A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
दहन खर हृदया

दहन खर हृदया ।
महाघोर रणरणक करित कृष्णासि बहु आकुल-भावना सभय ॥

आधार विश्वासि । मंगल साधनासि ।
विकृति होतां तया । आगत हा महाप्रलय ॥
गीत - वि. सी. गुर्जर
संगीत - मास्टर कृष्णराव
स्वर- बालगंधर्व
नाटक - नंद-कुमार
राग - तिलककामोद
ताल-झपताल
चाल-सकल दुखहरन
गीत प्रकार - नाट्यसंगीत
आकुल(ळ) - घेरलेला / ग्रस्त झालेला / पूर्ण व्यापलेला / व्याकुळ.
आगत - उत्पन्‍न झालेले.
खर - कठिण (संस्कृत) / गाढव (मराठी).
रणरणक - मदन, कामदेवता / दु:ख, चिंता.
श्रीकृष्णासारखी लोकोत्तर, त्रिभुवनवंद्य विभूति भारतवर्षाच्या काय, परंतु जगाच्या इतिहासांत आजपर्यंत एकही झाली नाहीं. श्रीकृष्णाच्या हातून जगन्‍मंगलाच्या ज्या दिव्य मंदिराची उभारणी झाली त्याचा पाया, तो 'नंद-कुमार' असतां कसा घातला गेला, याविषयीची कल्पना प्रस्तुत नाटकांत प्रथित केली आहे.

प्रस्तुत नाटक लिहितांना, माझे प्रिय बंधु, सुप्रसिद्ध नाट्याचार्य के. श्री. राम गणेश गडकरी यांनी केलेल्या अनेक अमूल्य सूचनांचा मला अत्यंत उपयोग झाला आहे. माझ्या प्रिय बंधूच्या मजवरील अखंड ऋणांत हीहि एक भर पडली आहे !

नाटकांतील पद्यांच्या चाली मुख्यतः सुप्रसिद्ध गायनाचार्य कै. श्री. भास्करबुवा बखले, यांचे पट्टशिष्य श्री. कृष्णराव फुलंब्रीकर (मास्टर कृष्णराव) यांनी दिल्या असून त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे.

उत्कृष्ट साजसजावटीने आणि विशेष परिश्रमानें नाटक रंगभूमीवर आणण्याचे सर्व श्रेय 'गंधर्व नाटक मंडळी'चे मालक श्री. नारायणराव राजहंस (बालगंधर्व) यांजकडेच मुख्यतः असून, 'गंधर्व नाटक मंडळी'तील सर्व नटांचे या कामी फार साहाय्य झाले आहे. याबद्दल श्री. बालगंधर्व आणि 'गंधर्व नाटक मंडळी' यांचा मी अत्यंत ऋणी आहे.

नाटकांतील पात्रांच्या भारतकालीन वेषाची परिकल्पना कोल्हापुरच्या सुप्रसिद्ध 'महाराष्ट्र फिल्म कंपनी'चे चालक श्री. बाबूराव पेंटर यांनी दिली असून, पोषाखांच्या भव्य उठावदारपणाचे सर्व यश केवळ त्यांना आहे. श्री.बाबुराव यांचे याबद्दल आभार मानावे तेवढे थोडे आहेत.
(संपादित)

विठ्ठल सीताराम गुर्जर
दि. १८ जानेवारी १९२५
'नंद-कुमार' या नाटकाच्या पुस्तकाच्या प्रथमावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- विठ्ठल सीताराम गुर्जर (प्रकाशक)

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.