विपदा विकट घोर । निकटी विलोकी ।
मन कंप घेत । गणिते ना विवेका ॥
गीत | - | वि. सी. गुर्जर |
संगीत | - | गंधर्व नाटक मंडळी, बाई सुंदराबाई |
स्वर | - | बालगंधर्व |
नाटक | - | एकच प्याला |
राग | - | काफी, जिल्हा |
ताल | - | त्रिवट |
चाल | - | इतना संदेसवा |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत, मना तुझे मनोगत |
विलोकी | - | दृष्य. |
कै.- हाय !
जगांतलें हें अत्यंत अशुभ अक्षर माझ्या परमप्रिय मित्राच्या नांवामागें लिहितांना, त्याचा प्रेमळ निकट सहवास जवळजवळ सव्वा तप-पर्यंत दिव्यानंद उपभोगणारें माझें हृदय अक्षरशः शतधा विदीर्ण होत आहे. राम गणेश गडकरी यांच्या अत्यंत विमोचनीय अकाल निधनानंतर अवघ्या दोनतीन महिन्यांच्या आंत त्यांची होणारी नाट्यकृति- 'एकच प्याला !' प्रयोगरूपानें महाराष्ट्रीय रसिकांसमोर व पुस्तकरूपानें वाचकवृंदांसमोर यावी, हा दारुण दुर्दैवाचा अतिशय करुणास्पद असा दुर्विलास होय. कै. गडकरी हे महाराष्ट्र नाट्यदेवीच्या कठांतील अत्यंत तेजस्वी- अक्षरशः अतुलनीय असा- अलंकार होते; महाराष्ट्र नाट्यदेवीचा तर ते केवळ पंचप्राण व विनोदवाङ्ममयाचे अगदीं अद्वितीय असे पराक्रमशाली वीर होते. महाराष्ट्रीय रसिकांना त्यांचा परिचय करून देणें म्हणजे काळोख्या रात्रीं लुकलुक करणार्या काजव्यानें मध्यान्हीच्या परमतेजोमय सूर्यनारायणाची जगाला ओळख करून देण्यासारखेंच हास्यास्पद आहे ! तरीहि केवळ 'मित्रकर्तव्य' म्हणून 'मनोरंजना'च्या फेब्रुवारी १९१९ च्या अंकांत मीं कै. गडकरी यांचा अल्पसा परिचय महाराष्ट्राला करून देण्याचें धाडस केलें, म्हणून त्यांचें विस्तृत चरित्र लिहिण्याचाहि माझा मानस आहे, एवढेच येथें सांगणें इष्ट वाटतें.
महाकवींच्या काव्य-नाटकांतून जशा नानारसपूर्ण चमत्कृति दिसून येतात तसेच परमेश्वरी कृतींमध्येंहि निरनिराळ्या रसांनी पूर्ण असे चमत्कार आढळून येतात. कै. गडकरी यांच्यासारख्या महाकवीच्या एका उत्कृष्ट नाट्यकृतीला माझ्यासारख्या एका अल्पशक्ति शब्द जुळविणार्याची पद्यें जोडलीं जाण्याचा योग त्यांच्या अकाल मृत्यूमुळें यावा, हा परमेश्वरी चमत्कार असून तो कांहींसा करुणरसानें व कांहींसा हास्यरसानें भरलेला आहे. सकल जगाचा अधीश्वर अशा सम्राटानेंहि ज्याला परमाद वस्त्र धारण करावें, असें त्रिभुवनाच्या मोलाचें महावस्त्र विणणारा अतुलनीय कुशल कारागीर, तें वस्त्र विणीत असतां- नव्हे, जवळजवळ तें वस्त्र पूर्ण झालें असतां निर्घुण कालाच्या अरसिक दुष्ट कृतीमुळें मध्येंच रिवास व्हावा आणि तें महावस्त्र त्याच्या किंचित अपूर्णावस्थेमुळें त्या राज्याच्या राजाला कांहीसें अनुपयुक्त व्हावें, तशीच प्रस्तुत नाटकाची त्याच्या लेखकाच्या अकाल कालविवशतेमुळें स्थिति झाली होती. 'एकच प्याला' ह्या नाटकाचा गद्यभाग कै. गडकरी यांच्या हातून १९१७ सालच्या नोव्हेंबर महिन्यांतच लिहून पुरा झाला व तें नाटक त्यांनी महाराष्ट्रीय नाटक मंडळ्यांत अग्रगण्य अशा 'गंधर्व नाटक मंडळी'ला प्रयोगासाठी देऊनहि ठेविलें होतें. परंतु पुढें निरनिराळी कारणें उपस्थित होऊन गंधर्व नाटक मंडळीसारख्या संगीत मंडळीला प्रयोगासाठी अत्यंत आवश्यक असा त्या नाटकाचा पद्यभाग तयार करण्याचें काम दिरंगाईवर पडत गेलें. १९१८ सालच्या मार्च महिन्यापासूनच रा. गडकरी प्रथमप्रथम मलेरिया तापानें व नंतर क्षयानें अंथरुणाला खिळले. दुखण्यांतून बरे होऊन आपण नाटकाचा पद्यभागहि पुरा करू, अशी त्यांना फार आशा होती. परंतु परमेश्वरी संकेत निराळाच होता !
