A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
दमलेल्या बाबाची या

कोमेजून निजलेली एक परीराणी
उतरलेले तोंड, डोळा सुकलेले पाणी
रोजचेच आहे सारे काही आज नाही
माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही
झोपेतच आज तुला घेतो मी कुशीत
निजेतच तरी पण येशील खुशीत
सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बाबाची या कहाणी तुला !

आटपाट नगरात गर्दी होती भारी
घामाघूम राजा करी लोकलची वारी
रोज सकाळीस राजा निघताना बोले
गोष्ट सांगायचे काल राहूनिया गेले
जमलेच नाही काल येणे मला जरी
आज परि येणार मी वेळेवर घरी
स्वप्‍नातल्या गावामध्ये मारू मग फेरी
खर्‍याखुर्‍या परीसाठी गोष्टीतली परी
बांधीन मी थकलेल्या हातांचा झुला
दमलेल्या बाबाची या कहाणी तुला !

ऑफिसात उशिरा मी असतो बसून
भंडावले डोके गेले कामात बुडून
तास तास जातो खालमानेने निघून
एक एक दिवा जातो हळूच विझून
अशा वेळी काय सांगू काय काय वाटे
आठवासोबत पाणी डोळ्यांतून दाटे
वाटते की उठूनिया तुझ्यापास यावे
तुझ्यासाठी मीही थोडे लहानगे व्हावे
उगाचच रुसावे नि भांडावे तुझ्याशी
चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी

उधळत खिदळत बोलशील काही
बघताना भान मला उरणार नाही
हसूनिया उगाचच ओरडेल काही
दुरूनच आपल्याला बघणारी आई
तरीसुद्धा दोघेजण दंगा मांडू असा
क्षणाक्षणावर ठेवू खोडकर ठसा
सांगायची आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बाबाची या कहाणी तुला !

दमल्या पायाने मग येईल जांभई
मऊ मऊ दूधभात भरवेल आई
गोष्ट ऐकायला मग येशील ना अशी
सावरीच्या उशीहून मऊ माझी कुशी

कुशी माझी सांगत आहे ऐक बाळा काही
सदोदित जरी का मी तुझ्यापास नाही
जेवू-खाऊ न्हाऊ-माखू घालतो ना तुला
आईपरी वेणीफणी करतो ना तुला
तुझ्यासाठी आईपरी बाबा सुद्धा खुळा
तोही कधी गुपचूप रडतो रे बाळा
सांगायची आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बाबाची या कहाणी तुला !

अजून आठवतं बोळक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात
आणि पहिल्यांदाच घेतलास जेव्हा तोंडी मऊ भात
आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा
रांगत रांगत घेतला होतास घराचा तू ताबा
लुटूलुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं
दूरचं पहात राहिलो फक्त, जवळ पहायचंच राहिलं

असा गेलो आहे बाळा पुरा अडकून
हल्ली तुला झोपेतच पाहतो दुरून
असा कसा बाबा देव लेकराला देतो
लवकर जातो आणि उशिरानं येतो
एका घरी राहूनिया मनामध्ये घोर
तुला तुझा बाबा नाही, मला माझी पोर
बालपण गेले सारे तुझे निसटून
उरे काय तुझ्यामाझ्या ओंजळीमधून
जरी असे तुझ्या ओठी माझ्यासाठी हसे
नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे
तुझ्या जगातून बाबा हरवेल का ग?
मोठेपणी बाबा तुला आठवेल का ग?
सासुराला जाता जाता उंबरठ्यामध्ये
बाबासाठी येईल का पाणी डोळ्यांमध्ये?

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


Random song suggestion
  सलील कुलकर्णी, संदीप खरे