काय झालं बया?
दादला नको ग बाई
मला नवरा नको ग बाई !
मोडकंच घर, तुटकंच छप्पर
पन र्हायाला जागा नाही
मला दादला नको ग बाई !
फाटकंच लुगडं, तुटकीच चोळी
पन शिवायला दोरा न्हाई
मला दादला नको ग बाई !
कळण्याची भाकर, अंबाड्याची भाजी
वर तेलाची धारच न्हाई
मला दादला नको ग बाई !
एका जनार्दनी समरस झाले
पण तो रस येथे नाही
मला दादला नको ग बाई !
कळणा | - | धान्याची चुरी. |
दादला | - | नवरा. |
मोडकेसें घर तुटकेसें छप्पर । देवाला देवघर नाहीं । मला दादला नलगे बाई ॥१॥
फाटकेंच लुगडें तुटकीसी चोळी । शिवाया दोरा नाहीं ॥२॥
जोंधळ्याची भाकर अंबाड्याची भाजी । वर तेलाची धार नाहीं ॥३॥
मोडका पलंग तुटकी नवार । नरम बिछाना नाहीं ॥४॥
सुरतीचे मोती गुळधाव सोनें । राज्यांत लेणें नाहीं ॥५॥
एका जनार्दनीं समरस झालें । पण तो रस येथें नाहीं ॥६॥
(नवार - पलंग विणण्याची सुती पट्टी, गुळधाव - गुळाच्या रंगाचे, पिवळेधमक)
या रचनेत नाथांनी वापरलेली रूपके-
मोडके घर - पार्थीव देह
तुटके छ्प्पर - अविद्या
देवघर - अंतरीचा शुद्धभाव
फाटके लुगडे - भ्रांती
तुटकी चोळी - कुबुद्धी
दोरा - यम-नियमाचे बंधन
जोंधळ्याची भाकर, आंबाड्याची भाजी - अशाश्वत मायारूपी विषय
तेल - स्नेह
नरम बिछाना - शाश्वत सुख
सुरतीचे मोती, गुळधाव सोने - ज्ञान
तो रस - परमात्मसुख
घर मोडके आहे, छप्पर तुटके आहे. देवासाठी देवघर नाही, असल्या घराचा मालक असलेला नवरा मला नको.
नेसायला फाटके लुगडे आहे, चोळी तुटलेली आहे पण शिवायला दोराच नाही.
जोंधळ्याची भाकरी आणि अंबाड्याची भाजी असा कोरडा मामला आहे.. त्यावर तेलाची धार नाही.
मी समरस झाली आहे खरी पण 'तो' रस येथे नाही जो एकनाथाला जनार्दनाशी एकरूप होताना लाभला.
साधारणपणे लग्नानंतर काही वर्षातच बायकोला धिटाई येते. ती चारचौघात सुद्धा नवर्याला टोमणे मारायला बिचकत नाही आणि आपले पाणी ओळखलेल्या पत्नीला आता काय बोलायचे? या विचाराने बापडा नवराही गप्प बसतो. नवराबायकोच्या भांडणात फक्त लग्नाआधीच मध्यस्थि करावी, हे बरे, म्हणून समाजही गप्प असतो.
इथे तर अध्यात्मिक रुपकातली नवरी बोलते आहे ! मग 'विकल्प' नवर्याच्या संसाराचं चित्र ती अगदी ठसठशीतपणे रंगवणारच. त्यामुळे 'विकल्प' नवरा नकोच असेही ती म्हणणारच. 'विकल्प' मेला की निम्ने मन मरते. म्हणून तो नवराच नको. त्याने घेतलेलं घर नऊ ठिकाणी क्षतं असलेलं आहे- म्हणजे हा देह. हे फाटके लुगडे अज्ञानाचे आहे आणि तुटकी चोळी ही मोह आणि मोहाचे बंद असलेली आहे. हे बंद इतके लांबलचक आहेत की त्यांची गाठच बांधता येत नाही. म्हणून तुटकी चोळी म्हटले आहे. त्याला शिवायला दोरा कुठला आणायचा? जोंधळ्याची भाकर ही व्यावहारीक माहितीचे प्रतिक आहे. तिच्यामुळे मिळणारा पैसा म्हणजे आंबाड्याची भाजी आहे. ती नेहमी आंबट असते. तिनं पित्त वाढतं. राम जोशी म्हणतात , "वित्त पाहता पित्त येतसे ।" खा खा सुटते. यावर तेल म्हणजे स्नेह, प्रेम यांची धार नसते. माणूस पैसेकरू झाला की तो माणसांपासून तुटतो, असे म्हणतात.. म्हणून स्नेहाची धार नाही अशी तक्रार आहे. खाण्यापिण्यात ही जर आबाळ तर हा 'विकल्प' नवरा शेज तरी सुखाची कशी देईल? म्हणजेच, "जया मानवा राम विश्राम नाही.." त्याला सर्व काही बाधायचेच. पण लग्न लागलंच आहे. तेंव्हा पलंग मोडका का असेना, नांदले पाहिजे. पण सद्गुरू शरण एकनाथ महाराजांना जो भक्तिज्ञान कर्माचा रस लाभला, तो मात्र येथे नाही, असे ती म्हणते.
(संपादित)
व्यंकटेश कामतकर
सार्थ भारूडे
सौजन्य- धार्मिक प्रकाशन संस्था, मुंबई.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.