A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
दयाघना का तुटले

दयाघना
का तुटले चिमणे घरटे?
उरलो बंदी असा मी

अरे जन्म बंदिवास
सजा इथे प्रत्येकास
चुके ना कुणास
आता बंदी तुझा मी
दयाघना

दहा दिशांची कोठडी
मोह-माया झाली बेडी
प्राण माझे ओढी
झालो बंदी असा मी
दयाघना

बालपण उतू गेले
अन्‌ तारुण्य नासले
वार्धक्य साचले
उरलो बंदी पुन्हा मी
दयाघना
गीत - सुधीर मोघे
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर- सुरेश वाडकर
चित्रपट - संसार
राग - पूर्वा
गीत प्रकार - चित्रगीत
कलावंताच्या आयुष्यात अधिकृत निवृत्ती ही गोष्टच नसते. त्याचा निवृत्तीकाळ हा दोन कामांच्या मधल्या बेकारीच्या कमी-अधिक काळाच्या रूपांत आयुष्यभर विखुरलेला असतो. 'रिटायरमेंट इन इन्स्टॉलमेंट्स' असं त्याला आमचे शिंदेसरकार गमतीने म्हणायचे. तर असलाच एक निवृत्तीचा हप्ता अधिकाधिक उनाडक्यांच्या प्रवृत्तीमार्गी घालवीत मी पुण्यनगरीत बागडत होतो. अशाच एका भर दुपारी शेजार्‍यांच्या घरी फोन वाजला. फोनवर स्वत: हृदयनाथ. ते खास त्यांच्या शैलीत बोलते झाले, "तिथे काय करताय तुम्ही.. इथे आम्ही किती शोधतोय." तात्पर्य मी तात्काळ मुंबईत पोचणं अगत्याचं होतं. प्रभुकुंजमधील बैठकीत मला प्रकल्प कळला. चित्रपटाचं नाव होतं 'संसार'. हृदयनाथ संगीत देत होते. शान्‍ता शेळके आणि जगदीश खेबुडकरांनी गाणी लिहिली होती आणि उरलेलं एक गाणं मी लिहायचं होतं.

त्या गाण्याचा प्रसंग मला सांगितला गेला. चित्रपटाचा नायक एक आघाडीचा ख्यालगायक. यशाच्या शिखरावर दिमाखात प्रस्थापित झालेला. करियर, कौटुंबिक आयुष्य कुठेही कसलंही न्यून नाही. पण बघताबघता दृष्ट लागावी तसं चित्र पालटलं. कुठल्यातरी क्षणिक मोहापायी धारेला लागतो. व्यसनांच्या विळख्यात गुरफटतो आणि दुर्दैवाचे सारे दशावतार पाहत एका कारगृहात सडत पडतो. त्याचं हे गाणं ! हृदयनाथ म्हणाले, "हे गाणं त्याचं व्यक्तीगत असलं तरी नायकाची व्यक्तीरेखा बघता ह्या गाण्यलाही शास्त्रीय संगीताचा बोझ हवा.. मला एक बंदिश आठवतेय.. रसूलिल्ला पीर न पी. कर दो कर दो बेडा पार हमारा रदूलिल्ला.'

चालीवर गीत लिहिताना ती चाल कुठे 'पकडायची' हे उमगलं पाहिजे. इथे ती पकडायची जागा पहिला शब्दातच होती.. 'रसूलिल्ला' तिथे 'दयाघना' ही हाक आली आणि माझी कविता मूळ बंदिशीच्या शब्दांच्या जोखडातून मुक्त होऊन स्वतंत्रपणे फुलू लागली..
दयाघना, का तुटले.. चिमणे घरटे

पहिले दोन अंतरे लिहिले गेले. तिसर्‍या 'शिखर' अंतर्‍याकडे आलो आणि मनात विचार आला.. संतकवीपासून ते आधुनिक गीतकारांपर्यंत सर्वांनी हाताळलेला एक विचार आपणही आपल्या पद्धतीने मांडून पहावा.. बाल्य, तारुण्य आणि वार्धक्य ह्या तीन अवस्थांचे चित्रण.. 'लडकपन खेल मे खोया, जवानी नींदभर सोया, बुढापा देखकर रोया' म्हणणारे शैलेंद्र.. 'मुकी अंगडी बालपणाची, रंगित वसने तारुण्याची, जीर्ण शाल मग उरे शेवटी लेणे वार्धक्याचे' म्हणणारे गदिमा.. ह्या नंतर आपण वेगळं काय म्हणणार आणि तेही बंदिशीच्या स्वरानुरोधी अल्पाक्षरी आकृतीबंधात.. म्हणजे केवळ सात शब्दांत उभ्या आयुष्याचा वेध. पण अखेर तो घेतलाच.
बालपण उतू गेले
तारुण्या नासले
वार्धक्य साचले
दयाघना..
(संपादित)

सुधीर मोघे
गाणारी वाट
सौजन्य- मेनका प्रकाशन, पुणे.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.