A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
गमते सदा मजला

गमते सदा मजला । द्वारका वंद्य ।
प्रभुच्या पदांबुजें जगीं । जी होत धन्य ॥

भासत ती मूर्ती बघतां । हा त्यजोनी ।
स्वर्गिचें जणुं सिंहासन । प्रभुराज । अवतरला ॥
गीत - वसंत शांताराम देसाई
संगीत - मास्टर कृष्णराव
स्वर- बालगंधर्व
नाटक - अमृतसिद्धी
राग - भीमपलास
ताल-त्रिताल
चाल-कवन गये
गीत प्रकार - नाट्यसंगीत
अंबुज - कमळ.
उदेपूरच्या स्वतंत्र राज्याची महाराणी असून जिनें वैभवाबद्दल वैराग्य पत्करलें, श्रीकृष्णसेवेला स्वतःला सर्वस्वी वाहून घेऊन 'श्रीकृष्णावरील निष्ठा ही संसाराला अमृत बनविणारी सिद्धि आहे', हा घड़ा जिने घालून दिला, कडव्या हिन्दु धर्माच्या ऐन झेंड्याखाली जिनें सर्व धर्मांना आणि सर्व जातींना सारखे लेखून साधुवृत्तीला अवश्य अशा विश्वकुटुम्बीयत्वाची जोपासना केली, श्रीकृष्णभक्तीच्या ऐन भरांत रचिलेली जिची कवनें अखिल भारतवर्षाला अद्याप वेड लावताहेत, जिचें दर्शन घेण्याची इच्छा परधर्मीय पादशाहांच्या मनांतही जागृत झाली, गुजराथेंत जन्म घेऊनही जिची स्मृति अखिल भारतवर्षाला प्रिय वाटते, अशा मिराबाईच्या अनेक प्रचलित कथांपैकी, इंदूरचे रा. यशवन्तराव ठाकुरदास यांनी प्रसिद्ध केलेली कथा नाट्यरचनेला अधिक अनुकूल वाटल्यामुळे, त्या कथेला अनुलक्षून प्रस्तुतच्या नाटकाची रचना केली आहे.

नाट्यरचना सुलभ होण्यासाठी कांही ठिकाणी मूळ कथेंत किंचित् फेरफार केला असून, मिराबाईच्या श्रीकृष्णभक्तीवर आणि तिच्या भूतदयाप्रेरित धर्मांवर योग्य प्रकाश पडावा म्हणून कुलगुरु विद्याशंकरासारखी कांहीं नवीन पात्रे निर्माण केली आहेत.

माझ्या प्रथम नाटकाप्रमाणेच हें दुसरें नाटक देखील रंगभूमीवर आणण्याचे सर्व श्रेय रा. बालगंधर्व यांसच आहे. आपल्या नेहमींच्या हौशी स्वभावानुरूप त्यांनी या नाटकाची सर्व सजावट तर केलीच परंतु प्रस्तुत नाटक बसविण्याचे कामी सर्व मेहनत त्यांनींच घेतली आहे. या अकृत्रिम प्रेमाबद्दल रा. बालगंधर्वांचे, नाटकांतील कर्णमधुर चाली दिल्याबद्दल मास्तर कृष्णराव आणि रा. लोंढे यांचे आणि नाटक परिश्रमपूर्वक बसविल्याबद्दल गंधर्व नाटक मंडळींतील सर्व नटांचे आभार मानणें अवश्य आहे.

प्रस्तुत नाटकांतील हिंदी भजनें मिराबाई व इतर संतमंडळींची असून, तीं भजनें मिळवून त्यांना चाली लावण्याचें कार्य मास्तर कृष्णराव यांनी केलें आहे.

​'अमृतसिद्धि' नाटकाचे मराठींत प्रयोग करण्याचे सर्व हक्क श्री. नारायण श्रीपाद राजहंस (बालगंधर्व) यांचेकडे आहेत.
(संपादित)

वसंत शांताराम देसाई
दि. २६ ऑक्टोबर १९३३
'अमृतसिद्धी' या नाटकाच्या पुस्तकाच्या प्रथमावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- व्यंकटेश श्रीपाद राजहंस (प्रकाशक)

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.