शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात
धरेवरी अवघ्या फिरलो
निळ्या अंतराळी शिरलो
कधी उन्हामध्ये न्हालो, कधी चांदण्यात
वने, माळराने, राई
ठायी ठायी केले स्नेही
तुझ्याविना नव्हते कोणी आत अंतरात
फुलारून पंखे कोणी
तुझ्यापुढे नाचे राणी
तुझ्या मनगटीही बसले कुणी भाग्यवंत
मुका बावरा मी भोळा
पडेन का तुझिया डोळा?
मलिनपणे कैसा येऊ? तुझ्या मंदिरात
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | वसंत पवार |
स्वर | - | सुधीर फडके |
चित्रपट | - | वरदक्षिणा |
गीत प्रकार | - | भक्तीगीत, चित्रगीत |
ठाय | - | स्थान, ठिकाण. |
राई | - | अरण्य, झाडी / मोहरी. |
सर्व पुण्यात या कार्यक्रमाची मोठ्ठी पोस्टरर्स लावण्यात आली होती.
गदिमांच्या पंचवटी बंगल्याजवळच्या दर्ग्याजवळ सुध्दा या कार्यक्रमाची मोठ्ठी पोस्टरर्स लागली होती.. ती पण भाजपाचे जेष्ठ नेते व माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि गीतरामायणाची पोस्टरर्स ! मुस्लिम बांधवांनी स्वत: लावली होती. बाबरी मशिद प्रकरणानंतर असे घडणे खरं तर अशक्यच होते.
पण हे घडले होते याला कारण केवळ 'गदिमा प्रेम'.. आपल्या जाणत्या वडीलधार्या मंडळींकडून हे यवन मित्र नेहमीच ऐकत होते ती कथा गदिमांच्या माणुसकीची..
१९६५ पुण्यात जातीय दंगल पेटली होती. 'हल्या' नावाच्या एका माथेफिरु माणसाने मंडई गणपतीची विटंबना केली होती. त्याचे परिणाम पुणे भोगत होते. सगळीकडे जाळपोळ, मारामारी, खुनाखुनी सुरु होती. एरवी एकमेकांना ओळखणारे आज ओळख विसरले होते. आज फक्त आग दिसत होती.. ती माणसांच्या डोळ्यांत व हातात..
पुणे-मुंबई रस्तावर 'पंचवटी' बंगल्यात गदिमा अस्वस्थतेने येरझारा घालत होते. दंगलीने त्यांचे कवीमन अस्वस्थ झाले होते. इतक्यात एक माणूस बंगल्याचे दार उघडून पळतपळतच आत आला..
गदिमांनी विचारले, "काय झाले रे?" तो धापा टाकतच म्हणाला, "अण्णा, लवकर चला. आपल्या 'सैयद'ला मशिदी जवळच्या खोलीत कोंडून ठेवले आहे. खूप लोक जमले आहेत. काहीही होऊ शकते. तुम्हीच त्यांना सांगा.."
गदिमांना एकदम 'सैयद' आठवला. पंचवटी जवळच्या दर्ग्याचा care taker. तेथेच दर्ग्याजवळ छोट्या खोलीत सैयद कुटुंब रहात होते. गदिमांच्या मुलीला सायकलवरुन सोडणारा तर कधीकधी व्यंकटेश माडगूळकरांबरोबर चक्क शिकारीला जाणारा सैयद. क्षणाचाही विलंब न करता गदिमा धावतधावत पंचवटीपासून ५०-१०० मी अंतरावर असणार्या दर्ग्याजवळ पोहोचले.
५०-१०० संतप्त माणसांचा समूह तेथे जमला होता. त्यांनी सैयदला बाहेरून कडी लावली होती. जळते कागदी-कापडी बोळे खिडकीतून आत फेकले जात होते. आतून सैयदचा आक्रोश-आरडाओरडा ऐकू येत होता. प्रत्यक्ष मृत्यु समोर उभा होता.
गदिमांना पाहून त्यांच्यातलाच एक माणूस ओरडला, "अण्णा, आज तुम्ही आम्हाला काही सांगू नका. आम्ही तुमचे काहीही ऐकणार नाही."
गदिमा पहात होते. मशिदीच्या जाळीने पेट घेतला होता. सैयदचा आक्रोश वाढतच होता. गदिमा क्षर्णाधात माणसांच्या घोळक्यात घुसले व कोणाचीही पर्वा न करता सैयदच्या दाराची कडी काढली. धाडकन आवाज झाला. दार जोरात उघडले व पेटत्या शर्टानिशी सैयद जिवाच्या आकांताने पळत बाहेर आला व जवळच्या वाकडेवाडीच्या दिशेने पळत सुटला.
नाजूक कवि-मनाच्या गदिमांचे हे अफाट धाडस पाहून संतप्त जमाव क्षणभर स्तब्ध झाला. त्यांना जाणिव झाली की आपल्या हातून केवढे मोठे पाप घडणार होते.. आज गदिमा नसते तर काय झाले असते.. समुहाला चेहरा नसतो ना असतात भावना. आपल्या यवन सहकार्याला आज गदिमांनी वाचवले होते ते स्वत:चे प्राण धोक्यात घालून.. एका चित्रपटाला शोभावी अशी कथा आज प्रत्यक्षात घडली होती..
गदिमांच्या या अफाट साहसाची व प्रेमाची आठवण यवनमित्र ठेऊन आहेत आणि म्हणूनच २००५ साली त्याच मशिदी-दर्ग्या जवळ रामाची-गीतरामायणाची पोस्टरर्स लावायला हेच मित्र पुढे होते. ना त्यांना दिसत होता 'राम' ना 'अटलजी'.. त्यांच्या समोर होता तो फक्त गदिमांच्यातला सच्चा माणूस..
१४ एप्रिल २००५ पुण्याच्या रमणबागेत गीतरामायण सुवर्ण महोत्सवाचा उदघाटन समारोह मोठ्या दिमाखात पार पडला. कधी नव्हे ते एप्रिल असून अचानक प्रचंड पाऊस पडत होता व हजारो पुणेकर रसिक त्या पावसात, चिखलात चक्क खुर्च्या उलटया डोक्यावर धरुन भिजत उदघाटन सोहळा अनूभवत होते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, शरदरावजी पवार, प्रमोद महाजन, मुख्यमंत्री विलासराव देशमूख, बाबासाहेब पुरंदरे, विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर, बालाजी तांबे, बिंदूमाधव जोशी, श्रीधर फडके, माडगूळकर कुटुंबीय या सर्वांच्या उपस्थितीत हा ४-५ दिवसांचा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.
गदिमांनी आपले प्राण धोक्यात घालून एका यवन मित्राचे प्राण वाचविले होते. माणूस जातो पण राहतात ते फक्त त्याचे गूण व त्याच्या आठवणी.. अनेक माणसे आपल्या कर्तुत्वाने मोठी होतात पण आपल्या मातीशी, माणुसकीशी नाते जपणारे असे शतकात एकच 'गदिमा' होतात..
* 'आठवणीतली गाणी'वर प्रसिद्ध झालेले ब्लॉग्ज कॉपी-पेस्ट करणे अनधिकृत आणि अनैतिक आहे. या लिखाणाचा कुठल्याही प्रकारे वापर करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.)
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.