A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
दिवस आजचा असाच गेला

दिवस आजचा असाच गेला, उद्या तरी याल का?
राया अशी, जवळ मला घ्याल का?

पैठणी जांभळी जरीबुंद नेसुनी
मी वाट पाहते केव्हाची बैसुनी
ही घडी मागुनी घडी जातसे सुनी
जागरणाने जळती डोळे; काजळ घालाल का?

किती किती योजिले होते बोलायचे
मज गूज मनीचे होते खोलायचे
संगतीत तुमच्या होते उमलायचे
कळ्या आजच्या शिळ्या उद्याला ओठाशी न्याल का?

या सरत्या राती तळमळते मी अशी
लोळते पलंगी पुन्हा बदलते कुशी
मज रुते बिछाना, नको नको ही उशी
हवा वाटतो हात उशाला, सजणा तुम्ही द्याल का?
आल्यावरी, जवळ मला घ्याल का?