A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
एका तळ्यात होती बदके

एका तळ्यात होती बदके पिले सुरेख
होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक

कोणी न त्यास घेई खेळावयास संगे
सर्वांहुनी निराळे ते वेगळे तरंगे
दावुनी बोट त्याला म्हणती हसून लोक
आहे कुरूप वेडे पिल्लू तयांत एक

पिल्लास दु:ख भारी भोळे रडे स्वतःशी
भावंड ना विचारी सांगेल ते कुणाशी?
जे ते तयास टोची, दावी उगाच धाक
होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक

एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले
भय वेड पार त्याचे वार्‍यासवे पळाले
पाण्यात पाहताना चोरूनिया क्षणैक
त्याचेच त्या कळाले, तो राजहंस एक
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - श्रीनिवास खळे
स्वराविष्कार- आशा भोसले
मधुबाला जव्हेरी
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
चित्रपट - सुखाचे सोबती
राग - भीमपलास
गीत प्रकार - भावगीत, चित्रगीत, बालगीत
  
टीप -
• स्वर- आशा भोसले, संगीत- श्रीनिवास खळे.
• स्वर- मधुबाला जव्हेरी, संगीत- वसंत पवार, चित्रपट- सुखाचे सोबती.
'एका तळ्यात होती..' हे गीत ही मराठी सुगम संगीतातील एक अजरामर कलाकृती आहे. शब्द, संगीत, गायन अशा सर्व बाबतीत मैलाचा दगड ठरलेल्या या गाण्याला अनेक वर्षं लोटूनही.. त्यावर बोलायला शब्द पुरे पडणार नाहीत, असंच हे गीत आहे.

एक सर्वांगसुंदर गीत.. याबरोबरच याच्याशी संबंधित ज्या संगीतेतर गोष्टी आहेत त्याही खूपच विशेष आहेत आणि त्या फारच थोड्यांना माहीत आहेत.

या गीताच्या तीन आवृत्या झाल्या. गीतकार ग. दि. माडगूळकर यांचे हे गीत, वेगवेगळ्या प्रसिध्द संगीतकारांच्या चालींवर वेगवेगळ्या प्रसिध्द गायक–गायिकांनी गायलं आहेत.

पहिली आवृत्ती, जिचे संगीतकार आहेत वसंत पवार आणि गायिका मधुबाला जव्हेरी.
दुसरी आवृत्ती, जी सगळ्यात लोकप्रिय आहे, तिचे संगीतकार आहेत श्रीनिवास खळे आणि गायिका आशा भोसले.
आणि सर्वात नंतरची, संगीतकार नंदू घाणेकर आणि गायक आहेत रवींद्र साठे.

आहे न सगळं मनोरंजक ! आता आपण याच्या मुळाशी जाऊया.
'एका तळ्यात होती..'च्या आरंभाच्या वेळच्या ज्या विविध उपकथा आहेत त्यातली एक अशी की हे गीत 'लक्ष्मीपूजन' या चित्रपटासाठी ग. दि. माडगुळकरांनी लिहिलं. श्रीनिवास खळ्यांना संगीतकार म्हणून प्रथम संधी मिळालेला हा चित्रपट होता. या आणि चित्रपटातल्या काही अन्य गाण्यांसाठी आशा भोसले यांचं नावही ठरलं आणि अचानक खांदेबदल झाला. निर्माते, दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक, सगळेच बदलले. चित्रपटाचं नावही बदललं आणि 'सुखाचे सोबती' असं नवीन नाव आलं. प्रथम ठरलेले कलाकार साहजिकच निराश झाले. 'एका तळ्यात होती..'साठी संगीतकार वसंत पवार आणि गायिका मधुबाला जव्हेरी यांची नावे निश्चित केली गेली.
दरम्यान, खळेसाहेबांनी 'एका तळ्यात होती' आणि 'गोरी गोरीपान फुलासारखी छान' ही 'लक्ष्मीपूजन' साठी ठरलेली गाणी एच.एम.व्ही. या खाजगी ध्वनिमुद्रण कंपनीतर्फे ध्वनिमुद्रित करून घेतली. दोन्ही गाणी आशा भोसले गायल्या, जी गाणी आजही खूप लोकप्रिय आहेत.