गेल्या फेब्रुवारी महिन्यांत, गंधर्व नाटक मंडळीचे परम सन्मान्य आश्रयदाते गुर्जराधिपति श्रीमन्महाराज सयाजीराव गायकवाड यांच्यासमोर मामुली वहिवाटीला अनुसरून एखादा नवीन नाट्यप्रयोग करून दाखविण्याची मंडळीला आवश्यकता उत्पन्न झाल्यामुळें, मंडळीच्या चालकांनी नाटकांतील पद्यभाग निदान बडोद्याच्या गरजेपुरता तरी, प्रस्तुत लेखकाकडून तयार करून घेण्याविषयी रा. गडकरी यांना विनंति केली आणि ती विनंति मान्य करून नाटकांतील पदें तयार करून देण्याविषयीं रा. गडकर्यांनी मला मित्रभावानें आज्ञा केली. रा. गडकरी यांच्यासारख्या आपल्या परम हितचिंतक प्रिय सुहृदाच्या व गंधर्व मंडळीचे मालक रा. नारायणराव राजहंस व रा. गणपतराव बोडस यांच्यासारख्या गुणी, प्रेमळ नटमित्रांच्या या आज्ञेला मला मुकाटयानें मान द्यावाच लागला. कै. गडकर्यांसारख्या दैवी प्रतिभाशाली कविश्रेष्ठाच्य एका कलाकृतीला शोभेसा पद्यभाग जोडण्याला आपण अगदीं नालायक आहोंत, अशी आतांप्रमाणें त्या वेळींहि प्रस्तुत लेखकाला पूर्ण जाणीव होती व दुखण्यानें अंथरुणाला खिळल्यामुळें अगदीं नाइलाज होऊन प्रिय मित्राने केलेली आज्ञा अमान्य करणें केवळ अशक्य असल्यामुळें व दुखण्यांतून उठल्यानंतर रा. गडकरी हे स्वतःच आपल्या नाटकाकरता हा भाग तयार करणार असल्यामुळें, बडोद्याच्या गरजेपुरता तो पद्यभाग तयार करून देण्याचें काम प्रस्तुत लेखकानें पत्करलें व योग्य वेळीं आपल्या पामर शक्तीप्रमाणें तें पारहि पाडलें.
मध्यंतरीं रा. गडकरी यांचें दुखणें अगदीं विकोपाला जाऊन 'एकच प्याला' नाटकाचा प्रयोग श्रीमन्महाराजांपुढें होण्यापूर्वी सुमारें एक महिना- ता. २३ जानेवारी १९१९ रोजी राजयक्ष्म्याच्या मार्गानें या कविराजाला देवरायानें, व्यास, वाल्मीकि, कालिदास, भवभूति, जगन्नाथराय, शेक्सपीअर, शेले, कीट्स, बायरन, ह्यूगो, मोलियर, गटे, डान्टे, होमर, हाफीज, शेख सादी, कलामी, मायकेल, मधुसूदन दत्त, ज्ञानदेव, मुक्तेश्वर, मोरोपंत, केशवसुत वगैरे त्रिभुवनवंद्य कविरत्नांच्या स्वर्गीय सभेला अधिकच देदीप्यमान करण्याकरतां आम्हां दुर्दैवी महाराष्ट्रीयांमधून नेलें व रा. गडकरी आपल्या नाटकाच्या सुंदर गद्यभागाला पूर्णपणें साजेसा रमणीय पद्यभागहि तयार करून मला पडलेल्या चमत्कारिक पेंचांतून माझी सुटका करतील, ही माझी आशा जेथल्या तेथें वितळून गेली ! मरणापूर्वी चार-सहा दिवस माझीं पद्यें निदान आपल्या नजरेखालून तरी जावीं, असा गडकर्यांना ध्यास लागून राहिला होता; परंतु तो माझ्या दुर्दैवानें पुरा झाला नाहीं. ज्या दिवशीं माझीं पद्यें त्यांच्या अवलोकनार्थ रवाना झालीं त्याच दिवशीं रात्रीं त्यांचा अंत झाला !
