A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
दुभंगून जाता जाता

दुभंगून जाता जाता मी अभंग झालो !
चिरा चिरा जुळला माझा; आत दंग झालो !

सल जुनेच सलता सलता सुखावून गेले !
अन्‌ हळूच गुणगुणती हे वळ न मोजलेले !
कशी कथा सरता सरता पूर्वरंग झालो !

किरण एक धरुनी हाती मी पुढे निघालो !
अन्‌ असाच वणवणताना मी मला मिळालो !
सर्व संग सुटले, माझा मीच संग झालो !

ज्ञानदेव लिहुनी गेले ओळ ओळ भाळी !
निमित्तास माझे गाणे, निमित्तास टाळी !
तरू काय? इंद्रायणीचा मी तरंग झालो !
गीत - सुरेश भट
संगीत - रवि दाते
स्वर- सुरेश वाडकर
गीत प्रकार - भावगीत
चिरा - बांधकामाचा दगड.
पूर्वरंग - प्रस्तावना / कीर्तनातील पहिले निरूपण. उत्तरंगात कथा येते.
सल - टोचणी.
प्रिय सुरेश भट यांस सस्‍नेह नमस्कार.

तुमच्या 'रंग माझा वेगळा' या संग्रहातला सर्वात चांगला आणि सर्वात वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे तो अर्थात गझल शैलीतील कवितांचा. तुमचे व्यक्तीमत्त्व, तुमच्या व्यथा, तुमच्या वेदना, जीवन जगताना तुम्हाला आलेले कटू अनुभव, या सार्‍यांचा अर्क तुमच्या गझलवजा कवितांत उतरला आहे. उर्दू कवींचे गझल तुम्ही मन:पूर्वक वाचले आहेत, इतकेच नव्हे तर गझलांची जी एक 'खासियत' असते ती तुम्ही स्वत:मध्ये उत्तम मुरवली आहे. एक प्रकारची बेहोषी, बेफिकिरी, जगाबद्दलची पूर्ण उपेक्षा, आपल्याच भावविश्‍वात रमून राहण्याची वृत्ती, तीव्र एकाकीपण आणि अंत:करणात सलत राहिलेल्या दु:खाची जिवापाड केलेली जपणूक-
दुभंगून जाता जाता मी अभंग झालो !
चिराचिरा जुळला माझा; आत दंग झालो !..
किरण एक धरुनी हाती मी पुढे निघालो !
अन्‌ असाच वणवणताना मी मला मिळालो !
सर्व संग सुटले, माझा मीच संग झालो !..

गझल म्हटल्यावार त्यातल्या भावनांचे हे स्वरूप प्रथम मनात उभे राहते. गझलेची ही विशिष्ट वृत्ती तुम्ही पूर्णपणे आत्मसात केली आहे. उर्दू गझल भरपूर वाचण्यात एक धोका असा होता की, तुमच्या कविता ह्या उर्दू किंवा फारसी गझलांचे नुसते अनुकरण होणेही शक्य होते. तथापि तुमच्या बाबतीत तसे ते झाले नाही. तुमच्या या प्रकारच्या कविता अगदी तुमच्या स्वत:च्याच आहेत. गझलवाचनामुळे तुमची विशिष्ट कविवृत्ती सिद्ध झाली असे म्हणण्यापेक्षा, मूळ तुमची मनोवृत्ती गझलच्या भावविश्वाशी मिळतीजुळती असल्यामुळे गझल शैलीतील कवितेचे माध्यम भावाविष्कारासाठी तुम्ही निवडले, असे म्हटल्यास ते अधिक बरोबर होईल. उर्दू गझल मीही पुष्कळ वाचले आहेत. म्हणूनच तुमच्या या कवितांचा अस्सलपणा मला सारखा जाणवत राहिला. त्यातली वेदना सच्चेपणाने जिवाला भिडत राहिली.

तुमच्या या कवितांत सहसा एकही कविता अशी नाही की, ज्यातली एखादी ओळ, एखादी तरी भावना, एखादी तरी कल्पना सतत स्मरणात राहत नाही !
(संपादित)

लता मंगेशकर
'रंग माझा वेगळा' या सुरेश भट यांच्या कवितासंग्रहाच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- साहित्य प्रसार केंद्र, नागपूर.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.