A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
चंद्र अर्धा राहिला

चंद्र अर्धा राहिला, रात्र अर्धी राहिली
भेट अर्धी गीत अर्धे, प्रीत अर्धी राहिली

मोकळे बोलू कसे मी शब्द ओठी थांबले
लाजर्‍या डोळ्यांत माझ्या चित्र अर्धे रेखिले
ओठ अर्धे विलगले, अर्ध उकले पाकळी

बिलगुनी रमल्या तरूशी पेंगलेल्या साउल्या
तो निळा एकान्‍त तेथे भावना भारावल्या
धुंद झाल्या दशदिशा, रात्रही ओलावली

वाकले आकाश खाली दूरच्या क्षितिजावरी
चांदणे चुंबीत वारा झोपला वेलीवरी
भेट घ्याया सृष्टी ही अर्ध झुकली, वाकली