या दैवदुर्विलासामुळें, नाटकाला तात्पुरता म्हणून जोडलेला पद्यभाग कायमचाच जोडणें मला भाग पडलें आहे.
रा. गडकरी यांच्या या नाटकांतील गद्याच्या भरजरी सुंदर शालीला माझ्या पद्यांच्या कळकट घोंगडीचें 'ठिगळ' अगदीं नाइलाज होऊन कसे जोडलें गेलें, याचा अगदी खराखुरा असा हा इतिहास आहे. यांत खोट्या विनयाचें दिखाऊ प्रदर्शन करण्याचा हेतु नाहीं- ही वस्तुस्थिति आहे. इतिवृत्त आहे. दुःखांतहि सुख मानून घेण्याच्या नैसर्गिक मानवी प्रवृत्तीप्रमाणे, या बाबतींत माझ्या मनाला एवढेंच समाधान वाटत आहे की, “संगीत एकच प्याला' नाटकाच्या दुर्दैवानें प्रस्तुत नाटकाच्या प्रेक्षकांना तरी- श्रोत्यांनाच म्हणणें अधिक योग्य- 'नाटकांतील पद्यें अगदीं रुक्ष, बेचव व निगोड लागत नाहींत तर ती गंधर्व नाटक मंडळींतील गायनपटु नटांच्या- विशेषतः संगीतदेवतेचे कंठमणीच असे रा. नारायणराव राजहंस ऊर्फ बालगंधर्व या गंधर्वतुल्य कंठांतून त्यांना ऐकावयाला मिळत आहेत ! अशा रीतीनें माझ्या पद्यांमध्यें विलक्षण 'गोडी ' उत्पन्न झाली आहे, हे खास !
नाटकाची प्रस्तावना म्हणजे कांहीं त्याचें सूक्ष्मदृष्टीने गुणदोष विवेचन करणारी टीका नव्हे. ग्रंथकर्त्यांच्या हृदयाची वाचकांना ओळख करून दिली कीं, प्रस्तावनेचें काम संपले. महाराष्ट्र रसिकांच्या हृदयाचा भंग करून ग्रंथकर्ता अकालीं स्वर्गीं निघून गेल्यामुळें त्यांचें हृद्गत त्यांनी आता त्यांच्या नाटकावरूनच प्रत्यक्ष समजून घेतलें पाहिजे. नाटकाच्या पद्यभागासंबंधानें मला काय सांगावयाचें होतें, तें मी वर सांगितलेच आहे. तरीहि स्थूलमानानें प्रस्तुत नाटकासंबंधानें कै. गडकर्यांच्या कट्ट्या शत्रूलाहि कबूल करावेंच लागेल कीं, जगांतील सर्व वाङ्मयांत दारूपासून होणार्या दारुण अनर्था-संबंधानें जीं नाटकें लिहिलीं गेलीं आहेत, त्यांमध्यें 'एकच प्याला' नाटकाइतकें विलक्षण परिणामकारी खरेंखुरें (Realistic), प्रेक्षक-वाचकांच्या हृदयांची जबरदस्त पकड घेऊन त्यांना पिळून काढणारें नाटक एकहि नाहीं !
साधारणतः नाटककार आपलीं नाटकें रम्य परिणामकारक व आकर्षक करण्याकरितां हृदयंगम प्रणय, अद्भुतरम्यता (Romance), उद्दाम काव्य-कल्पना वगैरे ज्या साधनांचा उपयोग करतात, त्या साधनांचा फारसा उपयोग न करतांहि, कै. गडकरी यांनीं आपली अलौकिक ईश्वरी प्रतिभा व सूक्ष्म अवलोकन यांच्या जोरावर प्रस्तुत नाटकांत दारूबाज आयुष्याचें अगदीं खरेंखुरें, हृदयविदारक छायाचित्र (Photograph) दाखवून, तें तितकेंच किंबहुना अधिकच परिणामकारक व आकर्षक केलें आहे. कै. गडकरी यांचें प्रस्तुत नाटक म्हणजे जगाच्या नाट्य-वातावरणांत महाराष्ट्राच्या श्रेष्ठ प्रतिभेची दिमाखानें उंच फडफडणारी विजयपताकाच होय, असें मला वाटतें.
