चाफा खंत करी काही केल्या फुलेना
गेले आंब्याच्या बनी
म्हटली मैनांसवे गाणी
आम्ही गळ्यांत गळे मिळवून रे
गेले केतकीच्या बनी
गंध दरवळला वनी
नागासवे गळाले देहभान रे
चल ये रे, ये रे गड्या
नाचु उडू घालु फुगड्या
खेळु झिम्मा झिम् पोरी झिम् पोरी झिम्
हे विश्वाचे अंगण
आम्हां दिले आहे आंदण
उणे करू आपण दोघेजण रे
जन विषयाचे किडे
यांची धाव बाह्याकडे
आपण करू शुद्ध रसपान रे
चाफा फुली आला फुलून
तेजी दिशा गेल्या आटुन
कोण मी - चाफा? कोठे दोघे जण रे?
गीत | - | कवी 'बी' |
संगीत | - | वसंत प्रभु |
स्वर | - | लता मंगेशकर |
राग | - | यमन |
गीत प्रकार | - | भावगीत |
आंदण | - | बक्षिस. |
झिम्मा | - | लहान मुलींचा एक खेळ. |
विषयवासना (विषय) | - | कामवासना. |
विदर्भातील जन्म अन् वास्तव्य आणि प्रसिद्धी पराङमुख स्वभावामुळे कवी 'बी' मराठी जगताला अपरिचित राहिले. तशी 'बी'ची कविता वाचून, त्या कवितेने प्रभावित होऊन, रे. ना. वा. टिळकांनी 'टू बी' ही कविता लिहिली होती. पण 'बी'चे खरे नाव त्यांस ठाऊक नसावे. पुढे एका रसिकाने कवीला तुमचे खरे नाव सांगा म्हणून आग्रह धरला तेंव्हा या प्रसिद्धी नाकारणार्या कवीने 'नांवांत काय आहे?' नावाची कविता लिहीत, नावात न गुंतता काव्य कुसुमाचा आनंद लुटण्याचा अलौकिक सल्ला दिला होता. १९३८ साली आचार्य अत्र्यांनी कवीच्या 'फुलांची ओंजळ' या कविता संग्रहाला प्रस्तावना लिहून कवीची महती मराठी सारस्वतासमोर ठळकपणे मांडली.
कवी 'बी' हे केशवसूत, भा. रा. तांबे व चंद्रशेखर यांना समकालीन होते. समकालीन असतानाही त्यांनी स्वत:च्या कवितेचे वेगळेपण राखले. नुसतेच वेगळेपण राखले नाही तर कवितेला सर्वोच्च कलागुणांनी मंडीत केले.
"बींनी ७५ वर्षाच्या आयुष्यात केवळ ४९ कविता लिहिल्यात. म्हणजे खूपच कमी. पण त्यांचे मोल हस्तीदंतावरील बारीक नक्षीकामासारखे किंवा ताजमहालासारखे आहे. गावोगाव सरकारी कार्यालय बांधणार्या पी.डब्लु.डी सारखे सवंग नाही", असे प्रतिपादन करीत आचार्य अत्रे म्हणतात, केशवसुतांच्या काव्यात ओजस्वी तत्वज्ञान आहे, पण कलेचा रेखिवपणा नाही; गोविंदाग्रजांच्या काव्यांत कला व सौंदर्यप्रीति आहे पण जीविताबद्दलचा सुसंगत विचार नाही. रे. टिळकांच्या काव्यात साधेपणा व प्रेमळपणा आहे, पण कल्पनेची विशालता व ऐश्वर्य नाही; बालकवींच्या काव्यांत नाद माधुर्य व तत्वसंशोधनाचे वेड आहे, पण सत्याचा स्पष्ट प्रकाश नाही. या सार्या दुर्मिळ गुणांचा समुच्चय 'कवी बी' यांच्या कवितेत आढळून येतो, असे प्रतिपादन करीत, 'कवी बी' यांना 'कवींचे कवी' म्हणून गौरवतात.
"रसिका !" अशी दाद ज्या कवीला आचार्य अत्र्यांकडून हयातपणी मिळाली, त्यावर अधिक काही बोलायचा आपल्याला अधिकार ही नाही अन् गरज ही नाही.
