A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
दर्पणी बघते मी गोपाळा

दर्पणी बघते मी गोपाळा
साज सुगंधी करू कशाला?

कोमल माझ्या प्रतिबिंबातुन,
बिंब तयाचे बघते न्याहळुन
नेत्रफुलांची होता पखरण,
फुलवेणी ही घालु कशाला?

स्वैर अजाणु पाठीवरती,
श्यामल कुरळे कुंतल रुळती
सुंदरतेला मिळता मुक्ती,
मोहबंधनी बांधु कशाला?

भरता चिंतन नयनी अंजन,
गोविंदाचे घडता दर्शन
भक्तीचे हे बांधुन पैंजण,
लोकरंजनी नाचु कशाला?