच्या अगदी साध्या गोष्टीलाही वारेमाप प्रसिद्धी मिळते. अहो, लता मंगेशकर, वसंत प्रभू, पी. सावळाराम अशा असामान्य व्यक्ती म्हणजे काय झालं ! गोष्ट अगदी साधी होती, पण इतिहास निर्माण करणार्या.. 'गंगा-जमुना..' या गाण्याची होती आणि तीही गप्पाष्टकातून नाही तर एका मान्यवराने सांगितलेली होती. त्या जमान्यातले प्रसिध्द चित्रपट निर्माते दिनकर पाटील यांनी सांगितलेली ही घटना जेष्ठ सिने समीक्षक इसाक मुजावर यांच्या पुस्तकात वाचण्यात आली. त्यांना त्यांच्या एका चित्रपटासाठी एक लावणी हवी होती आणि त्यासाठी ते गीतकाराच्या शोधात होते. त्या संदर्भात ते ठाण्याला गीतकार पी. सावळाराम यांच्या घरी गेले. तिथे सावळाराम आणि संगीतकार वसंत प्रभू बसले होते आणि एका एच.एम.व्ही.च्या ध्वनिमुद्रिकेसाठी ती बैठक चाली होती. ती दोन गीते होती, 'गंगा-जमुना डोळ्यात उभ्या का' आणि 'हसले ग बाई हसले'. अशी दोन अजरामर गाणी ज्या बैठकीत झाली ती बैठक ऐतिहासिकच म्हटली पाहिजे. आज मला ते दृश्य डोळ्यांसमोर आलं तरी गहिवरून येतं.
'गंगा-जमुना डोळ्यात उभ्या का, जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा' हे गीत चित्रपटासाठी का आलं नाही हे एक आश्चर्यच आहे. आपल्या लाडक्या मुलीच्या सासरी पाठवणीचे चित्रसदृश.. साधे, सोपे, बोली भाषेतले, पोटात कालवाकालव करणारे सुंदर शब्द पी. सावळारामांनी लिहिले आहेत. त्यांना तशीच सरळ, सोपी गेय चाल प्रभूंची आहे. जेव्हा चाल सोपी असते तेव्हा गायकाला आपलं कसब दाखवायला पूर्ण वाव असतो आणि तेच नेमकं लताजींनी करून सगळ्यावर कडी केली आहे. 'कडकडुनी तू मिठी मारता बाळे'.. मधला आवेग, 'पूस ग डोळे या पदराने लाडके..' मधली आईची माया, 'मोठ्यांची तू सून पाटलीण मानाची..' मधल्या 'मानाची' शब्दातला अभिमान हे केवळ त्याच दाखवू शकतात. अगदी छोटे पण गाण्याच्या चालीप्रमाणेच लक्षात राहणारे वाद्यवृंदातील पीसेस हे अजून एक या गाण्याचं वैशिष्ट्य. अगदी मंद पण गोड वाजलेला पियानोही या गाण्याचा वेगळेपणा सांगतो.
लेकीच्या पाठवणीची.. 'जा मुली शकुंतले सासरी' 'सासुर्यास चालली लाडकी शकुंतला' 'दाटून कंठ येतो' अशीही सुंदर गाणीही गाजली. पण पाठवणी गीताचा विषय निघाला की, 'गंगा-जमुना डोळ्यात उभ्या का' हे आणि हेच गाणं ओठावर येतं इतकं ते महान आहे. प्रसिध्द निवेदक, मुलाखतकार, लेखक सुधीर गाडगीळ या गाण्याच्या निवेदनात म्हणायचे की, "त्या काळात हे गाणं इतकं गाजलं की ते बॅंडवर मुंजीतही वाजवलं जाऊ लागलं".
आचार्य अत्र्यांच्या भाषेत असं गाणं गेल्या दहा हजार वर्षांत झालं नाही आणि पुढील दहा हजार वर्षांत होणार नाही !