कवीची ’चाफा’ ही सुप्रसिद्ध कविता आज आपण पाहणार आहोत. या कवितेला लता मंगेशकरानी आपल्या सुमधुर स्वरांनी अधिकच मधुर करून ठेवले आहे. चाफा ह्या कवितेविषयी समीक्षकांच्या वेगवेगळी मतं मतांतरे आहेत. कुणाला चाफा ही कवीची अबोल प्रतिभा व कवीची तिच्याविषयीची तगमग यांचे रूपक वाटते तर कोणाला चाफा हा जीव-आत्मा यांचा संबंध वाटतो. पण बहुमान्य मत म्हणजे चाफा हा रुसलेला प्रियकर असून त्याला रिझवणारी प्रेयसी ते सांगते, हे होय. हे मत कवीलाही मान्य असावे, असे दिसते. कवितेच्या लालित्यपूर्ण धृपदात; रुसलेल्या किंवा मुखस्तंभाप्रमाणे स्तब्ध बसलेल्या प्रियकराविषयी प्रेयसीचे भाव व्यक्तविताना कवी लिहितो,
चांफा बोलेना, चांफा चालेना,
चांफा खंत करी काही केल्या फुलेना
कवी प्रियकराला चाफ्याची उपमा देतो. त्याचे कारण म्हणजे भारतीय संस्कारात प्रियकर म्हणजे पतीच होय. पती स्वतःविषयी उदासीन असून प्रेयसी अर्थात् पत्नी विषयी अधिक काळजी घेणारा असतो. चाफ्याचेही तसेच आहे. असे सांगतात की, एकदा वनदेवी सर्व फुलांना सुगंध वाटत फिरत होती. गुलाब, जाई, जुई, बकुळ आदि सारी फुले झाली. तिच्याकडे केवळ दैवी सुगंध उरला. तो कुणाला द्यावा, या विचारात ती असताना तिला चाफा दिसला. तिने चाफ्याला विचारले की, 'हा दैवी सुगंध तुला देऊ का?' तसा तो उत्तरला, 'माझ्यापेक्षा तू तो या गवत फुलांना दे. म्हणजे त्यांना कोणी पायी तुडविणार तरी नाही.' त्याच्या या परोपकारी उत्तराने खूष होऊन वनदेवीने तो दैवी सुगंध चाफ्यालाच दिला. कवीच्या प्रेयसीचा प्रियकर असाच आहे. पण तो आज बोलत नाही, चालत नाही, हसत खेळत नाही तर खिन्न होऊन बसलाय. त्याला फुलविण्यासाठी ती त्याला घेऊन आंब्याच्या वनात जाते. तिथे मैनेच्या सूरात सूर मिळवून गाते. तरी त्याला काहीच फरक पडत नाही. येथे कवी मैना एकटीच गाणे गाते म्हणत नाही, तर प्रेयसी सुद्धा तिच्या संगे गाते म्हणत निराळाच गोडवा निर्माण करतो.
आपल्या प्रियकराला तरीही अबोल पाहून ती त्याला केतकीच्या बनात नेते. तिथे सुगंधाने देहभान हरपून डुलणार्या नागांसोबत ती ही नाचली. तरीही तो तसाच बसला.
मग ती त्याला घेऊन सारा माळ हिंडून आली. तिथे तिने त्याला पशूंचे हुंबरणे नि कोलाहल ऐकविला. पण तो एवढा खिन्न झाला होता, की तरीही तो मौनच राहिला. डोंगर-कड्याला आलिंगन देणार्या त्याच्या प्रियतम नदीकडे तिने त्याचे लक्ष वेधले. तितक्यात कडाडणारी बिजली नि तिला प्रेमाने कवेत घेऊ पाहणारा मेघ आणि त्याला हुलकावणी देऊन पळणारी त्याची प्रियतमा वीज तिने त्याला दाखवली. कलिकेच्या भोवती पिंगा घालून तिचा प्रियकर वारा जगपण विसरून लडिवाळ गोंधळ घालत असलेला तिने त्याला दाखविला. आणि हे सारे तुला ओरडून सांगताहेत,
सृष्टि सांगे खुणा
आम्हा मुखतंभ राणा
मुळी आवडेना ! रे आवडेना !!
असे सांगत ती त्याला आर्जवाने झिम्मा घालायला बोलावू लागली. हे विश्वाचे अंगण आपल्याला आंदण दिलेय. पण ते ही आपल्याला खेळायला अपूरे पडेल, हे ती त्याला सांगू लागली. तरी ही तो मुखास्तंभासारखा स्तब्ध बसलेला पाहून ती त्याला म्हणाली,
जन विषयाचे किडे
यांची धाव बाह्याकडे
आपण करू शुद्घ रसपान
अरे, आपले प्रेम वासनेने बरबटलेले नाही तर शुद्घतेने व्यापलेले आहे. देह नि देहाभाव यापासून दूर आहे. ती त्याला असे म्हणताच. त्याने डोळ्याला डोळा भिडवून तिच्याकडे पाहिले. त्याचे अंगी रोमांच दाटून आले. आणि चाफा फुलून आला.
चांफा फुली आला फुलून
तेजी दिशा गेल्या आटून
कोण मी - चांफा? कोठे दोघे जण?
चाफा फुलताच दोघांतील अंतरच संपले. हे सांगताना कवी 'दिशा गेल्या आटून' असा शब्दप्रयोग करतो. दिशा अंतर दाखवतात. जेथे काहीच अंतर नसते तिथे दिशा कोठून येणार? हे अधिक परिणामकारकतेने व्यक्तविताना तो 'कोठे मी - चांफा ? कोठे दोघे जण ?' अशी सुबक रचना करत दोहोतील अद्वैत दाखवतो.
कवीची ही रचना मनाला मोह घालते. रुसलेली प्रेयसी नि तिला फुलविणारा प्रियकर ही नित्याची बाब होय. पण या कवितेत उलट आहे. त्यामुळे या कवितेत कविने प्रियकर प्रेयसीसाठी वापरलेल्या डोंगर-नदी, मेघ-वीज, कळी-वारा या उपमा प्रस्तुत कवितेच्या गाभ्याला उंची देऊन जातात. 'Bee' कवीची ही कविता, मराठी साहित्यात अढळ किर्ती मिळविल, हे अत्र्यांनी १९३८ साली केलेले भाकीत अक्षरशः खरे ठरलेले आहे, हीच मराठी रसिकांची साक्ष आहे.
(संपादित)
डॉ. नीरज देव
(मनोचिकित्सक)
सौजन्य- दै. सकाळ (२७ फेब्रुवारी २०२२)
(Referenced page was accessed on 30 April 2024)
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.