A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
दिन गेले भजनाविण सारे

दिन गेले भजनाविण सारे

बालपणा रमण्यात गमविला यौवनात धन लौकिक प्यारे

मोहापायी मूळ हरपलें अजून शमेना तृष्णा कां रे

म्हणे कबीर, साधुजन ऐका भक्त प्रभुचे तरले सारे
गीत - पुरुषोत्तम दारव्हेकर
संगीत - पं. जितेंद्र अभिषेकी
स्वराविष्कार- भार्गवराम आचरेकर
शौनक अभिषेकी
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक - कट्यार काळजात घुसली
राग - बिलावल
ताल-धुमाळी
गीत प्रकार - नाट्यसंगीत
तृष्णा - तहान.
पृथक्‌
पुरुषोत्तम दारव्हेकर लिखित 'कट्यार काळजात घुसली' या नाटकातील​ हे​ पद आहे. या नाटकाच्या प्रस्तावनेत स्वत: दारव्हेकर यांनीच लिहिले आहे- " 'दिन गेले भजनविण सारे' हा संत कबीरच्या 'बीत गये दिन भजनविना' या भजनाचा मी केलेला स्वैर अनुवाद आहे."

'आठवणीतली गाणी' या माझ्या संकेतस्थळाच्या 'पृथक्‌' या सदरासाठी मी कबीरांच्या 'बीत गये दिन भजनविना' या मूळ रचनेचा शोध घ्यायचा ठरवला. जगजीत सींह यांनी ही रचना गाऊन खूप प्रसिद्ध केली आहे. त्यात 'कहत कबीर..' असा उल्लेख आहे.

पण, गेले काही दिवस 'कबीर' यांच्या साहित्यावर अतिशय अभ्यासपूर्वक लिहिलेल्या, खालील चार पुस्तकांमध्ये शोध घेतला असता, ही रचना सापडलेली नाही. (किंबहुना 'भजन' हा शब्दच या रचनांध्ये आढळत नाही.) 'कबीर' हा माझा अभ्यासाचा विषय नाही. त्यामुळे माझ्याकडून काही गफलत होण्याची शक्यता आहे.

विनंती आहे, ही रचना संत कबीर यांचीच असल्याचे पुष्टीकरण करणारे, त्याचे मूळातील शब्द सांगणरे काही संदर्भ कोणाकडे असल्यास कृपया, त्या पुस्तकाचे नाव, त्याचे लेखक-प्रकाशक याची माहिती कळवा.

सगळं 'तुका ह्मणे.. ' संत तुकारामांचंच असतं असं नाही. संत कबीरांचा 'सीख' धर्मावरील प्रभाव पाहता आणि त्या धर्मात भजन गायनांची परंपरा असल्याने, ही रचना संत कबीर दास यांच्या मृत्यूनंतर (१५१८ साल) त्यांच्या लिखित साहित्याच्या आभावी, त्यांच्या नावावर प्रचलित होत गेली का? अशी मला शंका येत आहे.​ ('कबीर' अभ्यासकांची माफी मागून हे धाडसी विधान केले आहे.)​

मी शोधलेले संदर्भ-
१. कबीर ​-​ पंडित हजारी प्रसाद द्विवेदी (विश्वभारती (शांतीनिकेतन) के संस्कृत और हिंदी के अध्यापक) - हिंदी ग्रंथ-रत्नाकर कार्यालय, बम्बई
२. Songs of Kabir ​-​ ​Rabindranath Tagore - Weiser Books, Boston
३. कबीर ​- ​मंगेश पाडगांवकर - मौज प्रकाशन गृह, मुंबई
४. कबीर ग्रंथावली (सटीक) ​-​ डॉ. पुष्पपाल सिंह (MA, PhD)- अशोक प्रकाशन, दिल्ली

** No internet references, please. Only published books by authors, who have studied Kabeer. **

- अलका विभास
Email- aathavanitli.gani@gmail.com

  पृथक्‌

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  भार्गवराम आचरेकर
  शौनक अभिषेकी