A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
चला निघू या सरसावोनी

चला निघू या सरसावोनी देशाच्या उद्धरणी !

विस्कटलेले अवघे जीवन, खंत जयांना याची
पडती स्वप्‍ने उत्थानाची, उज्ज्वल भवितव्याची
जागरूक अभिमानी असले, असती जे जे कोणी !

उधाणलेल्या जलधीसंगे यावा झंझावात
तशी देउनी पराक्रमाला अभिमानाची साथ
परक्यांची या टाकू पुसुनी येथिल नावनिशाणी !

त्रिखंडात दुमदुमुनी जावी जरि राष्ट्राची कीर्ती
कार्यमग्‍नता जीवन व्हावे मृत्यू ही विश्रांती
भेद विरावे स्फुरण चढावे नवशुभ आकांक्षांनी !

ईर्ष्या अमुची कधी नसावी क्षणिक पुराचे पाणी
'कसे व्हायचे' अशी नसावी खचलेली जनवाणी
हासत जावे काट्यांवरुनी तरुणांनी अनवाणी !

उठता आपण नमतिल विघ्‍ने महाभयंकर आता
काय न केला आपण मर्दन तुंग हिमालय माथा?
विलंब का मग आणू वैभव लीलेने जिंकोनी !!