आयुष्यही तसे ग प्रेमाशिवाय व्यर्थ !
झेपावतात लाटा चंद्रास भेटण्यासी
विजनी वसंत येता आह्लाद कोकिळेसी
मधुमालती जशी ग गंधाविना निरर्थ
आयुष्यही तसे ग प्रेमाशिवाय व्यर्थ !
डुलुनि खुणाविते ती कलिका कुणास सांगा
भ्रमरांचिया थव्यांनी फुलतात रम्य बागा
स्वातिजलाविना रे शिंपा जसा निरर्थ
आयुष्यही तसे हे प्रेमाशिवाय व्यर्थ !
गीत | - | प्र. के. अत्रे |
संगीत | - | यशवंत देव |
स्वर | - | पुष्पा मराठे, सुधीर फडके |
चित्रपट | - | चोरावर मोर |
गीत प्रकार | - | चित्रगीत, युगुलगीत |
माझ्या या संग्रहातील कवितेत प्रेमकाव्यांचा भरणा पुष्कळसा आहे हे पाहून, मी त्याकाळी कोणातरी सुंदरीच्या प्रेमपाशात सापडलो होतो किंवा कुठल्या तरी रमणीच्या विरहाने 'जलावेगळ्या मासळी'प्रमाणे तडफडत होतो, असा जर कयास कोणी काढला तर तो मात्र बरोबर होणार नाही. कोणाही व्यक्तीच्या प्रेमाचे पुष्टीपत्र घेऊन ही प्रेमकाव्ये मी लिहिलेली नाहीत.
मला वाटते की तरूणमनाला जगातली सारी सौंदर्यं रमणीरूपाने प्रतीत होत असतात. सौंदर्याच्या प्राप्तीचा जिवाला लागलेला अष्टौप्रहर हव्यास हे त्याचे प्रेमवेड, सौंदर्य दर्शनासाठी त्याचा चाललेला उत्कट निदिध्यास हीच त्याची प्रियाराधना, ते मिळण्याची निराशा झाली किंवा क्षणभर दृष्टिआड झाले तर जिवाची होणारी तडफड हीच त्याची यातनामय विरहव्यथा. दुःसाध्य आणि दु:प्राप्य सौंदर्यदेवतेची मानसपूजा करताना तिच्या पायावर वेळोवेळी वहावी लागणारी फुले हीच ती प्रेमकाव्ये.
आचार्य अत्र्यांच्या मराठी चित्रपटात पदार्पण करण्यापूर्वीचे त्यानी दिलेले हे प्रीतिगीतांचे स्पष्टीकरण आहे हे लक्षात घेतले पाहिजे. कारण चित्रपटांसाठी गाणी लिहिताना कवि ती गाणी प्रसंगानुरूप होण्याच्या दृष्टीने लिहित असतो हे उघड आहे.
'हंस चित्र'च्या चित्रगीतांची लोकप्रियता कमालीची वाढली, अशा काळात एकदा 'ब्रम्हचारी'तील अत्र्यांच्या प्रीतीगीतांबद्दलची आपली प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी एक रसिक आचार्य अत्र्यांना भेटण्यासाठी स्टुडिओत गेला. तिथे गेल्यावर त्याच्या लक्षात आले की अत्रेसाहेब आणि मा. विनायक हे दोघेजण अर्ध्यापाऊण तासापासून कसली तरी चर्चा करीत आहेत. दरवाजाच्या बाहेर कुठलीतरी अनामिक असामी चुळबूळ करीत आहे, असे अत्र्यांच्या लक्षात येताच त्यांनी त्या माणसाला जवळ बोलावून घेतले. "काही महत्त्वाचे काम नाही. फक्त तुमच्या कानांवर तुमच्या प्रेमगीतांची पसंती कळवायची आहे." घाबरत घाबरत तो रसिक म्हणाला.
"प्रेम व्यक्त करताना घाबरायला होईल हे ठीक आहे, पण प्रेमगीतांची पसंती कळवायला इतके काय घाबरता?" या अत्र्यांच्या बोलण्यावर तो रसिक मा. विनायकांकडे बोट दाखवत म्हणाला "मा. विनायकांनी मागे चित्रपटातून 'संगीत हद्दपार करा' अशा मथळ्याचा एक लेख लिहिला होता ना म्हणून." त्यावर मा. विनायक हसत हसत म्हणाले, "संगीतामुळे चित्रपटाची फिल्म उगाच लांबत राहाते आणि त्या संगीतासाठी परिणामकारक दृश्यांची काटछाट करावी लागते, असे लक्षात आल्यावर मी तो लेख लिहिला होता. पण ते विधान अत्र्यांना लागू पडत नाही. त्यांच्या सारख्याच्या गाण्यांच्या प्रीतीगीतांवाचून माझाही जीव आता वेडापिसा होईल."
(संपादित)
गंगाधर महाम्बरे
आचार्य अत्र्यांची चित्रगीते
सौजन्य- दिलिपराज प्रकाशन प्रा. लि., पुणे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.