आली उमलुनी धुंद शर्वरी
भावफुलांचे मोरपिसारे
बघताबघता फुलले सारे
स्वप्नसुगंधित हसले वारे
आली बहरुनी गंधमाधुरी
धागे जुळले कैसे? कोठे?
जागे नयनी नवखे नाते
हृदयी हुरहुर कसली दाटे?
तनमन उधळी ही तान भरजरी
गीत | - | वंदना विटणकर |
संगीत | - | दत्ता डावजेकर |
स्वर | - | सुधीर फडके |
नाटक | - | आसावरी |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
शर्वरी | - | रात्र. |
नाटक प्रस्तावनेवर चालत नाहीं, तें चालतं रसिक प्रेक्षकांवर ! म्हणूनच मागील पानावर प्रस्तावना लिहिण्याचा मोह मी टाळला ! पण हें आभाराचं पान मी टाळूं शकत नाहीं ! खरं पाहिलं तर हें नाटक मी लिहायला घेतलं एक गम्मत म्हणून महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेंसाठीं ! माझे मित्र श्री. अनंतसेन सेंजित हे मोठे उत्साही, हरहुन्नरी गृहस्थ ! त्यांना मी केव्हांतरी शब्द दिला (असं ते म्हणतात) स्पर्धेसाठीं नाटक लिहून देण्याचा! आणि अक्षरशः माझ्या मानेवर बसून तो शब्द मला पाळायला लावला.
या नाटकाच्या लिखाणाच्या चर्चेच्या वेळीं माझे मित्र श्री. शरद पिळगांवकर यांचे बरेच सहाय्य झाले. नाटकाची रंगावृत्ति त्यांच्या सुंदर हस्ताक्षरांत त्यांनी लिहून दिली ! नाटक लिहून झालें आणि माझ्या मनांत विचार आला कीं हें नाटक हौशी लोकांपेक्षां घंदेवाईक कलावंताच्या संचांत बसवावं ! आणि त्याच्या बदलीं माझें नवें नाटक 'अबोल झालीस कां?' राज्य नाट्यस्पर्धेसाठीं द्यावें ! श्री. सेंजित यांनी माझी सूचना मान्य केली आणि 'नाट्यवैभव' या माझ्या संस्थेतर्फे ४ ऑक्टोबर १९६७ रोजी 'आसावरी' सांगलीच्या रंगमंचकाबर छेडली गेली. या नाटकाच्या निमित्तानें 'अनुपमा' ही नवी तारका प्रकाशांत आली. अर्थात् हें 'फाइंड' श्री. पिळगांवकर यांनीं शोधलें. मी तिला शोभेल अशी भूमिका दिली आणि दिग्दर्शक श्री. मो. ग. रांगणेकर यांनी तिची मूर्ति घडवली.
माझ्या बाबतींत एक प्रवाद असा आहे कीं, 'कालेलकरांचे नाटक सेटिंग आणि शरद तळवलकर यांच्याशिवाय उभंच राहूं शकत नाहीं ! आणि हें खरं असलं तरी यामागें आहे मित्रप्रेम ! 'अपराध' मधील गोळेमास्तर, 'दिवा' मधील गुप्तेकाका आणि 'आसावरी'तील हॉटेलमालक या तळवलकरांनीं साकार केलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या दीर्घकाळ स्मरणांत राहतील.
दिग्दर्शक श्री. मो. ग. रांगणेकरांनी या नाटकासाठी अमाप श्रम घेतले. श्री. दत्ता डावजेकरांनी सूर छेडले आणि त्यांत जीव ओतला पं. भीमसेन जोशी आणि सुधीर फडके यांनीं. भीमसेन जोशी यांचें गाणं तर माझे मित्र श्री. वसंतराव कुळकर्णी यांच्या क्लासवर रेकॉर्ड केलं ! त्यांचींच वाद्यं, साथीला त्यांच्याच क्लासमधले विद्यार्थी !
माझे मित्र अरविंद चित्रे यांचाहि या नाटकाच्या यशांत हिस्सा आहे ! नाटक मी लिहिलं पण मित्रांनीं तें उभं केलं ! प्रेक्षकांनी 'दाद' दिली. आणि त्यावर शिक्कामोर्तब करायचंय् तुम्हीं वाचकांनी ! रसिक प्रेक्षक आणि वाचक यांच्या बाबतींत एकच म्हणता यईल-
जेथें जातों तेथें तूं माझा सांगती
चालविशी हातीं धरुनिया !
(संपादित)
मधुसूदन कालेलकर
'आसावरी' या नाटकाच्या पुस्तकाच्या प्रथमावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- रंजना प्रकाशन (प्रकाशक)
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.