A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
चढवूं गगनिं निशाण

चढवूं गगनिं निशाण । अमुचें
चढवूं गगनिं निशाण
कोटि मुखांनी गर्जूं जय जय स्वतंत्र हिंदुस्‍तान

निशाण अमुचें मनःक्रांतिचें
समतेचें अन्‌ विश्वशांतिचें
स्वस्तिचिन्ह हें युगायुगांचें ऋषिमुख-तेज महान्‌

मूठ न सोडूं जरि तुटला कर
गाऊं फासहि आवळला जर
ठेवूं निर्भय ताठ मान ही झालें जरि शिर्काण

साहूं शस्त्रास्त्रांचा पाऊस
आम्ही प्रह्लादाचे वारस
सत्य विदारक आणूं भूवर दुभंगून पाषाण

विराटशक्ती आम्ही वामन
वाण आमुचें दलितोद्धारण
नमवूं बळिचा किरीट उद्धट ठेवुनि पादत्राण

हिमालयासम अमुचा नेता
अजातशत्रू आत्मविजेता
नामें त्याच्या मृत्युंजय हें चढवूं वरति निशाण