A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
दूर देशीं राहिलेलें दीन त्याचें

दूर देशीं राहिलेलें दीन त्याचें झोपडें
बापुडा अन्‌ आज येथे पायवाटेला पडे !

शोधण्याला भाकरीचा घांस आला योजनें
आणि अंती मृत्यूच्या घांसांत वेडा सांपडे !

भोंवतीचे उंच वाडे क्रूरतेनें हांसती
मत्त शेजारून कोठें आगगाडी ओरडे !

आणि चक्रे चाललीं तीं- हो महालीं गल्बला
चालला हो प्राण याचा पापणी खालीं पडे !

थांबल्या त्या हालचाली, थांबलें काळीज हो
आणि माशांचा थवा मुद्रेवरोनी बागडे !

मानवांच्या संस्कृतीची काय लागे ही ध्वजा
तीस कोटी दैवतांच्या कीं दयेचें हें मढें?

मूक झालेल्या मुखानें गर्जतें का प्रेत हें
घालिती हे बंद डोळे का निखार्‍याचे सडे !

अन्‌ अजूनी हांसती उन्मत्त हो प्रासाद ते
वेग-वेड्या वाहनांचा घोष ये चोंहीकडे !

भेकडांनो, या इथें ही साधण्याला पर्वणी
पेटवा येथें मशाली अन्‌ झडूं द्या चौघडे !