A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
दूर राहिले जग स्वार्थाचे

दूर राहिले जग स्वार्थाचे, वळून नको पाहू
सखे चल दूर दूर जाऊ

निळेसावळे वरती अंबर
तळी असावा अथांग सागर
बेट मधोमध हिरवे सुंदर
त्या बेटावर आपण दोघे लक्ष युगे राहू
सखे चल दूर दूर जाऊ

त्या बेटावर नगर नसावे
निसर्गवैभव मुक्त हसावे
दोन जिवांचे राज्य वसावे
राजहंससे नांदू तेथे, खगापरी गाऊ
सख्या चल दूर दूर जाऊ

शांत सुरक्षित स्थल हे रमणी
जळी तरंगे दुसरी धरणी
स्‍नेहल शांती वातावरणी
झाडेवेली करिती स्वागत उंचावून बाहू
सखे ग, सुखे इथे राहू
सखया, सुखे इथे राहू