A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
चापबाण घ्या करीं

आश्रया गुहेकडे जानकीस पाठवा
चापबाण घ्या करीं सावधान राघवा !

मेघगर्जनेपरी, काननांत हो ध्वनी
धांवतात श्वापदें, भक्ष्यभाग टाकुनी
कोंकतात भेंकरें, कंपितांग थांबुनी
धूळ ही नभीं उडे, सैन्य येतसे कुणी
खूण ना दिसो कुणा, दीप्त अग्‍नि शांतवा

उत्तरेस तो थवा, काय तर्क बांधुनी?
पाहतोंच काय तें, तालवृक्षिं जाउनी
कोण येइ चालुनी, निर्मनुष्य ह्या वनीं
सिद्ध राहूं द्या तळीं, चाप रज्जू ओढुनी
पाहुं वीर कोण तो, दावि शौर्य-वैभवा

कैक पायिं धांवती, हस्ति अश्व दौडती
घर्मस्‍नात सारथी, आंत ते महारथी
कोण श्रेष्ठ एक तो, राहिला उभा रथीं
सांवळी तुम्हांपरी, दीर्घबाहु आकृती
बंधु युद्धकाम का, शोधुं येइ बांधवा?

भ्याड भरत काय हा बंधुघात साधतो
येउं दे पुढे जरा, कंठनाल छेदतों
कैकयीस पाहूं दे, छिन्‍न पुत्रदेह तो
घोडदौड वाजते, ये समीप नाद तो
ये पुनश्च आज ही, संधी शस्त्रपाटवा

एक मी उभा इथें, येउं देत लाख ते
लोकपाल तो नवा, स्वत्त्वहीन लोक ते
क्षम्य ना रणांगणीं, पोरकेंहि पोर तें
शत्रुनाश क्षत्रियां, धर्मकार्य थोर तें
ये समोर त्यास मी, धाडितोंच रौरवा

नावरेच क्रोध हा बोधिल्या अनेकदा
राम काय जन्मला सोसण्यास आपदा
हो‍उं देच मेदिनी पापमुक्त एकदा
भरतखंड भोगुं दे रामराज्य संपदा
धर्मरक्षणी-क्षणीं, मी अजिंक्य वासवां
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वराविष्कार- सुधीर फडके
∙ आकाशवाणी प्रथम प्रसारण
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
राग - केदार
गीत प्रकार - गीतरामायण, राम निरंजन
  
टीप -
• गीतरामायण.
  • प्रथम प्रसारण दिनांक- ९/९/१९५५
  • आकाशवाणीवरील प्रथम प्रसारण स्वर- सुरेश हळदणकर.
अश्व - घोडा.
कंठनाली - गळा.
कंपितांग - (कंपित + अंग) भीतीने अंग थरथर कांपणे.
कानन - अरण्य, जंगल.
कोकणे - किंचाळणे, ओरडणे.
चाप - धनुष्य.
प्रदीप्‍त - उज्ज्वल.
पाटव - नैपुण्य / कौशल्य.
भेकर - हरीण.
मेदिनी - पृथ्वी.
रज्‍जू - दोरी.
रौरव - नरक.
श्वापद - जनावर.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  सुधीर फडके
  आकाशवाणी प्रथम प्रसारण