मी मानितो गुण-संपदेला
ती चंचला कमला कशाला
मद-धुंद जी करिते मतिला
मी वंदितो माधवाला
गीत | - | विद्याधर गोखले |
संगीत | - | पं. राम मराठे |
स्वर | - | पं. राम मराठे |
नाटक | - | मेघमल्हार |
राग | - | अभोगी, अभोगी कानडा |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
कमला | - | लक्ष्मी. |
मति | - | बुद्धी / विचार. |
मद | - | उन्माद, कैफ |
'जानन्तु ते किमपि तान् प्रति नैष यत्न:' - भवभूति
चार तासांच्या संगीत-नृत्यमय नाटकात पल्लेदार नि पेचदार प्रसंगांची माळही रचली पाहिजे, अशी ज्यांची अपेक्षा आहे, त्यांच्यासाठी हे नाटक नाही ! ज्यांना नाटकातील रागदारी संगीत, धुंद मैफलींचे प्रसंग अथवा कोटि-प्रचुर संवाद ही त्याज्य कृत्रिमता वाटते, त्यांच्यासाठी हे नाटक नाही ! "गद्य नाटकाचे कायदे वेगळे नि रंगत वेगळी आणि संगीत नाटकाचे कायदे वेगळे नि रंगत निराळी" हे ज्यांना मंजूर नाही, त्यांच्यासाठी ही नाट्य-कृती नाही ! वास्तववादी गद्य नाटकाचे निकष संगीत नृत्यमय नाटकाला जसेच्या तसे लावणे, हेच जर चोखंदळपणाचे लक्षण असेल, तर हे नाटक 'चोखंदळ विद्वानां'साठीही नाही ! संगीत नाट्यरचनेविषयी माझी काही भलीबुरी पण निश्चित धारणा आहे. तिला अनुसरूनच मी हे नवे स्वतंत्र सामाजिक संगीत नाटक सामान्य प्रेक्षकांच्या मनोरंजनार्थ लिहिले आहे.
'पंडितराज जगन्नाथ', 'सुवर्णतुला', 'मंदारमाला', 'मदनाची मंजिरी', 'जय जय गौरीशंकर', या माझ्या पाचही संगीत नाटकांचे सामान्य रसिक प्रेक्षकांनी भरपूर स्वागत केले; अनेक विद्वत्कुंजरांच्या शुंडादंडाचे प्रहार सहन करूनही, ह्या नाटकांनी शतक महोत्सवापासून तो त्रिशतक महोत्सवापर्यंत लीलया वाटचाल केली. त्यांतील अनेक पदें खेड्यापाड्यापर्यंत लोकप्रिय झाली, ही रसिक जनतेची नि जनार्दनाचीच कृपा ! त्यांचाच वरदहस्त मस्तकी असेल, तर हेही नाटक तसेच लोकप्रिय होईल, अशी अपेक्षा आहे.
या पूर्वीची माझी संगीत नाटके ऐतिहासिक, पौराणिक वा मध्ययुगीन कथानकांवर उभारलेली आहेत. पण हे माझे पहिलेच स्वतंत्र सामाजिक नाटक. (या पूर्वीची माझी तीन सामाजिक नाटके,- 'साक्षीदार', 'जावयाचे बंड' व 'अमृत झाले जहराचे' ही रूपांतरित वा आधारित आहेत.) जर हे नाटक संवाद, कथा, रचना इत्यादी बाबतीत सामाजिक वाटूनही शिवाय संगीतमय वाटले, तर माझे श्रम सार्थकी लागल्याचा आनंद मला होईल.
या नाटकावर सर्वात मोठे ऋण आहे सुप्रसिद्ध नाटककार श्री. मो. ग. रांगणेकरांचे त्यांच्यासारखा मुरब्बी, अनुभवी नि शिस्तप्रिय दिग्दर्शक लाभला हे मोठेच भाग्य. अगदी अल्पावधीत, रात्रीचा दिवस करून अन् तहानभूक विसरून त्यांनी नाट्यप्रयोग चोख उभा केला. त्यांच्या कुशल दिग्दर्शनाने नाट्यप्रयोगाच्या सर्वांगांना उजाळा तर मिळालाच, शिवाय प्रस्तुत लेखकालाही अनेक बहुमोल सूचना त्यांनी केल्या. त्यांच्यासारख्या अनुभवसंपन्न दिग्दर्शकाच्या ज्ञानाचा फायदा जसा कलातांना मिळाला, तसाच नाटककारालाही मिळाला. आम्ही सर्वजण त्यांचे ऋणी आहोत.
माझे साहित्यिक स्नेही प्रथितयश नाटककार श्री. विजय तेंडुलकर व सुप्रसिद्ध लघुकथाकार श्री. व. पु. काळे यांच्याकडूनही काही चांगल्या सूचना मला नाट्यलेखन काळात मिळाल्या. भी त्यांचा आभारी आहे.
अनेक व्याप भागे असतानाही संगीतभूषण श्री. राम मराठे, श्री. वसंतराव देशपांडे, आशा पोतदार आणि कल्पक नेपथ्यकार श्री. पांडुरंग कोठारे यांनी जे सहकार्य दिले, त्याबद्दल त्यांचे विशेष आभार.
या नाटकाचे ओळीने सात दिवसांत सात प्रयोग एकाच नाट्यगृहात तुडुंब गर्दीत पार पडण्याचा, एक नवीनच विक्रम अलीकडील काळात प्रस्थापित झाला आहे. हा विक्रम ज्यांच्या दिलदार आश्रयानेच शक्य झाला, त्या संगीत नाटकप्रेमी रसिकांचे मनःपूर्वक आभार मानून, हा ऋणनिर्देश समाप्त करतो.
(संपादित)
विद्याधर गोखले
दि. २१ ऑगस्ट १९६७
'मेघमल्हार' या नाटकाच्या पुस्तकाच्या प्रथमावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- विद्यानंद सरस्वती प्रकाशन, मुंबई.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.