A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
चाल राजा चाल सर्जा

चाल राजा चाल सर्जा, वेग थोडा वाढवा
सोनपंखी ऊन उतरे चाखण्यासी गारवा

पूस मासाच्या सकाळी जोम अंगी दाटतो
नाद तुमच्या घुंगुरांचा मधुर भारी वाटतो
दूर सरतो रे धुक्याचा सरकपडदा आडवा

पिकत आला पार शाळू, पाचू पडला पांढरा
फूलतुर्‍याचा ऊस डोले, टंच हिरवा हरभरा
दरवळे रानी सुबत्ता भारले वारे, हवा

शर्यतीची शान आता पायी तुमच्या येऊ द्या
पालखीवाणी परि ही बैलगाडी जाऊ द्या
आत बसल्या रानगौरी जाण ह्याची वागवा