'एकच प्याला' नाटकाचे बडोदें व मुंबई येथें जे खासगी व सार्वजनिक प्रयोग झाले ते पाहून कित्येक शिष्टविशिष्टांनी या नाटकावर असत्याचा (Over colouring) व अनैसर्गिकतेचा दोषारोप केला, तो प्रस्तुत लेखकाच्या कानांवर आला आहे. साथीच्या या दिवसांत वरवर पाहणार्या प्रेक्षकापर्यंत ही मताची नवी साथ पसरण्याची मला भीति वाटत आहे ! या शिष्टांचा हा आरोप ऐकून, नाटकाचा नायक सुधाकर व त्याचे दारूबाज मित्र यांनी प्राशन केलेल्या दारूचा परिणाम या टीकाकारांच्या मस्तकावर होऊन, त्या धुंदींत ते असें बेताल बडबडू लागले असावेत असें मला वाटल्यावांचून राहिलें नाहीं ! कारण प्रस्तुत नाटकाची उभारणी, कै. गडकरी यांनीं खुद्द स्वतःच्या व इतरांच्या खर्याखुर्या अनुभवांच्या पायावर केली आहे. सुधाकराच्या मदिरासेवनामुळें त्याच्या कुटुंबाचा जो सत्यानाश झालेला या नाटकांत कै. गडकरी यांनीं दाखविला आहे, त्यापेक्षाहि अत्यंत भयंकर व हृदयभेदक अनर्थ दारूमुळें प्रत्यक्ष घडून येऊन त्या दारूबाजांचीं कुटुंबेच्या कुटुंबें साफ धुळीला मिळाल्याची उदाहरणें जगांत हवीं तेवढीं दिसून येतात. मात्र बघणाराचे डोळे मत्सररूपी दारूनें तारवटलेले नसले पाहिजेत !
खुद्द नाटकाविषयीं मला जें प्रेक्षक-वाचकांना थोडक्यांत सांगावयाचें होतें तें मीं आतांपर्यंत सांगितलें. आतां माझ्या स्वर्गस्थ मित्राच्या वतीनें आभार मानावयाचें काम राहिलें आहे. प्रस्तुत नाटककर्त्याच्या मृत्यूनंतरहि अत्यंत कळकळीनें व अगदी आपलेपणाच्या जाणिवेनें अतिशय परिश्रमांनीं रंगभूमीवर आणून व नाटकांतील प्रसंगाचे फोटो काढवून, आपल्या अप्रतिम संगीत व नाट्य-नैपुण्यानें कै. गडकर्यांच्या दिव्य प्रतिभेचा परिचय प्रत्यक्ष व अतिशय उठावदार रीतीनें महाराष्ट्रीय रसिकांना करून दिल्याबद्दल गंधर्व नाटक मंडळीचे मालक रा. नारायणराव राजहंस व रा. गणपतराव बोडस यांचे मी प्रथम अगदीं अंतःकरणपूर्वक आभार मानतों.
शेवटी माझ्या मित्राच्या अकाल निधनामुळें पोरक्या झालेल्या या नाटकाकडे रसिकतेबद्दल व सहृदयतेविषयीं अतिशय विख्यात असलेले महाराष्ट्रीय प्रेक्षक व वाचक प्रेमानें व केवळ आपलेपणाच्या दृष्टीनेंच पाहतील, अशी
माझी खात्री असल्यामुळें तसें करण्याविषयीं मी त्यांना निराळी विनंति करीत नाहीं. कारण, खुद्द माझ्या वतीनेंच त्यांना मला तशी एक विनंति करावयाची आहे. कै. गडकरी यांच्या सर्वांगसुंदर गद्यभागाबरोबर त्यांच्याच
दिव्यस्फूर्तीनें, स्वर्गीय प्रतिभेनें व खर्याखुर्या काव्यशक्तीनें बाहेर पडलेली रमणीय पद्ये ऐकावयाला व वाचावयाला न मिळाल्यामुळे त्यांची अगोदरच भारी तीव्र निराशा झाली असेल; त्यांतून माझ्या अनेकदोषदुष्ट पद्यांची आपत्ति त्यांच्यावर कोंसळली आहे ! अशा स्थितींत, त्यांना मला एवढीच नम्र विनंति करावयाची आहे, कीं या आपत्तीबद्दल, सर्वगुणसंपन्न, प्रतिभाशाली नररत्नांना नेहमीं अकालींच ओढून नेणार्या अरसिक, अपंडित अशा निर्घुण विधीलाच त्यांनी दोष दिला पाहिजे. याशिवाय रसिकांना दुसरी कांहीं सबब सांगावयाला मला तरी कोठें तोंड आहे?
(संपादित)
विठ्ठल सीताराम गुर्जर
दि. २२ मे १९१९
'एकच प्याला' या नाटकाच्या पुस्तकाच्या प्रथमावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
(पुनर्मुद्रण फेब्रुवारी १९७०)
सौजन्य- अ. मो. पुराणिक (प्रकाशक)
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.