A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
धीर धर भामिनी

धीर धर भामिनी, या क्षणीं
देई धीरता-सुखद-संपदा

त्याग धर्म हा, धन्‍य धन्‍य हा
यदुवर येतील तुझ्या मीलना
भामिनी - स्‍त्री.
मला उमगलेले नारदमुनी

१८८० मध्ये अण्णासाहेब किर्लोस्करांनी संगीत रंगभूमीचा पाया घातला. त्यानंतर देवल, खाडिलकर, गडकरी अशा महान लेखकांनी संगीत नाटकं लिहून रंगभूमीवर सुवर्णयुग निर्माण केलं. ५०-५५ वर्षांनंतर त्या सुवर्णयुगाचा अस्त व्हायला सुरवात झाली. त्याला अनेक कारणं होती. त्यातलं मुख्य कारण म्हणजे बोलपटांचं आक्रमण. अशा कठीण प्रसंगात ज्या नटश्रेष्ठांनी आणि गायकांनी संगीत रंगभूमीची धुरा आपल्या समर्थ खांद्यावर पेलून धरली आणि तिचा र्‍हास थांबविण्याचा कसोशीने प्रयत्‍न केला, त्यात मास्टर अनंत दामले ऊर्फ नूतन पेंढारकर यांच नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल.

त्याकाळी नटाला फारशी प्रतिष्ठा नव्हती. वाया गेलेली मुलं नाटक कंपनीत जात किंवा मुलगा काहीच करत नाही, तर घाल त्याला नाटक कंपनीत असा समाजाचा दृष्टिकोन होता. अशा परिस्थितीत उत्पन्‍नाचं काही साधन नसताना नाटक कंपनीत राहून प्रामाणिकपणे मेहनत करून गायन-अभिनय कुशल नट आणि त्याचबरोबर कुटुंबवत्सल सद्गृहस्थ, असा लौकिक ज्या नटानी मिळविला त्यात दामलेबुवांचा क्रमांक बराच वरचा होता.

आपल्या रंगभूमीवरील कारकिर्दीच्या काळात त्यांनी अनेक भूमिका वठविल्या, परंतु त्यांचा मुख्य लौकिक झाला तो नारदाच्या भूमिकेमुळे. 'नारद म्हणजे दामलेबुवा आणि दामलेबुवा म्हणजे नारद' असं समीकरणच होऊन बसलं.

माझी-त्यांची रंगभूमीवर प्रथम गाठ पडली ती 'सं. सौभद्र'मध्ये. राजाराम शिंदे यांच्या 'नाट्यमन्दार'तर्फे इंदूरला ३ प्रयोग होते. 'सं.सौभद्र', 'घन:श्याम नयनी आला' आणि 'मानापमान'. १९६७ मध्ये मी प्रथमच 'वासवदत्ता' नाटकात नायकाची, 'नयन तुझे जादुगार' आणि 'घन:श्याम नयनी आला' या नाटकात उपनायकाची भूमिका केली होती. परंतु पारंपरिक संगीत नाटकांमधून भूमिका केल्यावरच आपला कस लागणार, हे कळून चुकलं. त्यावेळी आजच्यासारख्या जुन्या नाटकांच्या तालमी नसत. आपलं आपण प्रोज बसवायचं, गाणी बसवायची, वेगवेगळ्या नटसंचात होणारे प्रयोग पाहायचे आणि भूमिका करायची. अर्जुनाच्या भूमिकेत मी प्रथमच उभा राहणार होतो. सोबत कृष्ण- प्रसाद सावकार, सुभद्रा- निर्मला गोगटे, रुक्मिणी- भारती मालवणकर, वक्रतुंड- शंकर घाणेकर असा कसलेला नटसंच होता. मीच नवीन- जुन्या नाटकांचा अनुभव नसलेला होतो. माझी अर्जुनाची पदं सुप्रसिध्द संगीत दिग्दर्शक प्रभाकर भालेकर यांनी बसविली होती, तर गद्यभाग माझे गुरु दाजीसाहेब भाटवडेकर यांनी बसवून घेतला होता. दामलेबुवा नारद होते. मला पूर्वसूचना मिळाली होती, 'बघा हं! दामल्यांबरोबर काम करताना सांभाळा. केव्हा पगडी पाडतील नेम नाही.' मी त्याना नमस्कार करण्यासाठी वाकलो, तेव्हा त्यांनी मला अर्ध्यावर थांबवलं आणि म्हणाले, 'देवाला नमस्कार केलात ना? मग झालं तर.' अर्थात रंगभूमीवर अर्जुन नारदाना नमस्कार करतोच, त्यामुळे ही संधी मला मिळायचीच. एक गोष्ट मात्र खरी की त्यानंतर मी असंख्य वेळा त्यांच्याबरोबर अर्जुनाची व इतरही भूमिका केल्या, पण वर उल्लेखिलेल्या पुर्वसूचनेचा अनुभव मात्र कधीही आला नाही. उलट नेहमी प्रोत्साहन देऊन ते माझ्या भूमिकेचं, गाण्याचं कौतुकच करीत असत.'सं.सुवर्णतुला'तला नारद जेव्हा त्यांनी रंगविला, तेव्हा मूळ चाली बदलून त्यांनी स्वत:च्या पठडीतील चाली लावून त्या तितक्याच लोकप्रिय केल्या.