* 'आठवणीतली गाणी'वर प्रसिद्ध झालेले ब्लॉग्ज कॉपी-पेस्ट करणे अनधिकृत आणि अनैतिक आहे. या लिखाणाचा कुठल्याही प्रकारे वापर करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
एक लहानसं उदाहरण सांगतो. रेकॉर्डस् विकणार्या घैसास कंपनीचे दुकानदार माझे मित्र होते. गिरगावातून मी कधीकधी त्यांच्याकडे जाऊन बसत असे. माझा पोशाख साधासुधाच असल्याने मी कोणी संगीत दिग्दर्शक आहे याची लोकांना कल्पना नसे. दुकानात रेकॉर्ड विकत घेण्यासाठी जे गिर्हाईक यायचे त्यांची मी गंमत पाहिली. शाळेतल्या किंवा कॉलेजमधल्या मुली तिथे यायच्या व नवीन काही गाण्यांच्या रेकॉर्डस् आल्या आहेत काय याची चौकशी करायच्या. आतल्या बाजूला रेकॉर्ड ऐकण्याची सोय केलेली असे. तिथं बसून त्या रेकॉर्डस् ऐकायच्या व रेकॉर्ड आवडली की पॅक करायला सांगायच्या व घेऊन जायच्या. हा सगळा प्रकार पाहताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली की गाणं ऐकताना त्या मुली गाण्याबरोबर गुणगुणायच्या.
गंगा जमुना डोळ्यांत उभ्या का?
जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी रहा
हे लता मंगेशकर यांनी गायिलेलं भावगीत अतिशय लोकप्रिय झालेलं होतं. त्याला वसंत प्रभूंची सुंदर चाल व कवी पी.सावळाराम यांचे भावमधूर शब्द लाभलेले. हे सर्व चांगलं होतं व त्यात एक गोष्ट दिसून आली की गाणं जे गायलंय ते बीट तू बीट. या गाण्यामध्ये त्यांनी कुठेही अशी जागा ठेवली नाही की म्हणताना किंवा ऐकताना त्रास होईल. 'दिल्या घरी तू सुखी रहा' हे आपण बोलताना जसं म्हणू तसंच ते गाताना म्हटलंय. वसंत प्रभूंनी चालीत सुद्धा इतका सोपेपणा आणला आहे की ती कोणालाही गुणगुणता येईल व त्याचा आनंद घेता येईल. रेकॉर्ड ऐकण्यार्या मुलींनाही गुणगुणताना बरं वाटायचं, याचा अर्थ असा की जे गाणं गुणगुणता येतं ते गाणं चागलं. मग माझ्या हे लक्षात आलं की, आपण पण अशाच चाली बांधल्या पाहिजेत की ते गाणं कुणालाही गुणगुणता आलं पाहिजे. पण गाणं सरळ सरळ केलं तर विद्वानांना वाटलं की, 'नवीन दिसतोय हा, बीट टू बीट गातोय.' त्यांना पाहिजे ते म्हणू द्यावं, आपण ऐकून घ्यावं. कारण लोकांना बीट टू बीट गाणं आवडतं. सोपा प्रकार बरा वाटतो. हे साधं, सोपं होण्यासाठी मला फार वेळ लागला. कारण मी आधीपासून कठीण गोष्टी करण्यात धन्यता मानत होतो. त्यामुळे माझ्या चाली कठीण असायच्या. सुरुवातीला गाणार्या गायकाला फार भीती वाटायची; इतक्या अवघड चाली असायच्या. गाताना श्वास वरचा वरती, खालचा खालती ! कसं काय गायचं हा प्रश्न त्यांच्यापुढे पडे. अवघड संगीतकार म्हणू्नच त्यांच्या मनात माझ्याबद्दलची प्रतिमा होती. मला ते प्रथम कळलं नाही पण कंपनीच्या लोकांनी सांगितलं की "जरा सोपं करत जा गाणं." व तेच करायला मला वेळ लागला. मला असं वाटतं की कठीण चाल बांधणं सोपं असतं पण सोपी चाल तयार करणं अवघड असतं.
(संपादित)
अजून त्या झुडुपांच्या मागे
संगीतकार दशरथ पुजारी यांचे आत्मकथन
शब्दांकन- वसंत वाळुंजकर
सौजन्य- आरती प्रकाशन, डोंबिवली.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.