त्या काळी तर या दोन गाण्यांनी सगळीकडे बहार उडवली आणि एक समस्या निर्माण झाली. 'सुखाचे सोबती' च्या निर्मात्यानी खळे साहेबांना नोटीस पाठवली. कारण ती गाणी त्यांच्या चित्रपटासाठी होती आणि ती अशी खाजगीरीत्या व्यावसायिक पातळीवर प्रकाशित करणं हा गुन्हा होता. त्या काळात चित्रपट वर्तुळात खूप दबदबा असलेल्या ग. दि. माडगूळकरांची खळेसाहेबांनी मदत घेतली. गदिमांनी त्यांचं वजन वापरून चित्रपट निर्मात्याला ती नोटीस मागे घ्यायला भाग पाडलं आणि संकट दूर झालं. प्रस्तावित 'सुखाचे सोबती' चित्रपटातल्या ध्वनिमुद्रिका प्रकाशितच झाल्या नाहीत. त्यामुळे वसंत पवारांचं मधुबाला जव्हेरी यांनी गायलेलं 'एका तळ्यात होती..' केवळ चित्रपटातच ऐकू येतं.

सुमारे दहा वर्षांपूर्वी आलेल्या तीसर्‍या आवृत्तीचे संगीतकार होते नंदू घाणेकर. संगीत संयोजक होते आजचे प्रतिभावंत, गुणी संगीतकार अजय–अतुल. ते गायलं होतं रवींद्र साठे
१९५४ च्या 'दोस्त' साठी 'दिल देके बहोत पछताये' आणि 'अपनी इज्जत' साठी तलत मेहमूद यांच्याबरोबर 'दिल मेरा तेरा दिवाना', मराठीत 'वैजयंता' मधे वसंतराव देशपांडे यांच्याबरोबर 'सप्रेम नमस्कार' अशी गोड गाणी गायलेल्या मधुबाला जव्हेरी आणि हेवा करावा असा पुरुषी स्वर असलेले रवींद्र साठे हेसुद्धा अप्रतिमच गायलेत पण बाजी मारली आशा भोसले यांच्या गाण्याने.

एका राजहंसाची गोष्ट किती सोप्या पण कल्पक रीतीने गदिमांनी मांडलीय ! 'कोणी न त्यास घेई खेळावयास संगे' अशी कटू सुरवात झालेल्या गोष्टीचा सुखांत 'त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक' असा करणारे महाकवी गदिमा आणि तितकीच सोपी चाल लावणारे श्रेष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांच्यामुळे आशा भोसलेंचं 'एका तळ्यात होती' चा जवाब नाही ! सुरवातीच्या दोन अंतर्‍यात असलेली कटुता आशाताई कुठेही जाणवू देत नाहीत कारण ते एक बालगीत आहे याचं पूर्ण भान त्यांच्या लडिवाळ स्वरात दिसून येतं.
या गाण्याची सोपी चाल हे एक मृगजळ आहे. गदिमांच्या सहज, सोप्या शब्दांमुळे ती चाल सहज गुणगुणता येते हे खरं पण त्या चालीतल्या हरकती, मुरक्या, श्वासनियंत्रण हे सगळं अचाट आहे. सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे या गाण्यातली अभिव्यक्ती ! एका निरागस पिल्लाचं मनोगत व्यक्त करताना आशाताई जे गायल्यात ते अद्वितीय आहे. म्हणूनच गाणं सुरु झाल्यापासून ते संपेपर्यंत आपण हरवून गेलेले असतो, अश्रूंना खंड नसतो.

* 'आठवणीतली गाणी'वर प्रसिद्ध झालेले ब्लॉग्ज कॉपी-पेस्ट करणे अनधिकृत आणि अनैतिक आहे. या लिखाणाचा कुठल्याही प्रकारे वापर करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.)
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

 

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.