'हाच मुलाचा बाप'चा प्रयोग साहित्य संघाने करावयाचा ठरविल्यानंतर दिग्दर्शनाची जबाबदारी संघाने माझ्यावर टाकली. मूळ नाटक खूपच मोठं आहे, ते मी संकलित करून दोन अंकात ३ तासात बसवलं. अर्थात गाण्यांची संख्या नांदी धरून ९/१० वर आली. ती सगळी मी दामलेबुवांकडून समजून घेतली. चाली शिकत-शिकता बापूसाहेब पेढारकरांबरोबर काम करताना काय-काय अनुभव आले ते ही मला ऐकायला मिळायचे. त्यांच्याकडे गेलं की पूर्वीच्या नाटक-कंपन्या, नट, साथीदार, गावोगावचे प्रेक्षक इ.चे अनंत मनोरंजक किस्से ऐकायला मिळत. जुन्या काळी होणार्‍या अनेक संगीत नाटकांमधून त्यांनी भूमिका केलेल्या असल्यामुळे त्यांना असंख्य पदं आणि चाली मुखोद्गत होत्या. त्याचा आमच्या पिढीने फारसा उपयोग करून घेतला नाही, हे आमचं दुर्दैव. पण जे कोणी त्यांच्याकडे गेले त्यांना, त्यांनी रिक्त हस्ताने कधीच पाठवलं नाही.

राजकीय, सामाजिक, नाट्यक्षेत्रातील अनेक थोर मंडळींशी त्यांचा परिचय होता. काहींशी तर घनिष्ठ संबंधही होते. पण इतरांशी वागताना ते मूर्तिमंत सौजन्यमूर्ती असत.

मी कोदण्डची भूमिका बसविली आहे, हे कळताच श्री. भोलाराम आठवले यांना माझ्याकडे पाठवून गोव्याच्या दहा प्रयोगांसाठी मला करारबध्द केलं. वर्षानुवर्षं प्रयोग आणि संगीताचे कार्यक्रम केल्यामुळे त्यांची काही ठिकाणं ठरलेली होती. त्यांना ते 'वर्षासन' म्हणायचे. वयोमानपरत्वे त्यांना सगळीकडे हजेरी लावणं झेपत नसे. मग ते त्यांच्या शिष्यांना आणि आमच्यासारख्या कलाकारांना त्या-त्या ठिकाणी पाठवीत असत. कधी-कधी बिदागी कमी असे. त्याबद्दल दामालेबुवांची थिअरी खूपच बोलकी होती. ते म्हणायचे, 'अहो, मोठ्या खरेदीला जास्त पैसे लागतात, पण मिरच्या-कोथिंबीर थोड्या पैशात येते. ही बिदागी म्हणजे मिरची-कोथिंबीर समजायची.' काही दिवसांनी वसई, नालासोपा‍र्‍याची ही माणसं त्यांच्या बागेतल्या राजेळ्या केळ्याचा घड, शेतातले तांदूळ इ. वस्तू प्रेमाने भेट म्हणून घेऊन यायचे. तेव्हा आम्हाला दादांच्या बोलण्यातला अर्थ लक्षात यायचा.

'सहकारी मनोरंजन'तर्फे बसविलेलं 'सं. रीती अशी प्रीतीची' हे नाटक 'वैशाली थिएटर'तर्फे सादर झालं. त्याचं बदललेलं नाव होत 'शोभली भगिनी कृष्णाला'. या नाटकाचं थोडंसं पुनर्लेखन करून दिग्दर्शन मीच केलं होतं. दामलेबुवानी केलेल्या चाली माझ्या लक्षात होत्याच. त्यांच्याकडे जाऊन पुन्हा एकदा उजळणी केली. प्रयोग पाहून दादा म्हणाले, 'तुम्ही हे खूपच छान केलं आहे. आपण पूर्वी केलेलं हेच ते नाटक आहे, हे सांगूनही खरं वाटणार नाही.' ही त्यांची दाद मला खूप मोलाची वाटली.

मी आणि दामलेबुवानी अनेक नाटकांमधून एकत्र भूमिका केल्या. सं. सौभद्र : मी-अर्जुन, दामलेबुवा-नारद, सं. शारदा : मी-कोदंड, दामलेबुवा-श्रीमंत, सं. संशयकल्लोळ : मी-लक्ष्मीधर, दामलेबुवा-विलासधर, सं. पंढरपूर : मी-लिंबराज, दामलेबुवा-नारद, रीती अशी प्रीतीची : मी-कृष्ण, दामलेबुवा-नारद, सं. मृच्छकटिक : मी-चेट, दामलेबुवा-शर्विलक.

एकत्र साकारलेल्या या भूमिकांचा तोल आम्ही वास्तव आयुष्यातही राखला. म्हणूनच ते गेले तेव्हा, माझं एक अंगच गेल्याचा भास झाला. महत्त्वाचं म्हणजे नारदमुनी गेले, असंच तेव्हा सा‍र्‍याना वाटलं आणि त्यांचं पार्थिव उचलताना सर्वानी खरोखरच गजर केला- 'नारदमुनी की जय ! नारदमुनी की जय !'
(संपादित)

अरविंद पिळगांवकर
सौजन्य- दै. महाराष्ट्र टाइम्स (१५ मार्च, २०१५)
(Referenced page was accessed on 19 Oct 2021)

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.